फुटबॉलचा परमेश्वर

    09-Nov-2026

Cristiano Ronaldo
 
कॅलक्युलेटर’पेक्षाही अचूक काय असेल, तर ते आहे, ख्रिस्तियानो रोनाल्डोचे डोके! किक, हेडर तो ज्या टायमिंगवर मारतो ना, त्याला तोडच नाही! अगदी कॅलक्युलेटेड... अफलातून...भन्नाट! त्याची किक किंवा हेडर एक सेकंदही मागे-पुढे होत नाही. त्याचे पोझिशनिंगही अद्भुतच! बचावपटूंच्या गराड्यात तो स्वतःची जागा बरोबर तयार करतो. त्यामुळे रोनाल्डो गोलपोस्टच्या जवळ असताना, चाहत्यांचे श्वासही रोखलेलेच असतात. कम्प्युटरमध्ये ‘परफेट टायमिंग असलेला फुटबॉलपटू’ डिझाईन केला ना, तर त्यानेही लाल-हिरव्या रंगातील पोर्तुगालच्या जर्सीतला हुबेहूब रोनाल्डोच रेखाटला असता! इतकी रोनाल्डोची टायमिंगशी नाळ जुळलेली आहे.
 
रोनाल्डोच्या पदार्पणापूर्वी जागतिक फुटबॉलपटलावर पोर्तुगालचा संघ वर्गातल्या सर्वसामान्य मुलासारखाच होता. अपवादात्मक स्पर्धा वगळता, विजयाच्या अवतीभोवती फिरकण्याचा तसा त्यांचा स्थायीभाव नव्हताच मुळी. ‘फिफा विश्वचषक १९६६’मध्ये तिसरे स्थान पटकावले, हीच काय ती त्यांची मजल. पण २००३ साली पोर्तुगालला ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या रूपाने एक गोड स्वप्न पडले. ते इतके गोड होते की, पुढे तब्बल २३ वर्षे हा देश या स्वप्नातून बाहेरच पडला नाही! रोनाल्डोच्या आगमनानंतर परमेश्वराने पोर्तुगालच्या कपाळावर भाग्याच्या एक नाही, दोन नाही, तर तब्बल तीन रेषा ओढल्या! २३ वर्षांच्या कारकिर्दीत रोनाल्डोने त्या सत्यात उतरवल्या.
 
‘युईएफए युरो कप २०१६’च्या स्पर्धेत, पोर्तुगालकडे ‘अंडरडॉग’ म्हणून पाहिले जात होते. फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या तुलनेत, पोर्तुगालचा संघ अगदीच दुय्यम मानला जात होता. रोनाल्डोने मात्र हा तर्क चुकीचा ठरवला. त्याने ही स्पर्धा एकहाती गाजवून, पोर्तुगालच्या माथी विजेतेपदाचा पहिलावहिला टिळा लावला. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वेल्सविरुद्ध गोलकोंडी सुटत नसताना, रोनाल्डोने ती आपल्या कौशल्याने सोडवली. राफेल गुरेरोच्या पासिंगवर रोनाल्डोने जो हेडर मारला, तो जगातील नावाजलेल्या गोलपैकी एक ठरला. फुटबॉलचाहते आजतागायत तो विसरलेले नाहीत, इतका तो भन्नाट होता. २०१९ आणि २०२५च्या युईएफ नेशन्स लीगमध्येही रोनाल्डोची जादू चालली आणि पोर्तुगालने सलग दोनदा ही स्पर्धा जिंकण्याची विलक्षण कामगिरी साध्य केली.
 
रोनाल्डोमध्ये अभूतपूर्व शारीरिक क्षमता आहे. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही २० वर्षांच्या खेळाडूंना लाजवेल, अशी त्याची शारीरिक तंदुरुस्ती. अप्रतिम ड्रिबलिंगने त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या बचावभिंती सहज भेदल्या आहेत. विक्रमाने त्याच्याशी जणू काही हस्तांदोलनच केले आहे, इतके विक्रम त्याच्या नावे आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक १४६ गोल करण्याचा विक्रमही त्याच्याच नावे आहे. ’रिअल माद्रिद’, ’मँचेस्टर युनायटेड’, ’अल-नास्र, युव्हेंटस’, स्’पोर्टिंग सीपी’ अशा जगातील नावाजलेल्या लबचे प्रतिनिधित्व करताना, त्याने तब्बल ८३९ वेळा प्रतिस्पर्धी संघाचा गोलपोस्ट भेदला आहे.
 
गोल मारण्याची कला त्याला चांगलीच अवगत असली, तरी नशीब त्याच्यावर बरेचदा रुसलेच होते. २०१२च्या युरो कप स्पर्धेत रोनाल्डोने झुंझार खेळ केला. परंतु, सहकार्‍यांची साथ न मिळाल्याने, विजेतेपदाने हुलकावणी दिली. पण तो थांबला नाही. त्या पराभवानंतर तो अधिक जोमाने मैदानात उतरला. २०१२ची उणीव त्याने २०१६ला भरून काढत, पोर्तुगालला युरो कपचे ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्याने नुकतीच निवृत्ती जाहीर केली असली, तरी लबस्तरावर त्याच्या खेळाची जादू पाहायला मिळणार आहे.
 
रोनाल्डो हा पोर्तुगाल फुटबॉलसाठी क्रांतिकारक खेळाडू आहे. त्याने पोर्तुगालच्या संघाची मानसिकता बदलली. सरावाची पद्धत आणि फिटनेसच्या जोरावर संघात शिस्त आणली, नवनवीन कौशल्याने त्याने संघाला अद्ययत केले, युवा खेळाडूंचे मनोबल वाढवले, त्याने पोर्तुगालला जिंकायला शिकवले. सहा फिफा विश्वचषक खेळूनही विजेतेपद मिळवून न देण्याची खंत कायम असली, तरी पोर्तुगालला फुटबॉलची महासत्ता करण्यात रोनाल्डोचा वाटा सिंहाचा आहे. पोर्तुगालचा संघ त्याच्याच नेतृत्वात सुवर्णकाळ जगला. त्यामुळेच पोर्तुगालसाठी तो देवापेक्षा कमी नाही. करोडो चाहत्यांच्या मनमंदिरातील तो देवच आहे, फुटबॉलचा परमेश्वर!
 
लेखक- रोहित गुरव
 




संबंधित मजकूर