इंडोनेशियातला कट

    06-Nov-2026   
 
Indonesia Espionage Plot
 
देशाची सुरक्षा, विकास यासंदर्भात महत्त्वाच्या निर्णयामध्ये अधिकारी भूमिका असलेले इंडोनेशियाचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ लिस्त्यो सिगित प्रबोवा. त्याने स्वतःच्याच अधिकारांचा आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे ‘टॅप’ केल्याचे उघडकीस आले. यामध्ये देशाच्या सुरक्षेसंदर्भातली माहिती आहे. इतकेच नाही, तर राष्ट्राध्यक्षाचे खासगी फोन आणि बैठकाही रेकॉर्ड केल्या आहेत. हे सगळे लिस्त्योने कुणाला तरी पाठवले. हे सगळे कशासाठी होते? इंडोनेशियामध्ये येणार्‍या निवडणुकीमध्ये राष्ट्राध्यक्षांना ‘ब्लॅकमेल’ करण्यासाठी की, देशाची संवेदनशील माहिती कुणाला तरी देऊन भरपूर पैसा किंवा सत्ता मिळवण्यासाठी?
 
लिस्त्योचे कारनामे उघड होताच, राष्ट्राध्यक्षांनी त्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना तुरुंगात पाठवले. त्याने बेकायदेशीरपणे ‘टॅप’ केलेली माहिती ही मुख्यतः दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाविरोधात इंडोनेशिया काय रणनीती आखत आहे, याबाबत आहे. तसेच, भारत आणि अमेरिका यांच्यासोबत इंडोनेशिया नवीन करार करणार आहे का? किंवा या देशांबाबतचे इंडोनेशियाचे धोरण, याबाबत माहिती आहे. समुद्रामध्ये चीनचे वाढते प्राबल्य याविरोधात इंडोनेशिया काय विचार करते? याबाबत कोण उत्सुक असेल? तसेच भारत, अमेरिकेची भीती कुणाला वाटते? त्यामुळे लिस्त्यो कुणासाठी फोन ‘टॅपिंग’ करत होता, हे सहज समजते. या हेरगिरीमागे चीन असण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. आशिया खंडामध्ये सगळ्यात शक्तिशाली देश होण्याची चीनची महत्त्वाकांक्षा लपलेली नाही. मात्र, सध्याच्या शक्तिशाली भारतामुळे आशिया खंडात ‘सुपरपॉवर’ सर्वेसर्वा देश बनण्याची चीनची आसुरी इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळेच भारताचे आशिया खंडातील इतर देशांसोबत काय चालले आहे? याची हेरगिरी करण्यात चीनला स्वारस्य आहे. तसेच आशिया खंडातील देशांमध्ये स्वतःच्या मर्जीची सत्ता आणून, त्या देशांना ‘मांडलिक’ बनवता येईल, असाही चीनचा प्रयत्न असतो. त्यामुळे सध्याचे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवा यांची खासगी माहिती जमवून त्यांच्यावर निवडणुकीत दबाव टाकण्याचा प्रयत्नही असेल.
 
हे कटकारस्थान कसे उघड झाले? आपण पकडले जाऊ, या भीतीने जनरल लिस्त्यो यांच्या टीमने या बेकायदेशीर हेरगिरीचे ‘सिस्टम लॉग्स’ आणि डिजिटल पुरावे कायमचे मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. राष्ट्रीय सायबर सुरक्षा यंत्रणेच्या नियमित तपासणीत ‘डेटा’ अचानक गायब झाला आणि यामध्ये मुख्य सर्व्हरचा छुप्या पद्धतीने वापर झाला, हे समोर आले. याबाबत एका सुरक्षा अधिकार्‍याला संशय आला. त्याने यावर अत्यंत गुप्त तपास केला. त्याच्या तपासातून हा कट उघड झाला. त्याने महत्त्वाचे प्राथमिक डिजिटल पुरावे (ऑडिओ फाईल्स आणि लॉग्स) कॉपी केले आणि राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकाला दिले. पुढे राष्ट्राध्यक्षांनी यावर तत्काळ कारवाई केली नाही, तर गुप्त पथकाद्वारे लिस्त्योच्या हालचालीवर कडक नजर ठेवली. पुरावे मिळताच, त्याला त्याच्या साथीदारांसह अटक केली. हे सगळे पाहून वाटते की, अमेरिका-चीनसारखे देश महासत्ता होण्याच्या इच्छेने कटकारस्थान रचतात. त्याला जगातले अनेक देश बळी पडतात.
 
असो. २०१४ पूर्वी पाकिस्तानी दहशतवादापुढे हात टेकलेले, चीन म्हटले की हातपाय गाळणारे, अमेरिका-रशियापुढे हतबल झालेले सत्ताधारी देशाने पाहिले. मात्र, आज पंतप्रधान मोदींच्या समर्थ सत्तेने पाकिस्तान-चीनसह अमेरिकेला तोडीस तोड उत्तर दिले. देश सर्वच स्तरावर सक्षम असून, त्याची ताकद शतपटीने वाढली. चीन-अमेरिकेसह इतर देशांना कसे आवडेल? त्यामुळे आपल्या देशातही असे काही करण्याचा प्रयत्न होतच असेल. या पार्श्वभूमीवर देशाचे तरुण कर्तबगार नसून ‘झुरळ’ आहेत, झुरळ तरुणांचा देश म्हणून भारत दुबळा आहे, असे जगाच्या पटलावर ठसवण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा काय हेतू असेल? इंडोनेशियामधील कटाच्या निमित्ताने भारतात उगीचच होणार्‍या मोर्चा-आंदोलनांवर आणि त्याद्वारे देश-समाजाला अस्थिर करणार्‍यांवर शंका घ्यायला वाव आहे. इंडोनेशिया ते इंडिया अर्थात भारत; आंतरराष्ट्रीय स्तरावर काय सुरू आहे, यावर लक्ष देणे गरजेचे!
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर