कराचीजवळ लष्कर-ए-तोयबाचे सागरी दहशतवादी प्रशिक्षण!

    07-Nov-2026   
 
Lashkar-e-Taiba Marine Terror Training Near Karachi
 
मुंबई (Lashkar-e-Taiba Marine Terror Training Near Karachi) : पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी पर्यटकांच्या वेशात सागरी वातावरणात प्रशिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. कराचीपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चारना बेटावर दहशतवाद्यांना युद्धासाठी पोहणे (कॉम्बॅट स्विमिंग), स्कुबा डायव्हिंग आणि पाण्याखालील अन्य कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे उघड झाले आहे. निसर्गरम्य परिसर आणि डाइव्हिंगसाठी असलेल्या अनेक ठिकाणांमुळे चारना बेट पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाच्या ‘दावा मरीन विंग’ किंवा ‘सदा-ए-हुर्रियत’ या गटातील दहशतवादी येथे प्रशिक्षण घेत आहेत.
 
अशी माहिती आहे की, यापूर्वीही या दहशतवादी संघटनेचे सदस्य पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मंगला धरण परिसरात सराव करताना आढळले होते. तसेच दहशतवादी तळांवर उभारण्यात आलेल्या विशेष जलतरण तलावांमध्येही त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. भारताने गेल्या काही वर्षांत ‘ऑपरेशन सिंदूर’सह विविध लष्करी कारवायांमध्ये क्रूझ क्षेपणास्त्रे आणि अचूक मारा करणाऱ्या बॉम्बच्या साहाय्याने अशा अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य करून उद्ध्वस्त केले होते. (Lashkar-e-Taiba Marine Terror Training Near Karachi)
 
असे सांगण्यात येते आहे की, कराचीच्या जवळ असलेल्या या बेटावर सागरी मोहिमांसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या दहशतवाद्यांना सामान्य पर्यटक म्हणून दाखवले जाते. स्कुबा डायव्हिंगसारख्या मनोरंजक उपक्रमांसाठी ते येथे आल्याचे भासवले जाते. त्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक पाकिस्तानातील ‘मरकझी मुस्लिम लीग’ या संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटनाही लष्कर-ए-तोयबाचीच एक शाखा असल्याचे सांगितले जाते. (Lashkar-e-Taiba Marine Terror Training Near Karachi)
 
गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, लष्कर-ए-तोयबा सागरी वातावरणात कारवाया करण्यासाठी स्वतःला सक्षम बनवण्याचे प्रयत्न करत आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी समुद्रमार्गेच मुंबईत दाखल झाले होते. या संघटनेने २००८ पासून मर्यादित स्वरूपात सागरी दहशतवादी पथक कार्यरत ठेवले आहे. मात्र, आता मोठ्या प्रमाणावर सागरी हल्ले घडवून आणण्याच्या दृष्टीने संघटनेचे प्रयत्न अधिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, भारतीय सुरक्षा यंत्रणांना या संभाव्य धोक्याची पूर्ण जाणीव असून, समुद्रमार्गे उद्भवू शकणारा कोणताही धोका रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
 
काश्मीरमध्ये तरुणांची भरती आणि कट्टरतावादासाठी सोशल मीडियाचा वापर
 
लष्कर-ए-तोयबाचे एक दहशतवादी मॉड्यूल सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची भरती आणि त्यांचे कट्टरतावादीकरण करत असल्याचे ६ नोव्हेंबर दरम्यान उघड झाले. यानंतर काश्मीरमधील काउंटर इंटेलिजन्स काश्मीर या यंत्रणेने जम्मू-काश्मीरमधील सहा ठिकाणी छापे टाकले. पुलवामा जिल्ह्यातील एका गावासह बडगाम, श्रीनगर, बिजबेहारा आणि अनंतनागमधील मट्टन येथील विविध ठिकाणांची झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान तपासासाठी महत्त्वाचे ठरू शकतील अशी कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. मोहम्मद यासीन मीर या पदवीधर तरुणाच्या घराचीही झडती घेण्यात आली. त्याची आई तबस्सुम शाहीन ही पाकिस्तानी नागरिक असून, ती गेल्या वर्षी २९ एप्रिल रोजी पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर ती अद्याप भारतात परतलेली नाही, असे सांगितले जात आहे. (Lashkar-e-Taiba Marine Terror Training Near Karachi)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर