‘सागर महोत्सव’ म्हणजे आयुष्यातील एक अनुभव! ‘सागर महोत्सव’ म्हणजे आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी! निसर्गाच्या विशालतेसमोर स्वतःला विसरून जाण्याची आणि त्याच्याशी एकरूप होण्याची अनुभूती!
सागराच्या किनार्यावर उभे राहून त्याचे सौंदर्य अनुभवणे आणि खोल समुद्रात बोटीतून त्याच्या अथांगतेचा अनुभव घेणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. किनार्यावरून सागराच्या लाटा दिसतात, त्यांचा आवाज ऐकू येतो; मात्र खोल समुद्रात गेल्यावर त्याचे विराट रूप, सामर्थ्य आणि अनिश्चितता अनुभवता येते. त्याचवेळी या अथांग सागरासमोर आपल्या क्षमतांच्या मर्यादांचीही जाणीव होते. हा केवळ निसर्गाचा अनुभव नसतो, तर स्वतःकडे नव्याने पाहायला लावणारा प्रवास असतो.
सागराविषयी कितीही ऐकले, वाचले किंवा बोलले, तरी प्रत्यक्ष अनुभवाची जागा त्यातून भरून निघत नाही. काही गोष्टी माहितीच्या माध्यमातून समजतात, तर काही अनुभवातूनच उमगतात. अनुभवातून आलेली जाणीव ही मनाच्या खोलवर रुजते आणि विचार करण्याची दिशा बदलते. ‘आसमंत सागर महोत्सवा’चे वेगळेपण नेमके याच अनुभवाधारित जाणिवेत आहे. सागर आपल्याला केवळ विशालता आणि सामर्थ्याची जाणीव करून देत नाही, तर विश्वासाचे महत्त्वही शिकवतो. खोल समुद्रात बोटीवर काम करणारा माणूस सागराचे सामर्थ्य जाणून असतो. त्याचे बदलते रूप, हवामानातील अनिश्चितता आणि समुद्रातील आव्हाने यांची त्याला जाणीव असते. तरीही तो आपल्या ज्ञानावर, कौशल्यावर, सहकार्यांवर आणि साधनांवर विश्वास ठेवून आपले काम करत असतो. त्याला सागरावर विजय मिळवायचा नसतो; तर सागराचा आदर राखत, त्याच्याशी जुळवून घेत आपले कर्तव्य पार पाडायचे असते. यातून मिळणारा जीवनाचा धडा मोलाचा आहे.
आयुष्यातही प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. अनिश्चितता, अडचणी आणि आव्हाने प्रत्येकाच्या वाट्याला येतात. अशा वेळी परिस्थितीचे भान ठेवून, आवश्यक ती तयारी करून आणि स्वतःवर व सहकार्यांवर विश्वास ठेवून पुढे जाणे महत्त्वाचे असते. सागराची विशालता नम्रता शिकवते, त्याचे सामर्थ्य आपल्या मर्यादांची जाणीव करून देते आणि त्याच्या सान्निध्यातील अनुभव विश्वासाचे महत्त्व समजावतो. ‘आसमंत सागर महोत्सवा’चा उद्देश केवळ व्याख्याने आयोजित करणे किंवा सागरी पर्यावरणाविषयी माहिती देणे इतकाच मर्यादित नाही. या महोत्सवाच्या माध्यमातून उपस्थितांना, विशेषतः विद्यार्थ्यांना, निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी दिली जाते. त्यांना निसर्गाशी जोडणे, प्रश्न विचारायला शिकवणे, विज्ञान समजून घेण्याची उत्सुकता निर्माण करणे आणि शिकलेले प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा गाभा आहे. कारण शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे. मिळालेल्या माहितीमुळे विचारांमध्ये बदल होणे, जगाकडे पाहण्याची दृष्टी व्यापक होणे आणि त्या जाणिवेतून कृतीत जबाबदारी व्यक्त होणे, हे शिक्षणाचे खरे सार्थक आहे. पुस्तकातून सागरी परिसंस्थेची रचना समजून घेणे महत्त्वाचे आहेच; पण समुद्रकिनार्यावरील जैवविविधता पाहणे, सागरी जीवांविषयी जाणून घेणे आणि समुद्रातील मानवी हस्तक्षेपाचे परिणाम समजून घेणे, यातून मिळणारा अनुभव अधिक खोलवर परिणाम करतो.
सागर महोत्सवातून एखाद्या विद्यार्थ्याला सागराविषयी नवी माहिती मिळाली, तर तो एक लाभ झाला. मात्र, त्या अनुभवातून त्याच्या मनात निसर्गाविषयी आदर निर्माण झाला, सागराच्या सामर्थ्यापुढे नम्रता आली आणि सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली, तर तो अनुभव आयुष्यभर त्याच्यासोबत राहील. कदाचित भविष्यातील एखादा संशोधक, संवर्धक किंवा जबाबदार नागरिक घडण्याची सुरुवातही अशाच एखाद्या अनुभवातून होऊ शकते. सागर महोत्सवाचा हेतू सागराची केवळ ओळख करून देणे नाही; तर सागराच्या निमित्ताने माणसाला स्वतःची, निसर्गाशी असलेल्या नात्याची आणि पर्यावरणाप्रति असलेल्या जबाबदारीची नव्याने ओळख करून देणे आहे. सागराचे सौंदर्य अनुभवणे आनंददायी असते; पण त्याच्या विशालतेतून आपल्या मर्यादांची जाणीव होणे, त्याच्या सामर्थ्यापुढे नम्रता येणे आणि निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक घट्ट होणे, हा त्याहून मोठा अनुभव आहे.
चार दिवसांचा ‘सागर महोत्सव’ संपतो. सहभागी आपापल्या घरी परततात. महोत्सवातील व्याख्यानं, उपक्रम आणि प्रत्यक्ष अनुभव मागे राहतात; मात्र त्यातून मनात निर्माण झालेली जाणीव, विचारांची दिशा आणि कृतीची प्रेरणा सोबत राहते. एखाद्या विद्यार्थ्याने समुद्रकिनार्यावर टाकलेला प्लास्टिकचा कचरा उचलणे, एखाद्याने सागरी जीवांविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणे किंवा एखाद्याने इतरांमध्ये सागरी पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, या छोट्या कृतींतून महोत्सवाचा उद्देश प्रत्यक्षात उतरतो. सहभागींच्या मनात निसर्गाविषयी आदर, संवर्धनाची जाणीव आणि जबाबदारीने जगण्याची प्रेरणा निर्माण झाली, तर ‘आसमंत सागर महोत्सवा’चे ते खरे यश असेल. आणि म्हणूनच, ‘सागर महोत्सव’ चार दिवसांचा असला, तरी त्यातून मिळणारा अनुभव आयुष्यभराचा असतो!
(लेखक ‘आसमंत बेनवोलेन्स फाऊंडेशन’चे संचालक आहेत.)
९९७००५६५२३
लेखक-नंदकुमार पटवर्धन