अन्नान्न दशा असणार्या गरीब घरांतील मुलांना शिक्षणाकडे वळवून संस्कृतची दिशा दाखवणार्या आणि भावी शिक्षक घडवणार्या हरहुन्नरी गुरू जगदीश इंदलकर यांच्याविषयी...
रोजच्या भाकरीसाठी वणवण फिरावे लागत असेल, तर त्या घरातील मूल शिक्षणाकडे वळणे जवळपास अशक्यच. मुलींचे लवकर होणारे विवाह आणि मुलांना शाळेत पाठवण्यापेक्षा आई-वडिलांसोबत कामाला नेणे; अशा परिस्थितीतील मुलांच्या घरोघरी जाऊन, त्यांना शाळेत येण्यासाठी प्रवृत्त करून चक्क संस्कृतसारख्या दुर्लक्षित विषयाची रुची निर्माण करण्याचे काम, जगदीश इंदलकर मागील दोन तपांपासून करत आहेत.
जगदीश हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील. वडील सुशिक्षित कामगार, तर आई गृहिणी. पण, कुटुंब संस्कारी आणि श्रद्धाळू. जगदीश यांनी आठवीला ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ म्हणून संस्कृतची निवड केली खरी; पण पुढे तोच त्यांचा श्वासही बनला. त्यांच्या वडिलांनीही आपल्या मुलाची आवड हेरून, संस्कृत शिकण्यास प्रोत्साहन दिले. भविष्यातील संधींची फारशी कल्पना नसतानाही, त्यांनी रुईया महाविद्यालयात संस्कृतसाठी प्रवेश घेतला. तेथे भेटलेल्या त्यांच्या गुरू तरंगिणी खोत आणि डॉ. मंजूषा गोखले यांनी, त्यांच्या संस्कृतजीवनाला खर्याअर्थी पैलू पाडले. जगदीश यांचे संस्कृतचे ज्ञान, गुणवत्ता आणि क्षमता हेरून, गुरूंनी त्यांना नवनवीन संधीही उपलब्ध करून दिल्या.
बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे, जगदीश अकरावीपासूनच लहान मुलांचे शिकवणीवर्ग घेत. त्यामुळे शिकवण्याचा थोडा-बहुत अनुभव गाठीशी असतानाच, त्यांना दादरमधील ‘आयईएस’ संस्कृत केंद्राच्या ‘शिक्षक प्रशिक्षण वर्गा’बद्दल समजले. त्यांच्या महाविद्यालयातीलच शिक्षिका तेथेही शिकवत असल्याने, ते मोठ्या उत्साहाने वर्गात शिकायला गेले. पण, त्यांच्या गुरूंनी त्यांना वर्गाच्या पहिल्याच दिवशी थेट शिकवण्याचीच संधी दिली. एक १८-१९ वर्षांचा मुलगा, आता भावी शिक्षकांना शिकवू लागला होता. त्याच वर्गात त्यांना अभ्यासक्रमनिर्मितीचेही कसब अवगत झाले. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, लहान मुलांना खिळवून ठेवत नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून शिकवणे त्यांना हळूहळू जमू लागले.
स्वप्रतिभेच्या जोरावर त्यांचे अध्यापन अधिकाधिक समृद्ध होत गेले.त्यांचे संस्कृत संभाषणकौशल्य पाहून, त्यांना ‘संस्कृतभारती’च्या शिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी बंगळुरूला जाण्याची संधी मिळाली. तेथे डॉ. माधव केळकर, जनार्दन हेगडे व चमु कृष्णशास्त्री यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन आल्यावर, जगदीश यांनी लागोपाठ संस्कृत संभाषण शिबिरांत शिकवले. वेगवेगळ्या वयोगटांना शिकवताना, ते स्वतःही प्रगल्भ होत गेले.
संस्कृतात पदवी संपादन केल्यानंतर जगदीश यांनी, डॉ. बा. रा. दीक्षित आणि डॉ. नलिनी चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वैयाकरणभूषणसार’, ‘वायपदीय’, ‘महाभाष्य’, ‘न्यायशास्त्र’ या ग्रंथांचे गुरुकुलपद्धतीने अध्ययन केले. त्यांनी व्याकरणशास्त्रात पदव्युत्तर पदवी, पुढे ‘बीएड’, ‘एमएड’ आणि ‘एमफिल’ही पूर्ण केले. पण, केवळ आपल्या नावामागील पदव्यांची संख्या वाढवण्यापेक्षा, विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे लक्ष देण्यासच जगदीश यांनी प्राधान्य दिले. विद्यार्थ्याच्या मनात बालपणापासूनच संस्कृतचा संस्कार रुजावा, यासाठी जगदीश प्रयत्नरत असतात. एखाद्या सुप्रसिद्ध महाविद्यालयातील उच्चवर्गीय मुलांना शिकवण्यापेक्षा त्यांना आडगावात नवीन शाळा उभारून, तिथे नव्याने संस्कृत सुरू करून शिकवायला जास्त आवडते. त्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट ’जगदीश सर’ मोठ्या आनंदाने घेतात.
सध्या ते धारावीतल्या एका अतिशय निम्नवर्गीय मुलांच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या मुलांनी शाळेत यावे, यासाठी ‘अमरकोश’पठण, हितोपदेश परिसंवाद, प्रश्नमंजूषा, संस्कृत भारुड, नाटक, कीर्तन यांसारखे विविध उपक्रम राबवत त्यांना प्रोत्साहित करतात. पंचकोशाधारित उपक्रम राबवत, त्यांनी आपल्या शाळेला ‘निपा’ने निवडलेल्या राज्यातील उच्च तीन शाळांपैकी एक होण्याचा बहुमानही मिळवून दिला. विद्यार्थ्यांच्या यशाने त्यांच्या शाळेला सलग सात वर्षे ‘वासुदेवशास्त्री पणशीकर स्मृती पुरस्कार’ही मिळाला. ‘शिक्षणाची वारी’सारखे अनोखे उपक्रम राबवत, पुस्तकापलीकडे जात, खर्या अर्थी ‘माणूस घडवणारे गुरू’ म्हणून ’जगदीश इंदलकर सर’ ख्यातनाम आहेत.
जगदीश हे मागील अनेक वर्षे ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रम मंडळासह, महाराष्ट्र शासनाच्या ‘संस्कृत अभ्यास मंडळा’चेही सक्रिय सदस्य आहेत. पुस्तकातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी, जगदीश यांनी संपूर्ण राज्यभर संचार करत शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले. सर्व संस्कृत शिक्षकांना एकत्र आणले. अध्यापनाला शिक्षणशास्त्राची आणि बालमानसशास्त्राची जोड देत, संस्कृत केवळ ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ न राहता, मुलांना त्याविषयी आपुलकी वाटावी, यासाठी ते प्रयत्नरत आहेत. शिक्षणशास्त्रविषयक त्यांची विविध पुस्तकेही, नवोदित शिक्षकांना मार्गदर्शक ठरतात. यासह ते आपल्या संस्कृत कथा-लेख लेखन आणि वृत्तपत्रीय संस्कृतविषयक लेखनाच्या माध्यमातून, देशभरात पोहोचले आहेत.
वेगवेगळ्या प्रांतांतील संस्कृत शिक्षकांसोबत चर्चा करताना, त्यांना अनेक संस्कृत शब्दांच्या उच्चारणातील भेद आढळले. ते निवारण्यासाठी उच्चारणशास्त्राचा सखोल अभ्यास करून, ‘महर्षि विद्या प्रतिष्ठान’ आणि ‘रुईया संस्कृत विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी साकारलेली ‘उच्चारण कार्यशाळा’ आजतागायत अखंडितपणे सुरू आहे.
जगदीश यांना त्यांच्या संस्कृतकार्यासाठी, महाराष्ट्र शासनाचा ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा’सह, त्यांच्या २०हून अधिक शोधनिबंधांपैकी दोन निबंधांना ‘उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कारा’नेही गौरवण्यात आले आहे.
जगदीश यांनी घडवलेले विद्यार्थी आज स्वतः शिक्षक होत, वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयांतील संस्कृत विभाग चालवतात. याचे जगदीश यांना समाधान तर मिळतेच, त्याचबरोबर पुढील पिढीतील आणखी विद्यार्थ्यांना संस्कृतकडे वळवण्याची ऊर्जाही मिळते. जगदीश इंदलकर यांच्याकडून देशाला असेच आणखी उत्तमोत्तम संस्कृतसेवक मिळोत, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
-ओवी लेले
९८६९३४५७५३