रामायण : भारतीय महाकाव्याचा जागतिक सिनेमॅटिक अविष्कार!

    07-Nov-2026
Ramayana Part 1 Movie Review
 
‘रामायण’ म्हणजे भारताच्या समृद्ध संस्कृतीचा आत्माच! हजारो वर्षांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजलेली ही अमर कथा. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि रावण या व्यक्तिरेखा केवळ पौराणिक पात्रं राहिलेली नाहीत, तर आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि भावविश्वाचा अविभाज्य भाग बनली आहेत. त्यामुळे ‘रामायणा’वरील चित्रपट ही केवळ एक कलात्मक जबाबदारी नसून, कोट्यवधी हिंदूंच्या भावनांशी जोडलेली मोठी परीक्षा आहे आणि या परीक्षेत दिग्दर्शक नितेश तिवारींसह संपूर्ण चित्रपटाचा चमू यशस्वी ठरलेला दिसतो.
 
या पूर्वी ‘रामायणा’ची अनेक रूपं आपण पाहिली. विशेषतः रामानंद सागर यांच्या ‘दूरदर्शन’वरील ‘रामायणा’ने तर अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यामुळे पुन्हा एकदा हीच रामकथा मोठ्या पडद्यावर मांडताना त्यात नवीन काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच. मात्र, दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या प्रश्नाचं उत्तर चित्रपटाच्या भव्यतेतून, तांत्रिक मांडणीतून आणि व्यक्तिरेखांच्या भावनिक प्रवासातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
‘रामायण - पार्ट १’ हा केवळ पौराणिक चित्रपट नाही, तर भारतीय महाकाव्याला जागतिक सिनेमाच्या पातळीवर नेण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. चित्रपट पाहताना अनेकदा आपण एखादा भारतीय चित्रपट पाहत आहोत की एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘फॅण्टसी सिनेमा’च्या विश्वात प्रवेश केला आहे, असा प्रश्न पडतो. मात्र, या भव्यतेच्या केंद्रस्थानी भारतीय संस्कृती आणि ‘रामायणा’ची मूळ भावना कायम ठेवण्याचा प्रयत्न दिसतो.
 
‘रामायणा’ची कथा तशी सर्वश्रुत. अयोध्येचा राजकुमार राम, मिथिलेची राजकन्या सीता, रामाचा निष्ठावान भाऊ लक्ष्मण, कैकेयीच्या दोन वरांमुळे रामाला मिळालेला १४ वर्षांचा वनवास, सीतेचं अपहरण आणि रावणाविरुद्ध उभा राहणारा घनघोर संघर्ष! या सगळ्या घटना भारतीय प्रेक्षकांना नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासमोरचं आव्हान वेगळं होतं. ही कथा माहीत असूनही प्रेक्षकांना ती पुन्हा नव्याने अनुभवायला लावणं. यामध्ये ते बर्‍याच अंशी यशस्वी ठरलेले दिसतात.
 
अयोध्येतील राजवाडे, मिथिलेचं वैभव, वनवासातील निसर्गरम्य परिसर, विविध राज्यांची दृश्यरचना, देवतांचं विश्व आणि लंकेचं सामर्थ्य या सगळ्यांची मांडणी भव्य स्वरूपात करण्यात आली आहे. प्रत्येक दृश्यामध्ये काहीतरी मोठं दाखवण्याचा हा प्रयत्न चांगलाच जमून आला आहे. मात्र, केवळ भव्य दृश्यांची रेलचेल न ठेवता, ‘रामायणा’तील भावबंध, त्याग आणि कर्तव्याची जाणीव जपण्याकडेही दिग्दर्शकाने पुरेपूर लक्ष दिलं आहे.
 
रामाला राज्याभिषेकापूर्वी अचानक वनवासाचा निर्णय समोर येतो. पित्याने दिलेल्या वचनासाठी राम कोणताही विरोध न करता वनवास स्वीकारतोही. त्याच्यासोबत सीता आणि लक्ष्मणही वनवासाला रवाना होतात. या प्रसंगांमधून रामाच्या व्यक्तिरेखेतील संयम, कर्तव्यनिष्ठा आणि नात्यांप्रति असलेला आदर प्रभावीपणे समोर येतो.
 
विशेषतः राजा दशरथ आणि राम यांच्यातील भावनिक नातं चित्रपटाला वेगळी खोली प्रदान करतं. पुत्राला वनवासात जाण्यापासून रोखता न येणार्‍या, रामाच्या विरहाने व्याकूळ झालेल्या दशरथांची अवस्था मनाला सर्वदूर स्पर्श करते. चित्रपटातील अशा काही प्रसंगांमुळे केवळ दृश्यवैभवावर अवलंबून न राहता, कथा भावनिक पातळीवरही प्रेक्षकांशी जोडली जाते.
 
रामासारखी अत्यंत संवेदनशील आणि श्रद्धेशी जोडलेली व्यक्तिरेखा साकारणं, ही खरं तर मोठी जबाबदारी. रणबीर कपूरने या भूमिकेत आक्रमकतेपेक्षा संयमाला अधिक महत्त्व दिलं आहे. रामाच्या चेहर्‍यावरचा शांतपणा, संवादफेकीतील मृदुता, नात्यांबद्दलचा आदर आणि कठीण प्रसंगांमध्येही न ढळणारा आत्मविश्वास, हे गुण त्याच्या अभिनयातून जाणवतात. विशेष म्हणजे, रामाच्या व्यक्तिरेखेत स्वतःचा ‘स्टारडम’ दाखवण्यापेक्षा व्यक्तिरेखेला अधिक महत्त्व देण्याचा रणबीरचा प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल.
 
रावणाची भूमिका यशने उत्तम साकारली आहे. रावण हा केवळ खलनायक नाही, तर तो प्रचंड सामर्थ्यवान, विद्वान, महत्त्वाकांक्षी आणि अहंकारी राजा आहे. त्याच्यातील सामर्थ्याबरोबरच त्याचा अहंकारही तितकाच मोठा. यशने रावणाच्या व्यक्तिमत्त्वाच्या या दोन्ही बाजू मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यशची रावण म्हणून एकूणच देहबोली, त्याच्या डोळ्यांमधून व्यक्त होणारा पराकोटीचा द्वेष, संवादफेक आणि पडद्यावरील संपूर्ण वावर प्रभावी आहे. रामाच्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वाच्या तुलनेत रावणाचा आक्रमक स्वभाव या चित्रपटातून अधिक ठळकपणे समोर येतो. त्यामुळे या दोन्ही व्यक्तिरेखांमधील विरोधाभास चित्रपटाला अधिक प्रभावी बनवतो. रावणाच्या पात्राला हिंदीत शरद केळकरने आवाज दिल्यामुळे, यशचा दर्जेदार अभिनय आणि शरदचा वजनदार आवाज, हे समीकरण उत्तम जुळून आले आहे.
 
अभिनेत्री साई पल्लवी मात्र सीतेच्या भूमिकेत काहीशी ‘मिस फिट’ वाटू शकते. सीतेचं तेज साईच्या चेहर्‍यावर प्रतिबिंबित झालं असतं तर चित्रपटाची शोभा द्विगुणित झाली असती. शूर्पणखेच्या भूमिकेतील रकुलप्रीतसिंगनेही आपल्या वाट्याला आलेली भूमिका चोख निभावली आहे, तर लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबेने छाप सोडली आहे. लक्ष्मण हा रामाचा केवळ भाऊ नसून, त्याचा खंबीर साथीदार आहे. रामाच्या प्रत्येक निर्णयामागे उभं राहण्याची त्याची तयारी आणि सीतेच्या सुरक्षिततेबाबत असलेली काळजी, या भावना रवी दुबेच्या अभिनयातून दिसतात. काही भावनिक प्रसंगांमध्ये त्याच्या डोळ्यांतून व्यक्त होणार्‍या भावना विशेष लक्षवेधी म्हणाव्या लागतील. अरुण गोविल यांची दशरथाच्या भूमिकेतील उपस्थिती जुन्या ‘रामायणा’च्या आठवणी जागवते. लारा दत्ता यांनी कैकेयीची भूमिका साकारली असून, व्यक्तिरेखेतील भावनिक गुंतागुंत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विवेक ओबेराय, अजिंय देव, आदिनाथ कोठारे, कुणाल कपूर, शिबा चड्ढा यांनीही त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत.
 
एकूणच या चित्रपटाचा सर्वांत मोठा आकर्षणबिंदू म्हणजे त्याचं डोळे दीपवणारं दृश्यवैभव! ‘व्हीएफएस’, ‘सीजीआय’, ‘प्रॉडशन डिझाईन’ आणि ‘अ‍ॅशन सीक्वेन्सेस’ यावर मोठ्या प्रमाणात दिग्दर्शकाने मेहनत घेतल्याचे दिसते. विशेषतः चित्रपटातील युद्धप्रसंग लक्षवेधी ठरले आहेत. त्यामुळे दृश्यांमधील भव्यता आणि कॅमेर्‍याने टिपलेली प्रत्येक फ्रेम ही प्रेक्षकांना रामायणाच्या या भावविश्वात अक्षरश: गुंतवून ठेवते. जटायू आणि रावण यांच्यातील युद्धप्रसंग हा तर या चित्रपटाचा सगळ्यात ‘हाय लाईट पॉईंट’ ठरावा. हे युद्ध बघताना अंगावर काटा येतो. मात्र, काही ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार केलेल्या दृश्यांचा कृत्रिमपणाही प्रकर्षाने जाणवतो. काही प्राणी आणि राक्षसी व्यक्तिरेखांची दृश्यरचना अपेक्षित वास्तववादी परिणाम साधत नाही. एवढ्या मोठ्या बजेटच्या चित्रपटात अशा काही त्रुटी अधिक ठळकपणे जाणवतात. तरीही एकूण तांत्रिक मांडणी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची झेप म्हणावी लागेल.
 
हान्स झिमर यांचं पार्श्वसंगीत चित्रपटातील भव्यता अधिक प्रभावी करतं. युद्धप्रसंग, भावनिक क्षण आणि अलौकिक दृश्यांमध्ये पार्श्वसंगीताचा प्रभाव जाणवतो. संगीत केवळ दृश्यांच्या मागे वाजत नाही, तर त्या प्रसंगांचा प्रभाव अधिक वाढवतं. ए. आर. रहमान यांच्या गाण्यांनी मात्र निराशा होऊ शकते. ‘जय जय राम’ हे एक गाणं सोडलं, तर चित्रपटातील एकही गाणं चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर लक्षात राहत नाही.
 
‘दंगल’सारखा चित्रपट देणारे नितेश तिवारी यांनी रामायणाच्या माध्यमातून एका परिचित कथेची भव्य सिनेमॅटिक मांडणी केली आहे. एवढ्या मोठ्या कलाकारांचा संच, अनेक व्यक्तिरेखा, प्रचंड तांत्रिक आव्हानं आणि कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेशी जोडलेली कथा हाताळणं सोपं नव्हतं. मात्र, त्यांनी या सगळ्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी घेतलेली आठ वर्षांची मेहनत पडद्यावर दिसते. चित्रपटात केवळ युद्ध, चमत्कार आणि दृश्यवैभव नाही, तर नात्यांची वीण, कर्तव्याची जाणीव, त्याग आणि मानवी मूल्यांचीही कहाणी आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ पौराणिक कथानकापुरता मर्यादित राहत नाही.
 
‘रामायण-पार्ट १’ हा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी निश्चितच एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे. ‘रामायणा’सारख्या भारतीय महाकाव्याला जागतिक चित्राच्या तोडीची दृश्यात्मक भव्यता देण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद म्हणावा लागेल. काही ठिकाणी ‘व्हीएफएस’चा कृत्रिमपणा आणि संथ कथानक खटकत असलं, तरी चित्रपटाचा एकूण परिणाम प्रभावी आहे. विशेष म्हणजे, ‘रामायणा’सारखी कथा नव्या पिढीपर्यंत मोठ्या पडद्याच्या माध्यमातून पोहोचवण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा. त्यामुळे भारतीय महाकाव्याला जागतिक सिनेमॅटिक भव्यतेची जोड देणारा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवायलाच हवा!
 
चित्रपट : रामायण-पार्ट १
दिग्दर्शक : नितेश तिवारी
लेखन : श्रीधर राघवन, नितेश तिवारी, श्रेयस जैन
प्रमुख कलाकार : रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे, अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय
संगीत : ए. आर. रहमान आणि हान्स झिमर
छायांकन : पंकज कुमार, महेश लिमये
कालावधी : ३ तास १५ मिनिटे
 
- कपिल देशपांडे




संबंधित मजकूर