नभांगणातील ‘दीपोत्सव’

    08-Nov-2026

Diwali 2026 Skywatching
 
 
दिवाळी म्हटले की, डोळ्यांसमोर येतात पणत्यांची रांग, आकाशकंदील, रंगीबेरंगी रोषणाई आणि फटाक्यांनी उजळून निघणारे आकाश. परंतु, पृथ्वीवरील या प्रकाशोत्सवापलीकडे अवकाशातही एक वेगळीच दिवाळी आणि तीही सतत सुरू असते. कोट्यवधी तारे, तेजस्वी ग्रह, धूमकेतूंच्या मागे राहिलेल्या धुळीतून चमकणार्‍या उल्का आणि दूरच्या दीर्घिकांमधून येणारा प्रकाशामुळे रात्रीचे आकाश विलक्षण सुंदर दिसते. फरक एवढाच की, या खगोलीय रोषणाईला वात, तेल किंवा विजेची गरज नसते. ती विश्वातील नैसर्गिक प्रक्रियांमधूनच निर्माण होते.
 
यंदा २०२६ मध्ये दिवाळीचा मुख्य दिवस दि. ८ नोव्हेंबर रोजी आहे. याकाळात आकाशाकडे थोडा वेळ शांतपणे पाहिले, तर आपल्या सभोवतालच्या विश्वाची ओळख करून घेण्याची संधी मिळू शकते. मात्र, दिवाळीच्या रात्री एखादी मोठी उल्कावृष्टी होणारच किंवा आकाशात एखादी विशेष खगोलीय घटना दिसणारच, असे नाही. आकाशातील दृश्ये ऋतू, चंद्राची स्थिती, ग्रहांचे स्थान आणि स्थानिक हवामान यांच्यावर अवलंबून असतात. खर्‍या अर्थाने आकाशातील दिवाळी अनुभवण्यासाठी, आपल्याला खगोलीय घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावे लागेल.
 
तार्‍यांच्या दिव्यांनी सजलेले आकाश
 
रात्री आकाशात दिसणारा प्रत्येक तारा म्हणजे, सूर्याप्रमाणेच स्वतःचा प्रकाश निर्माण करणारा एक प्रचंड वायूंचा गोळा. त्याच्या केंद्रभागात होणार्‍या ‘अणुसंलयन’ प्रक्रियेतूनच ऊर्जा निर्माण होते आणि ती प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. काही तारे सूर्यापेक्षा मोठे, अधिक उष्ण आणि अधिक तेजस्वी असतात; तर काही तुलनेने लहान व मंद. पृथ्वीपासूनचे अंतरही त्यांची दिसणारी चमकच ठरवते. त्यामुळे आकाशात एखादा तारा अत्यंत तेजस्वी दिसतो म्हणून, तो सर्वांत मोठा किंवा सर्वांत जवळचा असेलच असे नाही. तार्‍यांच्या प्रकाशाचा प्रवासही विलक्षण आहे. प्रकाश एका सेकंदात सुमारे तीन लाख किलोमीटर अंतर पार करतो. तरीही, अनेक तार्‍यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्षे, शेकडो वर्षे किंवा त्याहून अधिक काळ घेतो. त्यामुळे आपण रात्री आकाशात पाहतो, तेव्हा अनेकदा त्या तार्‍यांचा भूतकाळ पाहत असतो. आकाशातील प्रत्येक तेजस्वी ठिपका हा केवळ प्रकाशाचा बिंदूचा नसून, विश्वाच्या विशाल इतिहासाचीच एक खिडकी आहे.
 
शहरांपासून दूर, कृत्रिम प्रकाश कमी असलेल्या ठिकाणी आकाश पाहिल्यास तार्‍यांची संख्या अधिक जाणवते. आकाशगंगेचा फिकट, दुधाळ पट्टाही काही ठिकाणी दिसू शकतो. आपल्या आकाशगंगेत अब्जावधी तारे आहेत. आपण आकाशगंगेच्या आतील भागातून तिच्याकडे पाहत असल्याने, तिच्यातील असंख्य तार्‍यांचा एकत्रित प्रकाश आकाशात पट्ट्यासारखा दिसतो. हा देखावा अनुभवणे म्हणजेच, आपल्या विश्वातील स्थानाची जाणीव करून देणारा एक साधा; पण प्रभावी अनुभव.
 
ग्रहांची आकाशकंदिलांसारखी चमक
 
रात्रीच्या आकाशात तार्‍यांसारखे दिसणारे काही तेजस्वी ठिपके प्रत्यक्षात ग्रह असतात. शुक्र, गुरू आणि शनी हे ग्रह योग्य वेळी उघड्या डोळ्यांनीही पाहता येतात. मात्र, तार्‍यांप्रमाणेच ते स्वतःचा प्रकाश निर्माण करत नाहीत. सूर्यप्रकाशाचे परावर्तन झाल्यामुळे ते आपल्याला चमकताना दिसतात. शुक्र हा अनेकदा सूर्यास्तानंतर पश्चिमेकडे किंवा सूर्योदयापूर्वी पूर्वेकडे तेजस्वी दिसतो. गुरूही तेजस्वितेमुळे सहज लक्ष वेधून घेतो. शनीला दुर्बिणीतून पाहिल्यास त्याच्या कड्यांचे दर्शन होते. हे कडे बर्फाचे आणि खडकाळ कणांचे बनलेले आहेत. योग्य दुर्बीण आणि स्थिर वातावरण असेल, तर ग्रहांचे अधिक तपशीलही पाहता येतात. त्यामुळे दिवाळीच्या सुटीत मुलांनी आणि पालकांनी एकत्र आकाश निरीक्षण करणे, हा मनोरंजनासोबतच विज्ञान शिकण्याचाही एक चांगला मार्ग ठरू शकतो. ग्रहांचे स्थान रोज थोडे बदलत असते. त्यामुळे एखादा ग्रह कुठे दिसेल, हे जाणण्यासाठी खगोल निरीक्षणासाठी वापरल्या जाणार्‍या नकाशांचा किंवा आकाशदर्शनाच्या भ्रमणध्वनी अनुप्रयोगांचा उपयोग करता येतो. मात्र, एखादा ग्रह दिसत नसल्यास तो आकाशातून नाहीसा होत नाही, तर तो क्षितिजाखाली असू शकतो किंवा सूर्याच्या तेजामुळे दिसत नसतो.
 
आकाशातील क्षणिक फुलबाजा
 
दिवाळीतील फुलबाजा काही क्षणांत प्रकाशरेषा निर्माण करतो. आकाशातही अशाच प्रकाशरेषा दिसतात; त्यांना ‘उल्का’ म्हणतात. अवकाशातील लहान धूलिकण किंवा खडकाळ तुकडे पृथ्वीच्या वातावरणात अतिवेगाने प्रवेश करतात. वातावरणातील वायूंशी होणार्‍या परस्परक्रियेमुळे, त्यांच्या मार्गावर तेजस्वी प्रकाश निर्माण होतो. अशा दृश्याला सामान्य भाषेत ‘तारा तुटणे’ असेही म्हटले जाते; परंतु प्रत्यक्षात तारा तुटत नसतो. काही उल्का एकाच कालावधीत वारंवार दिसू लागतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना धूमकेतू किंवा काही लघुग्रहांनी मागे सोडलेल्या धूलिकणांच्या प्रवाहातून जातो, तेव्हा ‘उल्कावृष्टी’ घडते. आकाशात त्या उल्का जणू एका विशिष्ट भागातून येत असल्यासारख्या दिसतात. त्या भागाच्या जवळ असलेल्या तारकासमूहावरून उल्कावृष्टीला नाव दिले जाते. नोव्हेंबरच्या मध्यावर होणारी ‘सिंहस्थ उल्कावृष्टी’ ही त्यापैकीच एक आहे. तिचा संबंध ‘टेम्पल-टटल’ या धूमकेतूने मागे सोडलेल्या पदार्थाशी आहे. २०२६ मध्ये तिची कमाल सक्रियता दि. १६-१७ नोव्हेंबरच्या रात्री अपेक्षित आहे; म्हणजेच दिवाळीच्या मुख्य दिवसानंतर काही दिवसांनी. उल्कांची संख्या दरवर्षी सारखीच नसते. ढगाळ हवामान, शहरातील प्रकाश आणि निरीक्षणाची जागा, यामुळे दिसणार्‍या उल्कांची संख्या बदलते. उल्कावृष्टी पाहण्यासाठी दुर्बीण आवश्यक नसते; विस्तीर्ण आकाश दिसणार्‍या अंधार्‍या ठिकाणी डोळ्यांनी निरीक्षण करणे अधिक सोयीचे असते.
 
अंधार्‍या आकाशाचे महत्त्व
 
दिवाळीचा संबंध अमावास्येशी असल्याने याकाळात चंद्रप्रकाश तुलनेने कमी असतो. चंद्राची कोर दिसत असली, तरी ती अत्यंत बारीक असू शकते किंवा सूर्याच्या जवळ असल्याने सहज दिसणारही नाही. त्यामुळे आकाश-निरीक्षणासाठी परिस्थिती अनुकूल ठरू शकते. मात्र, शहरातील दिवे, फटाक्यांचा धूर आणि ढगाळ वातावरण, यामुळे आकाशातील फिकट तारे दिसणे कठीण होते.
यातून एक महत्त्वाचा वैज्ञानिक मुद्दा समोर येतो. आकाश जितके उजळ, तितके अधिक तारे दिसतीलच असे नाही. उलट, जमिनीवरील अनावश्यक कृत्रिम प्रकाश वातावरणात विखुरल्याने, आकाशाची पार्श्वभूमी उजळते आणि मंद तारे नजरेआड होतात. या समस्येला ‘प्रकाशप्रदूषण’ म्हणतात. त्याचा परिणाम केवळ खगोल-निरीक्षणावरच होत नाही; तर काही प्राणी, पक्षी आणि इतर सजीवांच्या नैसर्गिक दिनचर्येवरही कृत्रिम प्रकाशाचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, दिवाळीत घर सजवताना प्रकाशाचा वापर विचारपूर्वक करणे महत्त्वाचे. आवश्यक तेवढेच दिवे लावणे, प्रकाश आकाशाच्या दिशेने न वळवता खाली ठेवणे आणि वापर नसताना दिवे बंद करणे, अशा साध्या उपायामुळे ऊर्जा वाचते आणि रात्रीचे नैसर्गिक आकाशही अधिक स्पष्ट दिसू शकते.
 
फटायांपलीकडचा ‘प्रकाशोत्सव’
 
आकाशातील दिवाळी अनुभवण्यासाठी महागडी दुर्बीण किंवा विशेष उपकरणे असणे आवश्यक नाही. घराच्या गच्चीवरून, मोकळ्या मैदानातून किंवा शहरातील प्रकाश कमी असलेल्या सुरक्षित जागेतूनही निरीक्षण सुरू करता येते. सुरुवातीला चंद्र, तेजस्वी ग्रह आणि ठळक तारकासमूह अशी ओळख सोपी ठरते. काहीवेळ अंधारात राहिल्यानंतर डोळ्यांना मंद प्रकाशाची सवय होते आणि अधिक तारे दिसू लागतात. मात्र, निरीक्षण करताना वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांपासून दूर राहावे आणि रात्री सुरक्षिततेची काळजी घ्यावी. उल्का दिसल्यास तिची वेळ आणि दिशा नोंदवता येईल. सलग अनेक रात्री निरीक्षण केल्यास, चंद्राचे बदलते रूप आणि ग्रहांची आकाशातील हालचालही लक्षात येऊ शकते. अशा छोट्या कृतींमधूनच निरीक्षणशक्ती, प्रश्न विचारण्याची सवय आणि वैज्ञानिक जिज्ञासा वाढते.
 
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे; पण प्रकाशाचा अर्थ केवळ तेजस्वी रोषणाई एवढाच नाही. तो ज्ञानाचे, शोधाचे आणि अज्ञानातून समजुतीकडे जाण्याचेही प्रतीक आहे. आकाशातील तारे आपल्याला विश्वाच्या प्रचंड विस्ताराची जाणीव करून देतात, ग्रह आपल्या सौरमालेची ओळख करून देतात, तर उल्का अवकाशातील धूलिकण आणि पृथ्वी यांच्यातील संबंध दाखवतात. यंदाच्या दिवाळीत पणत्यांसोबत काही क्षण आकाशासाठीही राखून ठेवूया. फटायांच्या आवाजापलीकडे असलेली शांतता अनुभवूया आणि रात्रीच्या आकाशात दडलेल्या वैज्ञानिक प्रश्नांकडे पाहूया. कारण, विश्वातली ही दिवाळी एका रात्रीपुरतीच मर्यादित नाही. ती प्रत्येक स्वच्छ रात्री आपल्या डोक्यावर सुरू असते. फक्त तिचा प्रकाश पाहण्यासाठी आपल्याला थोडे थांबावे, वर पाहावे आणि प्रश्न विचारायला शिकावे लागते. 
 
लेखक- सुजाता बाबर
 




संबंधित मजकूर