लालकृष्ण अडवाणीजी : शतकपूर्तीच्या दिशेने प्रेरणादायी प्रवास

    08-Nov-2026
 
 
Lal Krishna Advani 100th Birthday
 
लालकृष्ण अडवाणीजी आज दि. ८ नोव्हेंबर रोजी आयुष्याच्या १००व्या वर्षात पदार्पण करत आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की, यावर्षी योगायोगाने त्यांचा वाढदिवस दिवाळीच्याच दिवशी आला आहे. दिवाळीचा हा सण प्रभू श्रीराम आणि दिव्यत्वाशी जोडलेला सण आहे. दुसरा योगायोग असा की, एकीकडे आपण ‘जनसंघा’च्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण करत आहोत, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५वी जयंती साजरी करत आहोत आणि नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्षे साजरी केली आहेत, अशा वेळीच त्यांचा वाढदिवस आला आहे. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अडवाणीजींचे अभीष्टचिंतन करणारा हा लेख...
 
खरेतर आधुनिक भारताच्या असंख्य वेगवेगळ्या अध्यायांना ज्यांच्या आयुष्याने स्पर्श केला आहे, असे फारच कमी लोक आहेत. लालकृष्ण अडवाणीजीही त्यांपैकीच एक. अडवाणीजींचा जन्म दि. ८ नोव्हेंबर १९२७ रोजी देव दीपावलीच्या दिवशी झाला होता. १९४७ मध्ये युवा अवस्थेत असतानाच, त्यांनी सिंधमधील आपले परिचयाचे जग मागे सोडून जावे लागण्याच्या वेदना सोसल्या. मात्र, आपल्या जगण्यात कोणतीही कटू भावना न बाळगता, त्यांनी पुन्हा नव्याने अगदी शून्यातून आपले आयुष्य उभारले. सर्व संकटांवर मात करत शून्यातून नव्याने उभारणी करण्याचा हा त्यांचा गुण आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिला. जनसंघाला भक्कम करताना आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची उभारणी करण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या या गुणाची प्रकर्षाने प्रचिती येते. भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकाळात १९८९ मध्ये काँग्रेसचे संख्याबळ ४०० वरून थेट २००च्या खाली घसरले होते. इतकेच नाही, तर १९९६ मध्ये भाजप पहिल्यांदाच सर्वांत मोठा पक्ष बनला होता. अडवाणीजींनी कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या आणि ‘राष्ट्र प्रथम’ या सुस्पष्ट तत्त्वावर आधारलेला पाया पक्षाला घालून दिला.
 
आपल्या आणखी दोन गुणांमुळे अडवाणीजी एक नेते म्हणून नेहमीच वेगळे ठरले आहेत. त्यातला पहिला गुण म्हणजे, त्यांची वैचारिक स्पष्टता आणि कुशाग्र बुद्धिमत्ता! त्यांच्या भाषणांमधून आणि लिखाणातून या गुणांची प्रचिती येते. त्यांनी लिहिलेले जनसंघ आणि भाजपचे ठराव आजही वाचावेत असेच आहेत. दुसरीकडे त्यांच्या मुलाखती नेहमीच नेमया आणि बारकाईने विश्लेषण करणार्‍या असायच्या. त्याच वेळी भारताच्या राजकारणातील एका मोठ्या वर्गाने अनेक वर्षे मांडणी केलेल्या भ्रामक धर्मनिरपेक्षतेला त्यांनी ज्या रीतीने उघडे पाडले, तोच त्यांचा दुसरा गुण.
 
खरेतर अडवाणीजींनी प्रत्येक जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडली. सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून अडवाणीजींनी राजस्थानच्या विविध भागांत काम केले. तिथून ते राजधानी दिल्लीत गेले. तिथेच त्यांची अटलजींसोबत अत्यंत घनिष्ठतेने काम करायला सुरुवात झाली. खरेतर दोन मोठे राजकीय नेते एकमेकांचे स्पर्धक न बनता, अनेक दशके सोबत काम करतात आणि एकमेकांना सहकार्य करतात, ही गोष्टच दुर्मीळ असल्याचे इतिहासात आपल्याला दिसते. एका अर्थाने अडवाणीजी आणि अटलजी यांनी एक उत्तम उदाहरण घालून दिले. त्यांनी एकत्र मिळून भारतीय राजकारणाची दिशाच बदलून टाकली.
 
अडवाणीजी दिल्लीत आले, त्यावेळी दिल्ली फाळणीच्या भयानक वास्तवाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती. अशा वेळी त्यांनी ‘जनसंघा’ला भक्कम करण्याच्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. १९६७ मध्ये अडवाणीजी दिल्ली महानगर परिषदेचे अध्यक्ष झाले. तिथे त्यांनी दिवंगत विजयकुमार मल्होत्राजी यांच्यासोबत काम केले. त्यानंतर विजयकुमार मल्होत्राजी मुख्य कार्यकारी नगरसेवक झाले.
 
अडवाणीजींच्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात झाली, ती १९७० मध्ये. त्यांनी संसदेत मांडलेल्या मुद्द्यांची संपूर्ण राजकीय विश्वाने कायमच प्रशंसा केली. एक खासदार म्हणून आणि नंतर दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आपली छाप पाडली. सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणूनही त्यांनी अशीच छाप सोडली. महत्त्वाचे म्हणजे, संसदीय कामाच्या जबाबदार्‍या असूनही त्यांनी सातत्याने भारतभर प्रवास केला आणि लोकांना भेटत राहणे सुरूच ठेवले.
 
मला १९९१ची लोकसभा निवडणूक अगदी ठळकपणे आठवते. अडवाणीजी लोकसभेची निवडणूक दोन जागांवरून लढवतील, असे ठरले होते. त्यापैकी एक जागा गांधीनगरची होती. गुजरातशी त्यांचे जुने ऋणानुबंध होतेच. फाळणीनंतर त्यांचे वडील कच्छमध्ये स्थायिक झाले होते. अडवाणीजींनी गुजरातचे राज्यसभा खासदार म्हणूनही काम केले होते. त्यामुळे हे एकप्रकारे त्यांचे आपल्या घरी परतण्यासारखेच होते. त्यावेळी मी भाजपच्या संघटनेत कार्यरत होतो आणि त्यामुळेच मला त्यांच्या उमेदवारीचा अर्ज तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करण्याचा आणि संपूर्ण प्रचारात त्यांना सहकार्य करण्याचा बहुमान लाभला होता. गांधीनगरच्या जनतेने त्यांना वारंवार संसदेत पाठवले. गांधीनगरचा एक मतदार म्हणून मलाही अनेक प्रसंगी अडवाणीजींना मतदान करण्याचा बहुमान लाभला आहेच. त्यांनी आपल्या मतदारसंघावर सातत्याने ठेवलेले लक्ष आणि घेतलेली काळजी, यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
 
आणीबाणी हा अडवाणीजींच्या आयुष्याला कलाटणी देणारा कालखंड होता. लोकशाही वाचवण्यासाठी आणि देशाच्या राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांमध्ये ते आघाडीवर होते. ‘अ प्रिझनर्स स्क्रॅप बुक’ या पुस्तकातून त्यांनी त्यांच्या त्या दिवसातील अनुभवांना जगासमोर आणले आहे. याच पुस्तकातील ‘अ टेल ऑफ टू इमर्जन्सीज’ नावाच्या एका भागात जून १९७५ पासून भारतात सुरू झालेल्या घडामोडी आणि १९३३ मधील ‘नाझी-जर्मन’ कालखंडातील घडामोडी यातील कमालीचे साम्य अतिशय सुंदर पद्धतीने स्पष्ट करून सांगितलेले आहे.
 
अडवाणीजी हे एक आक्रमक विरोधी पक्षनेते तर होतेच; पण त्याचबरोबर ते एक उत्कृष्ट प्रशासकही होते. १९७७ मध्ये जेव्हा जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा अडवाणीजी माहिती आणि प्रसारण मंत्री बनले. या खात्यातील त्यांचे कार्य अत्यंत प्रभावी होते, हे सर्वांनीच मान्य केले आहे. उपपंतप्रधान आणि भारताचे सर्वाधिक काळ सेवा बजावणार्‍या गृहमंत्र्यांपैकी एक म्हणून, भारताची सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आपल्या सुरक्षा दलांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे अतिशय आदराने स्मरण केले जाते. दहशतवादाविरोधातील त्यांच्या स्पष्ट आणि खंबीर भूमिकेमुळे भारताला एक कठोर दहशतवादविरोधी कायदा मिळाला.
 
अर्थातच, सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा ही अडवाणीजींच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक घटना होती. म्हणजे, या यात्रेने भारतीय समाजाला अधिक चांगली दिशा दिली. या रथयात्रेच्या संकल्पनेपासून ते तिच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हा मी माझा बहुमान मानतो. जेव्हा रथयात्रा सुरू झाली, तेव्हा सोमनाथ येथे उपस्थित असणे, हे माझ्यासाठी खरोखरच खूप खास होते. एक यात्रा अत्यंत कठीण असू शकते, ज्यासाठी तासंतास लागतात, सततचा प्रवास करावा लागतो, शारीरिक सहनशक्तीची परिसीमा गाठली जाते आणि त्यामुळे प्रचंड थकवा येत असूनही अंतिम लक्ष्यावर मन केंद्रित ठेवण्याची क्षमता आवश्यक असते. अडवाणीजी या सहनशक्तीचे उत्तम प्रतीक होते.
 
बिहारमध्ये अडवाणीजींना झालेल्या अटकेच्या दुःखद प्रसंगाच्या आठवणीदेखील माझ्याकडे आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये भाजपने चिमणभाई पटेल सरकारचा पाठिंबा काढून घेतला. ज्यावेळी आपल्या विचारसरणीचा आणि राम मंदिराचा प्रश्न येतो, तेव्हा कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हा स्पष्ट संदेश यातून दिला गेला. काहीही झाले तरी राम मंदिर बांधले जाईलच, अशी शपथ आमच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आणि अखेर काही वर्षांनी भारताच्या जनतेच्या आशीर्वादाने, अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे एक भव्य मंदिर प्रत्यक्षात आले.
 
अडवाणीजींविषयी सांगायचे झाले, तर त्यांच्या अनेक असामान्य गोष्टी आहेत. याचे उदाहरण म्हणजे, त्यांचा साधेपणा. नवनिर्माण चळवळीनंतर अडवाणीजी जुनागढला आले होते आणि एक महिनाभर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे तिथे राहून त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली. या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने नाकारले. सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा आणि नैतिकता काय असते, हे त्यांनी नेहमीच दाखवून दिले आहे. ते एक उत्तम वाचक आहेत. ज्यांनी त्यांच्यासोबत काळ व्यतित केला आहे, त्यांना हे चांगलेच माहीत आहे की, ते वृत्तपत्रे किती बारकाईने वाचतात. ते चित्रपट आणि नाटकांचे मोठे चाहते आहेत, तसेच एक उत्साही चित्रपट समीक्षकदेखील राहिले आहेत. इतिहासाची त्यांची समज आणि त्याचे जतन करण्याची गरज त्यांच्या ‘माय कंट्री माय लाईफ’ या पुस्तकातून स्पष्टपणे दिसून येते.
 
अडवाणीजी नेहमीच सिंधी संस्कृतीशी जोडलेले राहिले. त्यांच्या या निष्ठेचा एक दाखला म्हणजे, लेहजवळील सिंधुदर्शन पूजेला लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. मी स्वतः अडवाणीजी आणि जॉर्ज फर्नांडिसजी यांच्यासोबत एका पूजेला उपस्थित होतो.
 
कमला अडवाणीजींचा उल्लेख केल्याशिवाय अडवाणीजींच्या या उल्लेखनीय प्रवासाची कोणतीही माहिती अपूर्णच राहील. त्यांच्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात त्या अडवाणीजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांच्या ऊर्जेचा सतत स्रोत राहिल्या.
कराचीमध्ये लहानाचे मोठे झालेले अडवाणीजी यांनी त्यांच्या आयुष्याला कोणते वळण मिळेल, याचा कधी विचारही केला नसेल. कृतज्ञतेची भावना व्यक्त करत भारताच्या जनतेने २०२४ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. अडवाणीजी त्यांच्या आयुष्याच्या १००व्या वर्षात पदार्पण करत असताना, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहावे, अशी मी प्रार्थना करतो.
 
 - मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी




संबंधित मजकूर