मुंबई, :(Majhi Chhoti Aaji Book)डॉ. बाळू दत्तात्रय राठोड यांच्या ‘माझी छोटी आजी -बाप-लेकीच्या बालपणातल्या गप्पा’ या पुस्तकाचे प्रकाशन एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू कर्नल प्रा. हेमलता के. बागला यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. ओंकार प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या प्रकाशन सोहळ्याला विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू विलास नांदवडेकर, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव राकेश वळवी, डॉ. संजय शेडमाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘माझी छोटी आजी’ हे पुस्तक म्हणजे एका वडिलांनी आपल्या मुलीसोबत अनुभवलेल्या निरागस क्षणांचे, छोट्या छोट्या संवादांचे आणि भावविश्वाचे शब्दरूप आहे. बाळू राठोड हे एसएनडीटी महिला विद्यापीठ चंद्रपूर कॅम्पसचे उपकुलसचिव म्हणून कार्यरत आहे. मुलीच्या ‘पप्पा, एक सांगू?’ या सहज, निरागस प्रश्नापासून सुरू होणारा हा बाप-लेकीच्या गप्पांचा प्रवास वाचकांना बालपणाच्या रम्य जगात घेऊन जातो. मुलांचे निरागस प्रश्न, हट्ट, रुसवे-फुगवे, खोड्या, हसण्याचे क्षण, त्यांच्या कल्पनाविश्वातील गमतीजमती आणि कुटुंबातील जिव्हाळ्याचे संवाद यांचे लेखकाने अत्यंत संवेदनशीलपणे चित्रण केले आहे.(Majhi Chhoti Aaji Book)
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ एका बाप-लेकीच्या आठवणी नाहीत, तर प्रत्येक कुटुंबात घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगांचे प्रतिबिंब आहे. मुलांच्या बोलण्यातून व्यक्त होणारे निरागस शहाणपण, त्यांच्या भावविश्वातील अनोखे विचार आणि पालकत्वाच्या प्रवासात नकळत जपल्या जाणाऱ्या आठवणी यांचा सुंदर पट या पुस्तकातून उलगडतो. दैनंदिन जीवनातील साधे प्रसंगही किती अर्थपूर्ण आणि अविस्मरणीय असू शकतात, याची जाणीव हे लेखन करून देते.आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगातील जीवनशैलीत पालक आणि मुलांमधील संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारे हे पुस्तक असल्याचे लेखक बाळू राठोड यांनी सांगीतले.
यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा. हेमलता के. बागला यांनी बालपणीच्या निरागस आठवणी आणि बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक ओलावा लेखनातून सुंदररीत्या व्यक्त केल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन केले. प्रभारी प्र-कुलगुरू विलास नांदवडेकर यांनीही पुस्तकाच्या आशयाचे कौतुक केले.(Majhi Chhoti Aaji Book)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.