सेंद्रिय मत्स्यक्रांतीची झेप

 
 
Organic Aquaculture
 
समुद्र, नद्या आणि तलावांमधील मत्स्यसंपदा ही केवळ अन्नसुरक्षेची गरज नसून जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे आर्थिक साधन बनत आहे. मात्र, वाढते जलप्रदूषण, मत्स्यपालनातील रासायनिक घटकांचा वापर, प्रतिजैविकांचा अतिरेक आणि पर्यावरणीय असमतोल, यामुळे जगभरात सुरक्षित आणि पर्यावरणपूरक मत्स्य उत्पादनांची मागणी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सेंद्रिय मत्स्यपालन अर्थात, ‘ऑर्गेनिक अ‍ॅक्वाकल्चर’ हे जागतिक मत्स्यव्यवसायातील वेगाने विकसित होणारे क्षेत्र ठरत आहे.
 
‘मॉर्डन इंटेलिजन्स’च्या २०२६च्या अंदाजानुसार, जागतिक सेंद्रिय मत्स्य बाजारपेठेचे मूल्य २०२५ मधील २.५६ अब्ज अमेरिकी डॉलरवरून २०२६ मध्ये २.७१ अब्ज डॉलरवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. २०३१ पर्यंत ही बाजारपेठ ३.६३ अब्ज डॉलरपर्यंत विस्तारू शकते. २०२६ ते २०३१ या कालावधीत ६.०२ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (उअॠठ) अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये युरोपचा जागतिक बाजारपेठेतील महसुली वाटा ३६.१२ टक्के होता. दुसरीकडे आशिया-पॅसिफिक प्रदेशात २०३१ पर्यंत ७.९० टक्के वार्षिक वाढ अपेक्षित असून, भविष्यातील बाजारपेठ विस्ताराचे प्रमुख केंद्र म्हणून या प्रदेशाकडे पाहिले जात आहे.
 
स्वित्झर्लंडस्थित ‘सेंद्रिय शेती संशोधन संस्था (ऋळइङ)’ आणि ‘आंतरराष्ट्रीय सेंद्रिय कृषी चळवळींचा महासंघ’ (खऋजअच) यांच्या ‘द वर्ल्ड ऑफ ऑर्गेनिक अ‍ॅग्रीकल्चर २०२५’ अहवालानुसार, जागतिक सेंद्रिय मत्स्यपालनाचे उत्पादन ५ लाख १० हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक होते. त्यापैकी आशिया खंडाचा वाटा ६१ टक्के, तर युरोपचा ३५ टक्के होता. चीनने ३ लाख १३ हजार १६८ मेट्रिक टन उत्पादनासह जागतिक स्तरावर पहिले स्थान पटकावले. नॉर्वे ५४ हजार १११ टनांसह दुसर्‍या, तर आयर्लंड ३४ हजार टनांसह तिसर्‍या क्रमांकावर होते. इटली, कॅनडा, नेदरलॅण्ड्स, ब्रिटन, ग्रीस, फ्रान्स आणि डेन्मार्क हे अन्य प्रमुख उत्पादक देश आहेत.
 
नॉर्वेने ‘सॅल्मन’ मत्स्यपालनात आधुनिक तंत्रज्ञान आणि कठोर प्रमाणन व्यवस्थेच्या जोरावर जागतिक ओळख निर्माण केली आहे. आयर्लंडमध्ये सेंद्रिय ‘सॅल्मन’ आणि शिंपल्यांचे उत्पादन महत्त्वाचे आहे. इटली आणि नेदरलॅण्ड्स शिंपले व अन्य सागरी उत्पादनांसाठी ओळखले जातात. फ्रान्स ‘ऑयस्टर’ आणि ‘ट्राऊट’ उत्पादनात आघाडीवर आहे, तर कॅनडाही सेंद्रिय मत्स्यपालनाच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
 
सेंद्रिय मत्स्यपालनात पारंपरिक पद्धतींबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. ‘रिसर्युलेटिंग अ‍ॅक्वाकल्चर सिस्टम’ (ठअड) या तंत्रज्ञानात पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे मर्यादित जागेत, नियंत्रित वातावरणात मत्स्यपालन शक्य होते. ‘बायोफ्लॉक’ तंत्रज्ञानात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने पाण्यातील नायट्रोजनयुक्त सेंद्रिय घटकांचे व्यवस्थापन केले जाते. यामुळे पाण्याची गुणवत्ता राखण्यास आणि खाद्य खर्च कमी करण्यास मदत होते.
 
याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर्स, स्वयंचलित खाद्यपुरवठा, पाण्यातील ऑक्सिजन आणि तापमानाचे डिजिटल निरीक्षण, रोगांचे पूर्वानुमान आणि ‘ट्रेसिबिलिटी’ यामुळे मत्स्यपालन अधिक अचूक आणि कार्यक्षम होत आहे. मात्र, केवळ पुनर्चक्रीय मत्स्यपालन प्रणाली किंवा ‘बायोफ्लॉक’ वापरल्याने उत्पादन सेंद्रिय ठरत नाही. त्यासाठी प्रमाणित खाद्य, औषधवापरावरील नियम, पर्यावरणीय निकष आणि अधिकृत सेंद्रिय प्रमाणन आवश्यक असते.
 
भारताकडे विस्तीर्ण समुद्रकिनारा, गोड्या पाण्याचे स्रोत, मत्स्यपालनाचा अनुभव आणि मोठी निर्यात क्षमता आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत सेंद्रिय मत्स्यपालनाला चालना देण्याची मोठी संधी आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, शीतसाखळी, प्रक्रिया उद्योग आणि आंतरराष्ट्रीय प्रमाण यांची सांगड घातल्यास भारतीय मत्स्य उत्पादनांना जागतिक ‘प्रीमियम’ बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे आता मत्स्यव्यवसायाचे यश केवळ किती मासे पकडले किंवा उत्पादित केले यावर ठरणार नाही; तर ते किती सुरक्षित, गुणवत्तापूर्ण, पर्यावरणपूरक आणि जागतिक निकषांनुसार प्रमाणित आहेत, यावर ठरेल. सेंद्रिय मत्स्यपालन ही केवळ उत्पादनाची नवी पद्धत नसून, निळ्या अर्थव्यवस्थेला शाश्वत विकासाची दिशा देणारी संधी आहे.
  




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर