११ वेळा मातृत्वाचे स्वप्न भंगले; पण तरीही तिने जिद्द हरली नाही! लावण्या राजेश यांचा योगशिक्षिकेपासून ‘मानद डॉक्टरेट’पर्यंतचा धैर्य अन् औदार्याचा असा हा प्रेरणादायी प्रवास...
आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतोच. मात्र, काहींच्या आयुष्यात येणारी संकटे इतकी मोठी असतात की, त्यातून सावरणेही अशक्यप्राय वाटू लागते. अशा वेळी परिस्थितीसमोर हार मानायची की, नव्या जिद्दीने उभे राहायचे, हा निर्णयच आयुष्याला वेगळी दिशा देणारा ठरतो.
लावण्या राजेश यांचा प्रवास असाच जिद्दीची आणि आत्मविश्वासाची कहाणी सांगणारा. दोनदा-तीनदा नव्हे तब्बल ११ वेळा गर्भपाताचे दुःख सहन करताना, डोळ्यांसमोर भावाचा अपघाती मृत्यू पाहताना आणि नैराश्याच्या गर्तेत अडकताना त्यांचे आयुष्य अक्षरशः बदलून गेले. मात्र, या सगळ्या संकटांपुढे त्यांनी हार मानली नाही. योगाच्या माध्यमातून स्वतःला सावरले आणि त्याच योगविद्येला व्यवसायाचे नव्हे; तर समाजसेवेचे माध्यम बनवले. आज योगशिक्षिका, योग थेरपिस्ट, ‘नॅचरोपॅथी’ क्षेत्रातील अभ्यासक आणि ‘मानद डॉक्टरेट’प्राप्त व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मूळच्या आंध्र प्रदेशातील लावण्या राजेश यांचे शिक्षण ‘इंजिनिअरिंग’मध्ये झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात नोकरीही केली. जवळपास चार वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांचा विवाह झाला. प्रेमविवाहानंतर पतीच्या नोकरीनिमित्त त्या मुंबईत स्थायिक झाल्या. लग्नानंतर काहीकाळाने त्यांनी मातृत्वाचे स्वप्न पाहिले. मात्र, पहिल्याच गर्भधारणेनंतर गर्भपात झाला. सुरुवातीला ही घटना दुर्दैवी समजून त्यांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. परंतु, एकामागून एक गर्भपात होत गेले आणि हा आकडा तब्बल ११वर पोहोचला. प्रत्येक वेळी नव्याने मातृत्वाची आशा निर्माण व्हायची आणि काहीकाळातच ती आशा मावळायची. या अनुभवांनी त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पुरते खचवून टाकले. त्यातच आणखी एक मोठा आघात त्यांच्या आयुष्यात आला.
लावण्या यांच्या भावाचा एका दुर्दैवी प्रसंगात पोहत असताना पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा प्रसंग लावण्या यांच्या डोळ्यांसमोर घडला. एकीकडे मातृत्वाच्या संघर्षाचे दुःख आणि दुसरीकडे डोळ्यांसमोर भावाला गमावण्याचा आघात, यामुळे त्या पूर्णपणे खचल्या. मनात प्रचंड दुःख साठत होते. नैराश्य इतके वाढले की, त्यांना आत्महत्येचे विचारही येऊ लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाल्याने मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्याचाही त्यांनी विचार केला होता. अशा कठीण काळात त्यांच्या पतीने त्यांना योगवर्गात दाखल केले. सुरुवातीला स्वतःला सावरण्यासाठी सुरू केलेला योगाभ्यास पुढे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. योगामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होत असल्याचा अनुभव त्यांना येऊ लागला. स्वतःला मदत झाली, त्याचप्रमाणे इतरांनाही या माध्यमातून मदत करता येईल, हा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी योगशिक्षक प्रशिक्षण पूर्ण केले. दोन वर्षांच्या अभ्यासानंतर प्रमाणपत्र मिळताच, २०१७ मध्ये त्यांनी योगाचे वर्गही सुरू केले. विशेष म्हणजे, सुरुवातीपासूनच त्यांनी जाहिरातींवर अवलंबून न राहता, केवळ तोंडी प्रसिद्धीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वीकारला.
विद्यार्थ्यांना योगाभ्यासामुळे शारीरिक त्रास कमी झाल्याचा, मन हलके झाल्याचा आणि आरोग्यात सकारात्मक बदल जाणवल्याचा अनुभव येऊ लागला. योगशिक्षिका म्हणून काम करताना लावण्या यांनी स्वतःचे ज्ञान सातत्याने वाढवण्यावर भर दिला. त्यांनी योगथेरपीसह विविध प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले. ‘मल्टिस्टाईल अॅडव्हान्स्ड लेव्हल इंटरनॅशनल सर्टिफिकेशन इन योगा अॅण्ड प्राणायाम’ या क्षेत्रातही त्यांनी प्रावीण्य मिळवले. त्यासोबत ‘नॅचरोपॅथी’चे शिक्षण घेतले.
योगाभ्यासासोबत निसर्गोपचाराचे ज्ञानही विद्यार्थ्यांना देता यावे, हा त्यामागचा उद्देश. स्वतःच्या कमाईतून पैसे बाजूला काढून त्यांनी पुढील शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी खर्च केला. पतीने सुरुवातीला त्यांना योगशिक्षक प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यानंतरचा बहुतांश शैक्षणिक प्रवास त्यांनी स्वतःच्या कमाईतून पूर्ण केला. लावण्या यांच्या कामाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. विविध संस्था, ‘कॉर्पोरेट’ कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी योगविषयक कार्यशाळा घेतल्या. त्यांच्या कामाची दखल विविध स्तरांवर घेतली जाऊ लागली. त्यांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे, भारत सरकारच्या माध्यमातून ‘सीआरपीएफ’च्या परिसरात आयोजित करण्यात आलेले दहा दिवसांचे योगशिबीर. तसेच ‘राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सवा’च्या निमित्ताने झारखंडमधील सुमारे ५०० आदिवासी विद्यार्थ्यांना योग शिकवण्याची संधीही त्यांना मिळाली. याशिवाय, भारत सरकारच्या काश्मिरी युवा आदान-प्रदान कार्यक्रमातही त्यांनी योगप्रशिक्षण दिले.
लावण्या यांच्या कार्याची दखल विविध संस्थांनी घेतली. ‘लायन्स लब ऑफ मुंबई’कडून त्यांना ‘यंग अचिव्हर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कार्याची माहिती वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली आणि त्यातून त्यांचा परिचय भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाशी संबंधित यशवंत मनखेडकर यांच्याशी झाला. मनखेडकर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन दिले. ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’निमित्त त्यांना ‘प्रेरणादायी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लावण्या आपल्या यशाच्या प्रवासात मनखेडकर यांच्या मार्गदर्शनाचा आणि प्रोत्साहनाचा आवर्जून उल्लेख करतात.
योगक्षेत्रातील त्यांचे काम विविध स्तरांवर पोहोचत असताना, अमेरिकन विद्यापीठाकडून त्यांना ‘मानद डॉटरेट’ प्रदान करण्यात आली. याशिवाय, त्यांना ‘ग्लोबल पीस अॅम्बेसिडर’ हा पुरस्कारही मिळाला आहे. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट योगशिक्षिका आणि ‘यंग अचिव्हर’ म्हणून मिळालेल्या सन्मानांमुळे त्यांच्या कामाला नवी ओळख मिळाली.
या सगळ्या संघर्षात लावण्या यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण म्हणजे, त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. आज त्यांची मुलगी चार वर्षांची आहे. त्यांच्या मते, आयुष्यात संकटे येतच असतात. मात्र, त्यांच्याशी दोन हात करण्याची मानसिकता असणे महत्त्वाचे. मातृत्वासाठी केलेला संघर्ष असो किंवा योगशिक्षिका म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रवास, प्रत्येक वेळी त्यांनी जिद्दीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. योगक्षेत्रात दहा वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतरही लावण्या यांची शिकण्याची इच्छा थांबलेली नाही. योगवर्गात येणारे विद्यार्थी अनेकदा त्यांच्या वैयक्तिक समस्या त्यांच्याशी शेअर करतात. अशा वेळी त्यांना मार्गदर्शन करताना मानसशास्त्राचे शास्त्रीय ज्ञान असण्याची गरजही जाणवली. आता पुढील वर्षापर्यंत मानसशास्त्रज्ञ होण्याचेही त्यांचे ध्येय आहे.
त्यांच्या मते, आपण जे ध्येय ठरवले आहे, त्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. काहीवेळा प्रवासात पुढे-मागे व्हावे लागेल, काहीवेळा अपेक्षाभंगही होईल; पण ध्येय सोडायचे नाही. लावण्या सांगतात, "मी कधीही हार मानणार्यांपैकी नाही. कितीही मोठी समस्या असली, तरी तिचा सामना करून त्यातून जिंकून बाहेर पडायचे, हाच माझा दृष्टिकोन आहे.”
लावण्या यांचा प्रवास केवळ योगशिक्षिका म्हणून मिळवलेल्या यशापुरता मर्यादित नाही; तो एका महिलेने वैयक्तिक दुःखातून स्वतःला सावरत, शिक्षणाची नवी दारे उघडत आणि इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत उभे केलेले स्वतंत्र विश्व आहे. स्वतःच्या वेदनेतून इतरांना मदत करण्याची प्रेरणा घेणार्या लावण्या यांची ही कहाणी अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी!
- कपिल देशपांडे