मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार्या क्रांती रेडकर ‘मैत्रेया’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चार नव्या चेहर्यांना घेऊन त्या एका रंगतदार, संगीतप्रधान चित्रपटासह सज्ज झाल्या आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
- पहिल्या ‘काकण’ या चित्रपटानंतर पुढचा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी एवढा मोठा कालावधी का लागला?
खरं सांगायचं तर, पहिल्या चित्रपटानंतर मी ‘रेनबो’ नावाचा आणखी एक चित्रपट केला. त्यामध्ये शरद केळकर, उर्मिला कोठारे, सोनाली आणि ऋषी सक्सेना असे कलाकार आहेत. तो चित्रपट पूर्ण झाला आहे आणि लवकरच प्रदर्शित होईल. त्यानंतर ‘कोविड’चा काळ आला. त्यामुळे जवळपास चार वर्षे कामच थांबले होते. उरलेल्या काळात मी बर्यापैकी लेखन करत होते. त्याचवेळी माझी मुलंही लहान होती. त्यांना सोडून चित्रपट बनवण्यासाठी बाहेर पडणं माझ्यासाठी थोडं कठीण होतं. त्यामुळे मातृत्व आणि कुटुंबाला प्राधान्य देत मी काही काळासाठी अल्पविराम घेतला. मात्र, आता पूर्ण तयारीनिशी आणि चार नवीन चेहर्यांना घेऊन मी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आले आहे.
- ‘काकण’ आणि ‘मैत्रेया’ हे दोन्ही चित्रपट विषय, मांडणी आणि आशयाच्या दृष्टीने एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. दिग्दर्शिका म्हणून या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता विषय अधिक आव्हानात्मक वाटला? गंभीर, भावनिक विषय हाताळणं कठीण की चार नव्या कलाकारांना घेऊन मनोरंजनाची भव्य दुनिया उभी करणं?
दोन्ही चित्रपट माझ्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी महत्त्वाचे आहेत. ‘काकण’ हा चित्रपट करताना एक वेगळा भावनिक प्रवास होता. त्या चित्रपटाची कथा, त्यातील भावना आणि पात्रांमधील नातेसंबंध प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे मोठं आव्हान होतं. ‘मैत्रेया’ मात्र पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. यात मनोरंजन, संगीत, नृत्य, रंगतदारपणा आणि तरुणाईची ऊर्जा आहे. त्यामुळे दिग्दर्शिका म्हणून मला प्रत्येक वेळी स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागलं. माझ्यासाठी आव्हान हे केवळ विषयाचं नसतं, तर तो विषय पडद्यावर किती प्रभावीपणे मांडता येतो, हे अधिक महत्त्वाचं असतं. ‘काकण’ करताना भावनिक पातळीवर प्रेक्षकांशी जोडणं महत्त्वाचं होतं, तर ‘मैत्रेया’ करताना प्रेक्षकांना एका वेगळ्या मनोरंजनविश्वात घेऊन जाणं महत्त्वाचं होतं. विशेषतः चार नव्या कलाकारांना घेऊन त्यांच्याकडून अपेक्षित काम करून घेणं, त्यांना व्यक्तिरेखांमध्ये घडवणं आणि त्यांच्यातील क्षमता बाहेर आणणं, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी होती. मला असं वाटतं की, दिग्दर्शक म्हणून एकाच प्रकारच्या चित्रपटात अडकून राहता कामा नये. प्रत्येक वेळी वेगळा विषय हाताळायला हवा, नवीन प्रयोग करायला हवेत. त्यामुळे ‘काकण’ आणि ‘मैत्रेया’ यांची तुलना करण्यापेक्षा या दोन्ही चित्रपटांनी मला एक दिग्दर्शिका म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर समृद्ध केलं, असं मी नक्कीच म्हणेन.
- ‘मैत्रेया’मधील चार कलाकारांची निवड नेमकी कशी झाली? त्यासाठी काही विशेष प्रक्रिया राबवली होती का?
या चौघांची निवड सहजासहजी झालेली नाही. प्रत्येकासाठी ऑडिशन्स, वर्कशॉप आणि लुक टेस्ट अशी संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. स्काय माझ्यासोबत ‘रेनबो’ चित्रपटात असिस्टंट म्हणून काम करत होता. त्याला अभिनयाची आवड होती; पण माझं म्हणणं होतं की, आधी तुला फिल्ममेकिंग समजलं पाहिजे. त्याने अनेक वर्कशॉप्स केली, शिक्षण घेतलं आणि संपूर्ण चित्रपटात असोसिएट म्हणून काम केलं. त्यानंतरच त्याला अभिनयाची संधी दिली. आयुषीबाबत सांगायचं तर, ती माझी ‘विश कास्ट’ होती. तिचं दिसणं, तिचं व्यक्तिमत्त्व आणि तिचं सुंदर हास्य मला खूप आवडतं. रुचीला मी समाजमाध्यमांवर पाहिलं होतं. तिचा एक फोटो पाहून मी तिच्याकडे आकर्षित झाले. तिचे डोळे, केस आणि एकूणच लूक मला साजरीच्या भूमिकेसाठी योग्य वाटला. त्यानंतर तिच्याशी संपर्क साधला. तिची ऑडिशन घेतली आणि तिने उत्तम काम केलं. समरची निवडही अतिशय रंजक पद्धतीने झाली. मी निर्मात्यांना चित्रपटाची कथा ऐकवत असताना तो तिथे आला होता. त्याला पाहिल्यानंतर मला निर्वाणची व्यक्तिरेखा त्याच्यात दिसली. त्याचा स्टायलिश लूक, चेहर्यावरचं व्यक्तिमत्त्व आणि एक वेगळा आत्मविश्वास मला जाणवला. स्कायला तर मी आधीपासूनच ओळखत होते; शिवाय ‘रेनबो’ला तो माझा साहाय्य्क दिग्दर्शक म्हणूनही होता. त्यामुळे त्याला या सिनेमात घ्यायचं, हे आधीपासूनच ठरलं होतं. अशा पद्धतीने प्रत्येक कलाकाराची निवड झाली.
- एकीकडे तुम्ही दिग्दर्शिका आहात आणि दुसरीकडे अभिनेत्रीही आहात. मग या दोन्ही भूमिकांमध्ये कधी संघर्ष झाला का?
खरं सांगायचं तर, या चित्रपटात माझ्यासाठी अशी कोणतीही भूमिका नव्हती. जर मला करायचीच असती, तर मी आयुषीची भूमिका केली असती. पण, आयुषीची भूमिका माझ्या वयोगटातली नसल्यामुळे मी ती करू शकत नव्हते. इतर व्यक्तिरेखाही मला शोभणार्या नव्हत्या. त्यामुळे अभिनेत्री आणि दिग्दर्शिका यांच्यात संघर्ष होण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, गणपतीच्या गाण्यात मी आणि उर्मिला कोठारेने एक छोटीशी झलक दिली आहे. ते गाणं करताना आम्हाला पुन्हा एकदा नृत्य करण्याचा आनंद घेता आला. खरं तर, मला नाचायला खूप आवडतं. त्यामुळे गाण्यात संधी मिळताच, मी उर्मिलालाही फोन केला आणि म्हटलं, "अगं लवकर ये, आपल्याला नाचायला मिळणार आहे,” अशा पद्धतीने आम्ही दोघींनी त्या गाण्यात धमाल केली.
(मुलाखत : कपिल देशपांडे)