आश्विन महिन्यातील अमावास्येला ‘दीपान्विता अमावास्या’ असेही म्हणतात. कारण, लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योतीने ही अंधारी रात्र उजळून निघते. आपल्या आयुष्यात ती घेऊन येते समृद्धी, सुख आणि आनंद! अंधारातून उजेडाकडे जाण्याचा हा सारा सहप्रवास... तो एकट्याने करायचा नाही. आपले कुटुंब यावेळी आपल्यासोबत असते. सर्वांनी एकत्र येऊन लक्ष्मीप्रति व्यक्त केलेली ही कृतज्ञ भावना. प्रसन्नतेने नटलेली गृहलक्ष्मी हीसुद्धा तिचाच एक अंश!
हा विशेष दिवस आणि लक्ष्मीची उपासना म्हणजे दिवाळी! ‘रमा एकादशी’ला सुरू झालेली दिवाळी ‘यम द्वितीये’ला संपते. तिच्या मध्यावर येणारी चतुर्दशी आणि अमावास्या एक छानसा संदेश घेऊन येते. काय संदेश आहे तो?
इथे एक सुंदरसा विचार आपली परंपरा आपल्याला शिकविते. ‘धर्मसिंधु’, ‘निर्णयसिंधु’ यांसारखे ग्रंथ आपल्याला विविध व्रते, पूजनविधी, तसेच चैत्र ते फाल्गुन या बाराही महिन्यांतील विविध कृत्यांविषयी मार्गदर्शन करतात.
नरक चतुर्दशीला पहाटे चार वातींच्या दीपाचे दान करावे. यामुळे मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याची नरकात जाण्यापासून सुटका होईल. चतुर्दशीला प्रदोषकाळी विष्णू, शिव यांच्या मंदिरात दीपदान करावे. अर्थात, दिवे लावावेत.
दिवाळी म्हणजे फराळ. या फराळाची चाहूल आपल्याला कितीतरी दिवस आधीच लागलेली असते. पण, हे वाचून आश्चर्य वाटेल की, या व्रताच्या निमित्ताने लहान मुले आणि आजारी व्यक्ती वगळून इतर सर्वांनी आश्विन अमावास्येला उपवास करावा. अन्नसेवन करू नये. सायंकाळी लक्ष्मीची पूजा करावी आणि त्यानंतर व्रत सोडावे.
आश्विन अमावास्येबद्दल सांगताना अभ्यंगस्नानाचे महत्त्व विशद केलेले दिसते. पहाटे अभ्यंग करावा. प्रदोषकाळी दीपदान करावे आणि लक्ष्मीची पूजा करावी.
अथा आश्विन अमावास्यायां प्रातरभ्यंगः
प्रदोषे दीपदानलक्ष्मीपूजनादि विहितम्|
अस्यामेव निशीथोत्तरं नगरस्त्रीभिः
स्वगृहांगणादलक्ष्मीनिः-सारणं कार्यम्|
अत्राभ्यंग आवश्यकः|
एवं चतु्देहयादिदिनत्रयऽभ्यगाद्युत्सवस्याकरणे
नरकादिदोषश्रवणात्करणे
लक्ष्मीप्राप्त्यलक्ष्मीपरिहारादिफलश्रवणाच्च
नित्यकास्योभयरूपत्वम|
अभ्यंगस्नान आणि त्याचे महत्त्व याठिकाणी आवर्जून नोंदविले आहे. आपण केवळ सुवासिक तेल लावणे, उटणे लावून स्नान करणे, इतका याचा मर्यादित अर्थ घेतो. परंतु, चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशीपासून तीन दिवस रोज असा अभ्यंग करणे आवश्यक आहे. यामुळे काय होईल? असा अभ्यंग नित्य आणि काम्य असा सांगितला आहे. असे केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होईल. न केल्यास दारिद्य्र येईल.
म्हणजेच, अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजन ही दोन वेगळी कृत्ये वाटली; तरीही त्यांचा सहसंबंध आहे. ती एकमेकांशी जोडलेली आहेत, हे लक्षात येते.
अभ्यंग कशासाठी? तर ताजेतवाने होण्यासाठी. आपली संस्कृती शेतीवर आधारित आहे. शेतातील ताजा हंगाम म्हणजे, धान्यलक्ष्मी हाती येत असताना, झालेल्या कष्टाचे साफल्य म्हणजे अभ्यंगस्नान. येणार्या थंडीसाठी त्वचेला कायम स्निग्धता मिळवून देणे, म्हणून तेलाने शरीराला मालिश करणे, असा मोठा अर्थ यात भरला आहे. आता आपण तो फक्त दिवाळीच्या दिवसातच करतो. पण, खरेतर थंडी संपेपर्यंत रोज अंघोळीपूर्वी असा अभ्यंग उपयोगी ठरावा.
लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमाः|
गावः कामदुहा सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः॥
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः
शङ्खोऽमृतं चाम्बुधेः|
रत्नानीह चतुर्दशं प्रतिदिनं
कुर्वन्तु वो मङ्गलम्॥
वरील श्लोकात वर्णन केले आहे, समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या १४ रत्नांचे. या श्लोकाच्या सुरुवातीला आलेले नाव साक्षात् लक्ष्मीचे. नेहमीच वंदनीय आणि पूजनीय अशी ही देवता. तिच्या अस्तित्वाशिवाय मानवी जीवनाची गुणवत्ता अपूर्ण आणि दुःख देणारी. त्यामुळे तिची उपासना दररोज महत्त्वाची आहेच. आपण केलेल्या प्रामाणिक कष्टातून हाती आलेली संपत्ती वापरावीसुद्धा समजून-उमजून!
अमृताच्या प्राप्तीसाठी देव आणि दानव यांनी समुद्र घुसळला. अशा मंथनातून दरवेळी उत्तम असेच काहीतरी येईल, असे नाही. समुद्रमंथनातून अमृताचा कुंभ घेऊन भगवान ‘धन्वंतरी’ प्रकट झाले, तो दिवस धनत्रयोदशीचा! पण, याच मंथनातून ‘विष’ बाहेर पडले, जे पचविण्याची ताकद फक्त आणि फक्त भगवान शंकरांची होती. सर्वांच्या ते पचनी पडले, असे नाही.
त्यामुळे चांगले आणि वाईट दोन्ही समोर असताना, योग्य त्याची निवड करायला शिकणे महत्त्वाचे. याचा लक्ष्मीशी संबंध असा की, उत्तम-उत्कट असे काही गवसले; तर त्यातून लक्ष्मी येईल आणि ती आदर्श शिकवेल, अन्यथा कोणत्याही मार्गाने लक्ष्मी येतेच. पण, अशा वेळी ती सोबत घेऊन येईल तिच्या भगिनीला, अलक्ष्मीला! तिचा पराभव करणे म्हणजे, पुन्हा लक्ष्मीची उपासना करणे.
वाईटावर विजय मिळवायचा तर चांगल्याची कास धरायला हवी, हा संस्कार देणारे हे दिवाळीतील लक्ष्मीपूजन!
‘ऋग्वेदा’तील ‘श्रीसूक्ता’त आपल्याला लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघींचेही उल्लेख दिसून येतात. अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र, दुःख, संकटे. लक्ष्मी येते आणि अलक्ष्मी दूर जाते, इतके हे साधे समीकरण आहे. पण, त्यासाठी प्रयत्न मात्र पुष्कळ करावे लागतात, तरच यश मिळते. त्यामुळे प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे लक्ष्मीपूजन!
भारतीय परंपरा लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवे उजळावेत, असे सांगते. मंदिरात, झाडांपाशी, सार्वजनिक ठिकाणी, अगदी स्मशानातसुद्धा दीपावली साजरी करावी. म्हणजेच, दिव्यांच्या तेजाने सर्व परिसर उजळून टाकावा.
मत्स्यपुराण सांगते- दीपै: नीराजनात्
अत्र सैषा दीपावली स्मृता |
लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर केवळ पूजन पूर्ण होते. पण, घरातून अलक्ष्मी बाहेर जायची असेल; तर त्यासाठी डोळ्यात अर्धी नीज दाटलेली असताना वाद्ये वाजवून, मंगलगान करीत लोकांनी मोठ्या आवाजात उद्घोष करावा. यामुळे अलक्ष्मी बाहेर निघून जाईल आणि लक्ष्मी स्थिर होईल. केवळ नगरातील लोकांनीच हे करावे असे नाही, तर राजानेही राजवाड्यात अशी सर्व कृत्ये करावीत, असे सांगितले गेले आहे. यावरून हे लक्षात येते की, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव; पण ते एक व्रत आहे. त्याला उत्सवी आयाम जोडला गेला आहे. कारण, तो सर्वांच्या चेहर्यावर आनंद फुलवतो. समूहमनाला एकत्र येण्याची प्रेरणा देतो.
देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सोबत घेऊन आपल्या प्रयत्नाने, कष्टाने आपले आयुष्य सतत उजळत राहो, अशी मंगलमय सदिच्छा!