स्वदेशी ‘प्रलय’ची यशस्वी भरारी; भारताच्या शस्त्रसज्जतेत आणखी एक भर

    06-Nov-2026   
 
Pralay Missile Successful Flight Test
 
मुंबई (Pralay Missile Successful Flight Test) : भारताने आपल्या संरक्षण क्षमता अधिक बळकट करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची माहिती दिली.
 
राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, डीआरडीओने गुरुवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ओडिशाच्या किनारपट्टीजवळ स्वदेशी बनावटीच्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. वापरकर्ता मूल्यमापन चाचणीचा भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने निर्धारित करण्यात आलेली सर्व उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण केली. विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या रेंज उपकरणांद्वारे संकलित केलेल्या माहितीच्या आधारे चाचणीचे यश निश्चित करण्यात आले. ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी म्हणजे भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतांना अधिक बळकटी देण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. Pralay Missile Successful Flight Test
 
यापूर्वी, गेल्या महिन्यात डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली होती. या चाचणीदरम्यान या प्रणालीने २१ किलोमीटर उंची गाठली आणि दीर्घकाळ समताप मंडळात (स्ट्रॅटोस्फिअर) उड्डाण करण्याची आपली क्षमता सिद्ध केली होती. प्रायोगिक उड्डाणादरम्यान हे प्लॅटफॉर्म समुद्रसपाटीपासून सरासरी २१ किलोमीटर उंचीवर पोहोचले. त्यानंतर सुमारे २० किलोमीटर उंचीवर ३० मिनिटांहून अधिक काळ ते कार्यरत ठेवण्यात आले. पुढे त्याला जमिनीवर परत आणण्याचे निर्देश देण्यात आले. ही प्रणाली सुरक्षितपणे परत मिळविण्यात आली असून, उड्डाणादरम्यान संकलित करण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. Pralay Missile Successful Flight Test
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर