रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षातील कार्याचा आढावा घेतला, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे संघाचा विस्तार केवळ भौगोलिक पातळीवर झालेला नाही, तर समाजाच्या विविध स्तरांपर्यंत त्याची पोहोच अधिक व्यापक झाली आहे. संघाने समाजाच्या दारापर्यंत पोहोचण्याचा जो संकल्प केला, त्याला मिळालेला प्रतिसाद अनेकांच्या राजकीय आकलनाला धक्का देणारा आहे. शताब्दी वर्षात देशभरातील दहा कोटींहून अधिक कुटुंबांपर्यंत संघाचा गृहसंपर्क झाला. या अभियानादरम्यान सुमारे ९९ टक्के नागरिकांनी स्वयंसेवकांचे स्वागत केले. हा आकडा केवळ स्वागताचा नाही, तर समाजातील संघाविषयीची उत्सुकता, संवादाची तयारी आणि स्वयंसेवकांशी जोडले जाण्याची मानसिकता दर्शविणारा आहे.
शताब्दी वर्षातील ‘हिंदू संमेलने’ हा संघाच्या सामाजिक संपर्काचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. देशभरात ६५ हजारांहून अधिक हिंदू संमेलने आयोजित करण्यात आली. या संमेलनांमध्ये तब्बल ४ कोटी ९३ लाख ७६ हजार नागरिकांनी सहभाग घेतला. जात, पंथ, भाषा, प्रांत आणि आर्थिक स्तर अशा विविध भेदांनी विभागल्या गेलेल्या समाजाला एका व्यापक सांस्कृतिक सूत्रात जोडण्याचा प्रयत्न या संमेलनांच्या माध्यमातून झाला. त्यामुळे या संमेलनांचे महत्त्व केवळ त्यांची संख्या किती होती, यावरून ठरत नाही. तर, त्यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या सामाजिक सहभागातून ते अधोरेखित होते. विशेष म्हणजे, या संमेलनांची व्याप्ती अरुणाचल प्रदेश, लडाख, अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंत होती.
संघाबद्दल आणखी एक आक्षेप वारंवार घेतला जातो की, ‘संघ हे विशिष्ट विचारांच्या लोकांचे संघटन आहे; ते तरुणांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले.’ मात्र, शताब्दी वर्षातील युवा संमेलनांची आकडेवारी या दाव्याला छेद देणारी ठरली. देशभरात आयोजित युवा संमेलनांमध्ये ३८ लाखांहून अधिक ‘जेन-झीं’नी सहभाग घेतला. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, संघाचे शताब्दी वर्ष हे नव्या पिढीशी संवाद साधण्याची आणि भविष्याच्या भारताविषयी तिच्याशी विचारविनिमय करण्याची संधी म्हणूनही त्याकडे पाहिले गेले. १०० वर्षांची परंपरा असलेली संघटना नव्या पिढीपर्यंत पोहोचत असेल, तर तिच्या कार्यपद्धतीत काळानुरूप संवादाची क्षमता आहे, हे मान्य करावे लागेल.
संघे शक्ति: युगे युगे...
हा कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचलेला संपर्क, ६५ हजारांहून अधिक हिंदू संमेलने, त्यात जवळपास पाच कोटी नागरिकांचा सहभाग, युवा संमेलनांना ३८ लाखांहून अधिक तरुणांचा प्रतिसाद आणि देशभरातील ६३ हजार ठिकाणी शाखांचे विस्तारलेले जाळे... ही आकडेवारी एखाद्या संघटनेच्या सामाजिक विस्ताराची साक्ष देत असेल, तर त्यावर चर्चा होणे स्वाभाविकच. मात्र त्याऐवजी, ‘संघावर बंदी घाला, संघाची नोंदणी नाही, संघाची रचना संशयास्पद आहे, संघात दहशतवादी तयार केले जातात,’ अशाप्रकारचे आरोप पुन्हापुन्हा पुढे केले जात असतील, तर त्यामागील राजकीय अस्वस्थताही लपून राहत नाही.
संघावर बंदी घालण्याची भाषा म्हणा नवीन नाहीच. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही संघाला बंदीचा सामना करावा लागला. वेगवेगळ्या राजकीय परिस्थितींमध्ये संघाला लक्ष्य करण्यात आले. मात्र, प्रत्येक वेळी संघाचे काम पुन्हा अधिक जोमाने उभे राहिले. उलट, काळाच्या ओघात त्याचा विस्तार होत गेला. त्यामुळे आजही संघावरील बंदीची मागणी करणार्यांनी इतिहासातून काही धडे घेण्याची गरज आहे. एखाद्या विचाराला प्रशासकीय आदेशाने संपवता येते का? एखाद्या संघटनेचे सामाजिक अस्तित्व बंदीच्या घोषणांनी पुसता येते का? समाजात मुळे रुजविलेल्या संघटनेला केवळ राजकीय विरोधातून संपविण्याचे प्रयत्न यशस्वी होतात का? या प्रश्नांची उत्तरे इतिहासाने वारंवार दिली आहेत.
संघाच्या शताब्दी वर्षातील ही आकडेवारी विरोधकांच्या कानशिलात लगावणारी आतषबाजी ठरावी, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, ही आकडेवारी केवळ संघाने मांडलेली स्वप्रशंसा नाही, तर लाखो नागरिकांच्या सहभागातून उभे राहिलेले एक व्यापक आणि अत्यंत आश्वासक असे सामाजिक चित्र आहे. या चित्राकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यावर प्रश्न विचारता येतील, त्याचे मूल्यमापन करता येईल; पण त्याला नाकारता येणार नाही. या वास्तवाकडे डोळेझाक करून संघाला संपविण्याची स्वप्ने विरोधकांनी पाहणे म्हणजे, स्वतःचीच फसवणूक करून घेण्यासारखेच!