आली माझ्या घरी ही दिवाळी...

    09-Nov-2026
 
 
Diwali and Patriotism
 
दिवाळी हा वाईटावर चांगल्याने विजय मिळवण्याचा दिवस! त्यामुळे त्याला कालावधीचे बंधन नाही. आयुष्यात जेव्हा अशा विजयाने परमानंद प्राप्त होईल, तीही आपली दिवाळीच. लौकिक अर्थाने आपण सध्या दिवाळी साजरी करत असलो, तरी परमानंदाची अनुभूती लाभलेली दिवाळी आपण अनेकदा साजरी केली आहेच...
 
‘आली माझ्या घरी ही दिवाळी...’ हे मधुसूदन कालेलकर यांनी रचलेले मराठीतील अत्यंत लोकप्रिय आणि आनंदाचा वर्षाव करणारे चित्रपटगीत मला भावते. या गाण्यातून दिवाळीचा उत्साह, घरातील मांगल्याची भावना अतिशय सुंदर शब्दांत व्यक्त केली आहे. दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. जेव्हा दिवाळी आपल्या दारात येते, तेव्हा अवघे घर चैतन्याने भरून जाते, असे वर्णन या गाण्यात आहे. घरामध्ये दिव्यांची रोषणाई, दारासमोर काढलेल्या सुंदर रांगोळ्या आणि फराळाच्या गोडव्यामुळे जे पवित्र आणि आनंदी वातावरण तयार होते, तेच या गाण्याच्या केंद्रस्थानी आहे. हे गीत मानवी मनातील अंधकार दूर करून, आनंद आणि सकारात्मकतेचा प्रकाश कसा पसरतो, याचे सुंदर प्रतीक. ज्याप्रमाणे खेळामध्ये प्रत्येक खेळाडू विजयाचे ध्येय ठेवूनच सर्व आव्हानांवर मात करतो, तसाच हा दिवाळीचा सणही आपल्या आयुष्यातील सर्व दुःख आणि चिंता दूर करून आनंद, उत्साह आणि विजयाचा प्रकाश घेऊन येवो! क्रीडा क्षेत्रातील सर्व सवंगड्यांना आणि सुहृदांना ही दीपावली अत्यंत मंगलमय आणि ऊर्जावान जावो! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत, आपण यावेळचे ‘क्रीडाविश्व’ सदराचा प्रारंभ करू.
 
‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ हे गीत आपल्या सगळ्यांच्या जीवनात आनंदाने गायला मिळावे, अशी सगळ्यांचीच मनोमन इच्छा असते. ती फलद्रूप व्हावी, म्हणून आपण एकमेकांना शुभेच्छाही देत असतो. आनंद, समृद्धी आणि घरामध्ये सुखाचे द्योतक म्हणून ते गीत गायले जाते. यात फरक एवढाच की, असे क्षण वेगवेगळ्या लोकांच्या जीवनात, वेगवेगळ्या प्रसंगी उजाडलेले आपण पाहतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील देशप्रेमींची दिवाळी आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशप्रेमींची दिवाळी. भिन्न असल्याचे आपल्याला आढळते. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनात खर्‍या अर्थाने ‘दिवाळी’ साजरी होण्याची वेळ तेव्हाच उजाडली, जेव्हा त्यांनी भोगलेल्या तुरुंगवासानंतर त्यांची सुटका झाली आणि राष्ट्रकार्याला पुन्हा उधाण आले. या दोन थोर देशभक्तांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण कधी आला हे जाणून घेतले, तर स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवाळी कशी साजरी होई, ते आपल्याला जाणवेल.
 
लोकमान्य टिळकांना ब्रिटिशांनी मंडालेच्या तुरुंगात डांबले होते. आजूबाजूला संकटांचा आणि एकाकीपणाचा अंधार असताना, लोकमान्यांनी त्या परक्या भूमीतही ज्ञानातून आणि चिंतनातून ‘गीतारहस्य’ लिहिले. त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी पेटवलेल्या विचारांची अखंड मशाल होती. घरापासून दूर, सहकार्‍यांशिवाय काढलेली ती दिवाळी, म्हणजे राष्ट्रासाठी केलेल्या कष्टांची पराकाष्टाच. लोकमान्य टिळकांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली ब्रिटिशांनी मंडालेच्या तुरुंगात, सहा वर्षांची काळ्या पाण्याच्या शिक्षा सुनावली. तेथेच त्यांचे आरोग्य खालावले आणि मधुमेह बळावला. त्या मध्यरात्री टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका होते आणि ते पुण्यात त्यांच्या ‘गायकवाड वाड्या’त (केसरी वाडा) परततात, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी ती दिवाळी होती. लोक रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करतात, वाड्यावर दिव्यांची रोषणाई करण्यात येते. एका अंधःकारमय काळानंतर राष्ट्रसूर्याचे पुनरागमन होते, हीच त्यांच्या देशासाठी खरी दिवाळी होती.
 
अंदमानच्या तुरुंगयातना सहन करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, ब्रिटिशांविरोधात विरोधात अखंड संघर्ष केला. त्या कोठडीत त्यांना कुठले सण आणि कसला आनंद? पण, सावरकरांच्या मनातील देशप्रेमाचा प्रकाश इतका प्रखर होता की, त्यांना कोणत्याही दिव्यांच्या रोषणाईची गरजच भासली नाही. मातृभूमीच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण करणार्‍या या महान क्रांतिकारकांची दिवाळी म्हणजे, देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास!
 
अंदमान आणि रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून त्यांची पूर्ण मुक्तता, दि. १० मे १९३७ ला होते. सावरकरांना सेल्युलर जेलमध्ये दोन जन्मठेपांची अमानुष शिक्षा ठोठावण्यात येते. त्यानंतर १९२४ मध्ये त्यांना अंदमानहून भारतात आणून, रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात येते. जिथे त्यांच्यावर राजकारणात भाग घेण्यास पूर्ण बंदी असते. सावरकरांच्या आयुष्यात आणि त्यांच्या घरात खरी दिवाळी दि. १० मे १९३७ रोजी उजाडते; कारण त्या दिवशी मुंबई प्रांतात सत्तेवर आलेल्या पहिल्या लोकनियुक्त मंत्रिमंडळाने सावरकरांवरील सर्व निर्बंध उठवून, त्यांची पूर्णपणे मुक्तता केलेली असते. तब्बल २७ वर्षांच्या बंदीवासानंतर सावरकर जेव्हा मुक्त होऊन पुन्हा उघडपणे राष्ट्रकार्यात सक्रिय होतात, तेव्हा त्यांच्या पत्नी (माई सावरकर), त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण देशासाठी ती आनंदाचीच दिवाळी असते. टिळक व सावरकर या दोन्ही महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली, म्हणूनच त्यांच्या तुरुंगवासाच्या समाप्तीनंतर देशात आणि त्यांच्या घरात आनंदाचे दीप उजळले होते.
 
इतिहासाच्या सोनेरी पानांपासून आजच्या आधुनिक युगात आलो. आज जेव्हा आपण घरात बसून आप्तस्वकीयांसोबत फराळाचा आनंद घेतो, तेव्हा देशाच्या कडाक्याच्या थंडीत किंवा वाळवंटात आपले भारतीय सैनिक देशाच्या सीमांवर डोळ्यांत तेल घालून उभे असतात. अनेक नागरिक प्रेमाने आणि आदराने या जवानांना दिवाळीचा फराळ आणि शुभेच्छा पाठवतात. कारण त्यांना माहीत असते की, जवानांना आपल्या घरी दिवाळी साजरी करायला मिळत नाही. आपल्या कुटुंबापासून दूर राहून, केवळ देशरक्षण हेच सर्वस्व मानणार्‍या या जवानांचा त्याग म्हणजेच आपल्यासाठी खरी दीपावली असते.
 
स्वातंत्र्यसैनिकांची आणि संरक्षण दलाच्या देशभक्तांची दिवाळी पाहिल्यावर, आपण जरा क्रीडाक्षेत्रातील देशभक्तांची दिवाळी अनुभवूया. सुनील गावस्करच्या दिवाळीची एक आठवण सांगितली जाते. दि. ३१ ऑटोबर १९८७ रोजी (दिवाळीच्या दिवशी) नागपूरच्या मैदानात, भारत विरुद्ध न्यूझीलंड असा विश्वचषकाचा सामना खेळला गेला. या सामन्यात सुनील गावस्करने, अवघ्या ८५ चेंडूंत १०३ धावा करत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले आणि एकमेव शतक झळकावले. दिवाळीच्याच दिवशी त्यांनी भारतीयांना दिवाळीची एक अप्रतिम भेट दिली होती. गावस्करने जशी घरापासून दूर जात भारतीयांच्यावतीने दिवाळी साजरी केली, तशीच दिवाळी ऑटोबर २०२२मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे भारतीय क्रिकेटपटूंनी साजरी केली. विराट कोहलीच्या नाबाद ८२ धावांनी, भारताला पाकिस्तानविरुद्धच्या ‘टी-२० विश्वचषक २०२२’च्या सामन्यात विजय मिळवून दिला होता. या खेळीचे नीरज चोप्रा, पी. आर. श्रीजेश आणि इतरांनीही कौतुक केले होते. ‘एकट्या विराट कोहलीने संपूर्ण देशासाठी फटाके फोडले आहेत,’ असे सगळेच म्हणत होते. काय जबरदस्त खेळ केला होता, तेव्हा कोहलीने! पाकिस्तानविरुद्ध मिळालेल्या शानदार विजयाबद्दल, भारतीय चमूचे सगळ्यांनीच अभिनंदनही केले होते.
 
खेळाच्या मैदानावरील देशसेवा आणि खेळाडूंच्या त्यागाची परंपरा आजही कायम आहे. दिवाळीच्या या पवित्र पर्वावर अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू असतात, किंवा क्रीडापटूंचे कसदार प्रशिक्षण वर्ग चालू असतात. देशाचा तिरंगा फडकावण्यासाठी हे खेळाडू कडाक्याच्या थंडीत किंवा परदेशात घाम वाहत दिवाळी साजरी करतात. आता वानगीदाखल ताजे उदाहरण पाहू. भारतीय क्रिकेट संघांचा सध्याचा न्यूझीलंड दौरा दि. २२ ऑक्टोबर ते दि. १ डिसेंबर असा आहे. या दिवसांत खेळाडूंना घरी सण साजरा करता येत नाही. भाऊबीज, पाडव्याचे अभ्यंगस्नान, पत्नी व बहिणीचे प्रेमळ हट्ट या सगळ्याच सुखांना त्यांना मुकावे लागते. पण, त्यामुळे ते किंवा त्यांचे कुटुंबिय यामुळे नाखूश नसतात. उलट, त्यांच्या मनात असतो अभिमान! दिवाळीच्या दिवशी जेव्हा भारतात इकडे खेळाडूंचे कुटुंब, पतीच्या-भावाच्या ओवाळणीची वाट पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात कोणतीही तक्रार नसते. त्यांना ठावूक असते की, त्यांचा पती अथवा भाऊ मैदानात देशाचा मान राखण्यासाठीच गेला आहे. जेव्हा तो एखादे आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पदक आपल्या गळ्यात घालून घरी परतेल, तेव्हा तो ते पदक आपल्या पत्नीला-लाडया बहिणीला ओवाळणीत अर्पण करेल! एका बहिणीसाठी, पत्नीसाठी याहून मोठा आनंद तो कोणता?
 
भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीपासून जर दूर असेल, तर तो किती कासावीस होतो. त्याला किती हुरहुर वाटते, याचा काव्याविष्कार कविवर्य सुरेश भटांनी मांडला आहे, "उद्याचीच भाऊबीज कोण मला ओवाळील? कोण ओवाळणीसाठी मजसवे झगडील? इथे आज पडलो मी माझ्या गावाहून दूर, कुणा घालू ओवाळणी? लागे मला हुरहुर. इथे सार्‍याच बहिणी, परक्या या नगरात, परी असे निराळीच माझ्या बहिणीची प्रीत. कसे बहिणीचे नाते! कशी बहिणीची माया! ओवाळणी मागतसे सालभर भांडूनीया! उद्याचीच भाऊबीज महोत्सव घरोघरी आणि पाहीन हे सारे एकटाच वेड्यापरी!” कुटुंबापासून दूर असलेल्यांची दिवाळी जे घरी सुखाने साजरी करत असतील, ते अशांची भावनिक स्थिती जाणून घेतील का?
 
मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र आणि १९७५च्या विश्वविजेत्या भारतीय हॉकी संघाचे नायक अशोककुमारने, त्याच्या बालपणातील आणि झाशी येथील घराशी जोडलेल्या दिवाळीतील आठवणी अत्यंत भावूकतेने एका ठिकाणी व्यक्त केल्या. त्यात अशोककुमारच्या आठवणींनुसार, ध्यानचंदांच्या घरातील दिवाळीचा सण हा केवळ दिव्यांचाच सण नसून एक अत्यंत शिस्तबद्ध, परंतु आपुलकीने भरलेला कौटुंबिक सोहळाच असायचा. मेजर ध्यानचंद (अशोककुमार ज्यांना प्रेमाने ‘बाबूजी’ म्हणायचे) सैन्यात असल्याने, घरातही शिस्तप्रियच होते. दिवाळीच्या काळातही हा साधेपणा दिसे. जास्तीचा डामडौल किंवा देखावा नसून, संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन सण साजरा करण्यावरच बाबूजींचा भर असायचा. १९६३ सालापर्यंत त्यांच्या झाशी येथील मूळ घरात वीजजोडणीही नव्हती. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी पणत्या तेल घालून स्वतः हाताने लावणे, गल्लीतील लहान मुलांसोबत फटाके उडवणे आणि आईने बनवलेला फराळ एकत्र बसून खाणे, या आठवणी अशोककुमारच्या मनात आजही ताज्या आहेत.
 
अशोककुमारने एका प्रसंगी आठवण सांगितली होती की, जेव्हा अशोककुमार स्वतः हॉकीमध्ये यश मिळवून (विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकून) दिवाळी किंवा सणाच्या सुमारास घरी परतत, तेव्हा ध्यानचंद जास्त शब्द न वापरता केवळ त्यांच्या डोयावर मायेने हात फिरवायचे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके जिंकणार्‍या पित्याकडून मिळालेला हा आशीर्वाद, त्याच्यासाठी कोणत्याही मोठ्या बक्षिसापेक्षा किंवा दिवाळीच्या भेटवस्तूपेक्षा मोठाच असे. ऑलिम्पिक आणि हॉकीच्या दौर्‍यांमुळे ध्यानचंद बरेच दिवस घराबाहेर असत. त्यामुळे जेव्हा जेव्हा ते दिवाळीला घरी असायचे, तेव्हा संपूर्ण कुटुंबासाठीच तो आनंददायी काळ असे. अशोककुमारच्या मते, त्याच्या घरातील दिवाळीने त्यांना संघभावना, संयम आणि यशाच्या शिखरावर असतानाही जमिनीवर कसे राहावे, याची शिकवण दिली. क्रीडांगणावरील पराक्रम असो वा सीमेवरील पहारा, राष्ट्रसेवेची ही अखंड पेटती मशाल म्हणजेच आपली खरी दीपावली! चला तर मग, या त्यागाच्या आणि चिकाटीच्या प्रकाशाने, संपूर्ण आयुष्य उजळवून टाकूया.
 
- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)




संबंधित मजकूर