दत्तक पालकत्वापासून शिक्षण आणि सामाजिक समुपदेशनापर्यंत, निःस्वार्थ सेवाकार्य करणार्या सीए मिलिंद ज्ञाते यांच्याविषयी...
समाजसेवा म्हणजे दुसर्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी, स्वतःहून पुढाकार घेणे. स्वतःच्या आनंदात, समाजातील वंचित घटकांनाही सहभागी करून घेणे, आयुष्यातील महत्त्वाचे क्षण सामाजिक उपक्रमांसाठी समर्पित करणे आणि प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सेवाकार्य सुरू ठेवणे. ही वेगळीच जीवनदृष्टी आहे. ठाण्यातील ज्येष्ठ सनदी लेखापाल मिलिंद मधुकर ज्ञाते आणि त्यांच्या पत्नी वीणा ज्ञाते यांनी, त्यांच्या कृतीतून हीच जीवनदृष्टी जपली. दत्तक पालकत्व, आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण, आश्रमशाळांना मदत, समुपदेशन आणि पर्यावरण संवर्धनासारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी, सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
मिलिंद यांचा जन्म आणि बालपण ठाण्यातच गेले. व्यवसायाने ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ असलेल्या ज्ञाते यांची, ठाण्यात स्वतःची फर्म आहे. त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा बालपणीच्या संस्कारांतून मिळाली. कुटुंबात लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वातावरण होते. त्यांचे आजोबा आणि मामा समाजसेवा व देशसेवेच्या कार्यात सक्रिय. त्यातूनच समाजाकार्याची प्रेरणा मिळाल्याचे ज्ञाते सांगतात. पत्नी वीणा यांच्याही माहेरी समाजकार्याचे संस्कार असल्याने, विवाहानंतर उभयतांनी सेवाप्रवास एकत्र सुरू ठेवला.
ज्ञाते दाम्पत्याच्या सामाजिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे, दत्तक पालकत्वाचा निर्णय! त्यांच्या महाविद्यालयीन मैत्रिणीने स्वतःचा मुलगा असतानाही, सामाजिक बांधिलकीतून एका मुलीला दत्तक घेतले. याने प्रेरित होऊन, ज्ञाते दाम्पत्यानेही दुसरे अपत्य म्हणून मुलगा दत्तक घेण्याचा विचार केला. कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांनी ‘वात्सल्य ट्रस्ट’च्या माध्यमातून, मुलाला दत्तक घेतले. आज त्यांचा मुलगा ३२ वर्षांचा असून, विवाहितही आहे.
दत्तक पालकत्व स्वीकारल्यावर मुलापासून त्याची वस्तुस्थिती लपवून न ठेवता, लहानपणापासूनच त्याला विश्वासात घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कृष्ण आणि कर्णाच्या कथांच्या माध्यमातून, त्याला याविषयी समजावून सांगितले. स्वतःच्या अनुभवातूनच दत्तक पालकत्वातील भावनिक पैलू त्यांना समजले. त्यामुळेच त्यांनी इतरांनाही मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. सुमारे २० ते २५ पालकांना समुपदेशन केल्याचे ज्ञाते सांगतात.
त्यानंतर त्यांचा सामाजिक कार्याचा प्रवास आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे वळला. ‘वात्सल्य ट्रस्ट’च्या उपक्रमानिमित्त मिलिंद यांच्या पत्नी वाडा येथे गेल्या असता, त्यांना आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची माहिती मिळाली. त्यानंतर ‘वनवासी कल्याण आश्रमा’शी त्यांचा संपर्क वाढला. गेली सुमारे १५ वर्षे वाडा परिसरातील आश्रमशाळांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, देणगीदार व शाळा व्यवस्थापनामध्ये ते समन्वय साधतात.
यातील सर्वाधिक उल्लेखनीय उपक्रम म्हणजे, मुलीच्या विवाहात मिळालेल्या आहेरातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या उभारणे! २०१६ मध्ये मुलीच्या विवाहानिमित्त भेटवस्तूंऐवजी, रोख रक्कम किंवा धनादेशाच्या स्वरूपात आहेर देण्याचे आवाहन त्यांनी पाहुण्यांना केले. यातून वाडा तालुक्यातील कळंभाई येथील वनवासी कल्याण समितीच्या, अरविंद स्मृती संचालित माधवराव काणे आश्रमशाळेत, एक वर्गखोली बांधण्याचा त्यांचा संकल्प होता. मात्र, उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एकाऐवजी दोन खोल्या बांधणे शक्य झाले. दि. २२ जून २०१७ रोजी, याचा लाभ विद्यार्थिनींना मिळाला. यामुळे सुमारे ५० ते ६० आदिवासी मुलींच्या निवासाची सोय झाली. लग्नातील आहेराला सामाजिक कार्याची जोड त्यांनी दिली.
मुलाच्या विवाहनिमित्तही त्यांनी आदिवासी कुटुंबांच्या उपजीविकेला हातभार लागावा, या उद्देशाने सुमारे २०० व्यक्तींना प्रत्येकी पाच फळझाडे दिली. मात्र, सर्वच झाडे जगली नाहीत. काहींनी योग्य काळजी न घेतल्याचेही ज्ञाते मान्य करतात. सामाजिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी मदतीनंतरच्या सातत्याचे महत्त्वही, त्यांना यातून समजले. ज्ञाते दाम्पत्याच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रसिद्धीपासून दूर राहणे! त्यांनी बांधलेल्या वर्गखोल्यांवर स्वतःच्या नावाचे फलक लावलेले नाहीत. स्वतःची सामाजिक संस्था स्थापन करण्याऐवजी, आधीपासून चांगले काम करणार्या संस्थांनाच सहकार्य करणे परिणामकारक असल्याचे ते मानतात.
त्यांचा समाजसेवेवरील विश्वास अधिक दृढ करणारा अनुभव युरोप दौर्यात आला. रोमानियातील बुखारेस्ट येथे मिलिंद यांची प्रकृती बिघडली. मलेरियामुळे ते बेशुद्ध पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अशाकाळी काही मिनिटांपूर्वीच ओळख झालेल्या एका भारतीय व्यक्तीने, वीणा यांची स्वगृही राहण्याची व्यवस्था केली. मिलिंद रुग्णालयातून परतल्यावरही, त्यांनी उभयतांना काही दिवस आपल्याच घरी ठेवले. निरोपाच्या क्षणी नवरात्रीत प्रत्यक्ष लक्ष्मीच घरी आल्याची भावना व्यक्त करत, त्यांनी वीणा यांचा साडी देऊन सन्मान केला. यामुळे ज्ञाते दाम्पत्याला माणुसकीचा विलक्षण अनुभव आला.
वयाच्या ६५व्या वर्षीही मिलिंद सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. कामाचे प्रमाण कमी करून, मिळणारा वेळ ते समाजकार्यासाठी देतात. ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातूनही विविध उपक्रमांत सहभागी होतात. स्वतःच्या आनंदाला समाजाच्या आनंदाशी जोडत, प्रसिद्धीपेक्षा कृतीला महत्त्व देणार्या मिलिंद ज्ञाते यांचा प्रवास माणुसकीचा प्रेरणादायी वस्तुपाठच ठरतो. मिलिंद ज्ञाते यांना त्यांच्या भविष्यातील राष्ट्रसेवाकार्यासाठी 'दै. मुंबई तरुण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा!