आपल्या संस्कृतीमध्ये डॉक्टरांना देवाचे रुप मानले गेले आहे. मात्र, अनेकदा काही दु:खद प्रसंगांत या डॉक्टरांनाच मारहाणीचे प्रसंग समोर येतात. याची वाढणारी तीव्रता डॉक्टरांच्या मनस्थितीवरही साहजिकच परिणाम करणारी ठरते. म्हणूनच राज्य शासनाने डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या विरोधात कायदा केला आहे. त्यानिमित्ताने...
दवाखाना आणि रुग्णालये म्हणजे, रुग्ण व गरजूंच्या उपचारांसाठीची अत्यावश्यक बाब. रुग्णांना उपचार देत, त्यांचे आयुष्य निरोगी राखण्यातील डॉक्टर, निम-वैद्यकीय कर्मचार्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. असे असतानाही डॉक्टर, रुग्ण अथवा निम-वैद्यकीय कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न बर्याचदा निर्माण होताना दिसतो. काही वर्षांपूर्वी रुग्णालय परिसरात हिंसक व तोडफोडीच्या घटना झाल्याचेही आपण अनेकदा वाचलेले ऐकलेले असते. यावर उपाययोजना म्हणून, रुग्णांवर उपचार करून, त्यांचे विविध आजार व रोगांपासून संरक्षण करणार्या डॉक्टर आणि रुग्णालयांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात एक विशेष कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, तेवढेच पुरेसे ठरणार नाही म्हणून काही रुग्णालयांमध्ये रुग्णालय, डॉक्टर व इतर कर्मचार्यांच्या संरक्षणासाठी विशेष अंगरक्षकांचीही नेमणूक करण्याची वेळ आली आहे. मात्र, हे उपाय डॉक्टरांच्या संरक्षणासाठी पुरेसे नसल्याची जाहीर प्रचिती वारंवार घडलेल्या घटनांद्वारा आली असून, त्यावर व्यापकपणे विचार करण्याची गरज तातडीने निर्माण झाली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस मध्यरात्रीच्या सुमारास, घाटकोपर परिसराच्या दिशेने सायरन वाजवणारी वाहने मोठ्या संख्येत जाऊ लागली. मात्र, सायरनच्या आवाजासह लगबगीने रुग्णालयाकडे जाणारी ही वाहने रुग्णवाहिका नव्हत्या, तर त्या पोलिसांच्या गाड्या होत्या. कारण? एका परिवारातील युवकाचा त्या रुग्णालयात डेंग्यूवरील उपचारादरम्यान झालेला मृत्यू. विशेष उल्लेखनीय म्हणजे, त्यावेळी रुग्णालय आणि त्याच्या परिसरात काही अप्रिय घटनादेखील घडली नव्हती. मात्र, अशा परिस्थितीतील पूर्वानुभव लक्षात घेता, काहीही घडू शकते या भीतिपोटीच रुग्णालय व्यवस्थापनाने पोलीस यंत्रणेला तातडीने पाचारण केले. यातूनच संभाव्य स्थितीचे गांभीर्य सहजपणे लक्षात येते.
त्यापाठोपाठ याच घटनेची पुनरावृत्ती डोंबिवली व पालघर येथेही झाली. परिणामी, परिस्थितीचे गांभीर्य स्वाभाविकपणे वाढले. यातूनच प्रामुख्याने स्पष्ट झालेली बाब म्हणजे, रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश अल्पावधीतच कशाप्रकारे अक्राळविक्राळ स्वरूप धारण करू शकतो. या रोषाचा रोख प्रामुख्याने रुग्णालयातील डॉटर्स व संबंधित कर्मचार्यांच्या विरोधातच असतो.
ऑक्टोबरमध्येच मुंबईतील एका रुग्णालयात रुग्णाच्या वृद्ध आजोबा व त्यांच्या सहकारी-नातेवाईकांनी, रुग्णालयातील एका कर्मचार्याला मारहाण केली. तसेच, रुग्णालयाच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणावर मोडतोडही केली. यामागे कारण होते, एका नवजात बालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान झालेला मृत्यू. अर्थात, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित या समस्या केवळ मुंबई वा महाराष्ट्राशीच संबंधित नसून, असे प्रश्न राष्ट्रीय स्तरावरही दिसून येतात. भौगोलिकदृष्ट्या तामिळनाडूपासून त्रिपुरापर्यंत विविध आव्हानपर प्रसंगांनी, वैद्यकीय व्यवसायाला घेरले आहेच.
या प्रसंगांपैकी प्रमुख चिंतनीय बाब म्हणजे, अलीकडे दि. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी चेन्नईच्या कलाईनगर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे, डॉ. बालाजी जगन्नाथन यांनी ज्या महिला रुग्णावर कॅन्सरच्या अखेरच्या टप्प्यात उपचार केले, त्यात त्यांना अपयश आले. यानंतर महिलेच्या मुलाने आईच्या मृत्यूनंतर डॉ. जगन्नाथन यांचा खून केला.
डॉक्टरांसह वैद्यकीय वा निम-वैद्यकीय कर्मचार्यांवर होणारे हल्ले हे शारीरिक तर असतातच, शिवाय या मंडळींना मानसिक अवहेलनेच्या प्रकारांनाही मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते. हे प्रकार विविध ठिकाणी होतात. त्यापैकी अधिकांश प्रकरणांची दखलही घेतली जात नाही. यासंदर्भात प्रामुख्याने नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, इंफाळच्या ‘रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’तर्फे २०२३ मध्ये प्रकाशित अहवालानुसार, त्यावेळी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांपैकी ४० टक्के हल्ले हे ‘शारीरिक हल्ले’ या प्रकारातील होते. डॉक्टरांवरील या हल्ल्यांचे वेळेनुसार विश्लेषण करता असे दिसले की, डॉक्टरांवरील या हल्ल्यांपैकी ४० टक्के हल्ले हे संध्याकाळी ६ ते मध्यरात्रीच्या दरम्यानच झाले होते, तर दुपारी १ ते संध्याकाळी ६च्या दरम्यान झालेल्या हल्ल्यांचे प्रमाण २३ टक्के होते. याचाच अर्थ, ज्यावेळी रुग्णालयातील वर्दळ कमी असते, त्याचदरम्यान डॉटर्स व निम-वैद्यकीय कर्मचार्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण तुलनेने वाढतेे. तसे पाहता, वैद्यक क्षेत्रात डॉटर्स व निम-वैद्यकीय कर्मचार्यांवरील हल्ल्यांचे प्रकार आणि प्रमाण, ही आता एक जागतिक समस्या झाली आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पॅरिस येथील ‘युरोपियन इमर्जन्सी मेडिकल काँग्रेस’च्या अहवालानुसार, रुग्णालयांतर्गत विशेषतः ‘इमर्जन्सी’ वा ‘कॅज्युअल्टी’ विभागात काम करणार्या, सुमारे ७५ टक्के कर्मचार्यांना प्रत्यक्ष हल्ल्यांचा अनुभव आला आहे. जागतिक स्तरावरील ही टक्केवारी, रुग्णांसह डॉक्टरांसाठीही काळजीचा विषय ठरावा.
भारतात डॉटरांवरील शारीरिक हल्ल्यांच्या संदर्भात, मुंबईच्या डॉ. मंगेश पाटे यांनी डॉटरांवरील हल्ल्यांच्या निवडक १०० प्रकरणांचे संकलन प्रकाशित केले आहे. त्यांना यासंदर्भातील मिळालेल्या प्रतिसादानुसार, त्यांच्याकडे हजारांवर प्रकरणांची नोंद होऊ शकली असती. मात्र, त्यांनी तुलनेने प्रमुख व निवडक प्रकरणांचीच नोंद त्यांनी घेतली. या सार्या प्रकरणांचा पडताळा घेता रुग्णालयांमधील हल्ल्यांच्या संदर्भातील थोडयात; पण महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील:
रुग्णालयांमधील वाढती गर्दी व तुलनेने कर्मचार्यांची कमतरता.
रुग्णांवरील उपचाराला विलंबाने सुरुवात होणे.
रुग्णांवरील उपचारांच्या संदर्भात कुटुंबीयांमध्ये असणारी साशंकता.
उपचारांदरम्यान रुग्णांचा होणारा मृत्यू.
रुग्णालय व रुग्णांच्या कुटुंबीयांदरम्यानचा अपुरा संवाद.
रुग्णालय परिसरातील अपुरी सुरक्षाव्यवस्था.
अपुरी मूलभूत व्यवस्था.
रुग्णाच्या नातेवाईकांवर पडणारा आर्थिक बोजा.
वरील पार्श्वभूमीवर या संदर्भातील डॉक्टरांच्या स्वानुभवावर आधारित आकडेवारी, सर्वांचेच डोळे उघडणारी आहे. सर्वेक्षणानुसार, ७७.३ टक्के डॉक्टरांना शारीरिक हल्ल्याचा अनुभव कुठल्या ना कुठल्या संदर्भात आला होता. यानुसार, डॉक्टरांवरील हल्ल्यांपैकी केवळ २३.५ टक्के प्रकरणांचीच अधिकृतपणे नोंद होते व बहुसंख्य प्रकार अदखलच राहतात. तर, अधिकृतपणे नोंद झालेल्या केवळ ९.९ टक्के प्रकरणीच पूर्णपणे चौकशी होते.
समाधानाची बाब म्हणजे, डॉक्टरांवरील हल्ल्याच्या प्रकरणी न्यायालयांनीही गंभीर भूमिका घेतलेली दिसते. जुलैमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात, रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्याच्या प्रकरणी उद्रेक झाला. त्यावेळी मध्यस्थी करणार्या महिला डॉक्टरबरोबर तेथील नगरसेवकाने मारहाण व धक्काबुक्की केली. तसेच, त्यांचा मोबाईलही दूर फेकून दिला. या विरोधात तातडीने न्यायालयीन कारवाई केली गेली. त्यावर उच्च न्यायालयात, रुग्णालयात धुडगूस घालून महिला डॉक्टरला मारहाण करणार्या पुढारी-नगरसेवकाला जामीन मिळाला. मात्र, सुदैवाने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दखल घेत तो जामीन रद्द करत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करून, महिला डॉटरसह रुग्णालय कर्मचार्यांना काहीसा दिलासा दिला आहे, हे निश्चित!
-दत्तात्रय आंबुलकर
९८२२८४७८८६
(लेखक एचआर - व्यवस्थापन सल्लागार आहेत.)