सौरऊर्जेवर चालणारी ५० हजार टेलिकॉम केंद्रे उभारून इंडस टॉवर्सचा जागतिक विक्रम! १ लाख केंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट

    08-Nov-2026
 
Indus Towers Solar Powered Telecom Sites
 
गुरुग्राम (Indus Towers Solar Powered Telecom Sites) : इंडस टॉवर्स लिमिटेड ही जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम टॉवर संरचना उभारणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे . भारतभरात सौरऊर्जेवर चालणारी ५० हजार टेलिकॉम केंद्रे यशस्वीपणे सुरू करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे या माध्यमातून कंपनीने पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एक नवा जागतिक मापदंड निर्माण केला आहे. भविष्यात कंपनीने सौरऊर्जेवर चालणाऱ्या टेलिकॉम केंद्रांची संख्या १ लाखांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
 
इंडस टॉवर्सने आपल्या संपूर्ण नेटवर्कमध्ये सुमारे ३०० मेगावॅट क्षमतेची सौरऊर्जा निर्मिती प्रणाली उभारली आहे. दूरसंचार पायाभूत सुविधा क्षेत्रातील विकेंद्रित अक्षय ऊर्जा निर्मितीचे हे सर्वात मोठ्या जाळ्यांपैकी एक आहे. कंपनीच्या अंदाजानुसार, या उपक्रमाचा पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम जवळपास २ कोटी झाडे लावण्याइतका आहे. तसेच पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे दरवर्षी सुमारे ४ लाख २० हजार टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होत आहे. (Indus Towers Solar Powered Telecom Sites)
 
या कामगिरीबाबत इंडस टॉवर्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ प्रचूर साह म्हणाले की, "जवळपास ३०० मेगावॅट क्षमतेसह ५० हजार दूरसंचार केंद्रे सौरऊर्जेवर चालवण्याचा टप्पा गाठणे ही केवळ एक कामगिरी नसून पर्यावरणपूरक दूरसंचार पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. या स्तरावर कामगिरी करणारी पहिली पॅसिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी म्हणून आम्ही हे दाखवून दिले आहे की, नावीन्य, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांचा एकत्रित वापर करून उद्योग आणि पर्यावरणासाठी सकारात्मक बदल घडवता येतात."
 
पुढे ते म्हणाले की, "२०२४ मध्ये सौरऊर्जा प्रकल्पांचा विस्तार वेगाने सुरू केल्यानंतर, कमी कालावधीत आम्ही दूरसंचार पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौरऊर्जा प्रणालींपैकी एक उभारली आहे. यामुळे स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढला आहे, कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे आणि नेटवर्कची कार्यक्षमता व विश्वासार्हता अधिक मजबूत झाली आहे." (Indus Towers Solar Powered Telecom Sites)
 
कंपनीच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाबाबत प्रचूर साह यांनी पुढे सांगितले की, जबाबदारीने व्यवसायाचा विस्तार करण्याच्या वचनबद्धतेचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. सौरऊर्जेच्या मदतीने १ लाख टेलिकॉम केंद्रे चालवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. यामुळे ऊर्जेवरील खर्च कमी होण्यास मदत होईल. तसेच पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीत नवे आदर्श निर्माण करता येतील.
 
या प्रवासात मिळालेला अनुभव, कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानाच्या सुविधा आफ्रिकेतही अशाच प्रकारचे यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आफ्रिकेत डिजिटल सेवांचा विस्तार करण्यासाठी विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक ऊर्जेची मोठी गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Indus Towers Solar Powered Telecom Sites)
 
इंडस टॉवर्सने आपल्या संपूर्ण नेटवर्कमध्ये आधुनिक अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. सौरऊर्जा केंद्रांची डिजिटल पद्धतीने जोडणी करण्यात आली असून, वीज निर्मिती आणि कामगिरीवर वास्तविक वेळेत लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा विकसित केली आहे. तसेच माहितीच्या आधारे देखभाल करण्याची व्यवस्थाही सुरू करण्यात आली आहे.
 
यामुळे डिझेलवरील अवलंबित्व कमी होण्यासोबतच वीजपुरवठ्याची विश्वासार्हता वाढण्यास मदत होत आहे. पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणाऱ्या दूरसंचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने कंपनीची ही महत्त्वपूर्ण वाटचाल मानली जात आहे. (Indus Towers Solar Powered Telecom Sites)




संबंधित मजकूर