फटाक्यांचा आनंद घ्या, पण धोका टाळा! बीएमसी आणि मुंबई अग्निशमन दलाकडून मुंबईकरांसाठी अग्निसुरक्षेच्या विशेष मार्गदर्शक सूचना जारी!

 
BMC Diwali Fire Safety Guidelines
 
मुंबई (BMC Diwali Fire Safety Guidelines) : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि मुंबई अग्निशमन दलाने नागरिकांसाठी अग्निसुरक्षेबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिवाळी उत्साहात आणि आनंदात साजरी करताना आगीच्या दुर्घटना तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
दिवाळीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी, घरांमध्ये पणत्या आणि दिवे लावणे तसेच विद्युत रोषणाई करण्याचे प्रमाण वाढते. मात्र, यावेळी थोडासा निष्काळजीपणा देखील आगीच्या गंभीर दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे स्वतःसह कुटुंबीयांची आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सण साजरा करण्याचे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. (BMC Diwali Fire Safety Guidelines)
 
मुंबई अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी डॉ. दीपक घोष यांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. फटाके फोडण्यासाठी इमारती, झाडे, उघड्या विद्युत वाहिन्या, गॅस पाइपलाइन आणि वाहनतळ यांपासून दूर असलेल्या मोकळ्या जागेची निवड करावी. लहान मुलांना प्रौढ व्यक्तींच्या देखरेखीशिवाय फटाके फोडण्याची परवानगी देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
तसेच, प्रत्येक उंच इमारतीमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट उपलब्ध असणे आवश्यक असून, अशा सुविधा नसलेल्या इमारतींनी त्या बसविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आणि बचावकार्य प्रभावीपणे करण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरते. (BMC Diwali Fire Safety Guidelines)

फटाके फोडताना कोणती काळजी घ्यावी?
 
मुंबई अग्निशमन दलाने जारी केलेल्या सूचनांनुसार, फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत. नायलॉन आणि पॉलिस्टरचे कपडे टाळावेत. बंद पादत्राणे आणि सुरक्षा चष्म्याचा वापर करावा. फटाके पेटवताना जवळ पाण्याची बादली ठेवावी. एका वेळी एकच फटका पेटवावा आणि त्यासाठी लांब अगरबत्ती किंवा मेणबत्तीचा वापर करावा. विद्युत रोषणाई करताना अतिरिक्त विद्युत भार पडणार नाही, तसेच वायरिंग सैल राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. विद्युत जोडणीचे काम प्रशिक्षित इलेक्ट्रिशियनकडूनच करून घ्यावे. (BMC Diwali Fire Safety Guidelines)
 
या चुका टाळण्याचे आवाहन
 
घरात, इमारतींच्या आतील भागात किंवा जिन्यांमध्ये फटाके फोडू नयेत. फटाके पेटवण्यासाठी आगपेटी किंवा लायटरचा वापर टाळावा. रॉकेट आणि इतर फटाके माणसे, प्राणी किंवा घरांच्या दिशेने सोडू नयेत. पडदे आणि ज्वलनशील वस्तूंच्या जवळ पणत्या ठेवू नयेत. तसेच पेट न घेतलेला फटाका पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. अशा फटाक्यावर पाणी टाकून तो पूर्णपणे विझवावा.
 
आपत्कालीन परिस्थितीत १०१ वर संपर्क साधा
 
आगीची घटना किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय ९०७६३३३१०१, ९०७६३३३१०२, ९०७६३३३१०३, ९०७६३३३१०४ आणि ९०७६३३३१०५ या क्रमांकांवरही मदत मागता येईल. (BMC Diwali Fire Safety Guidelines)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर