मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देशातच आकार घेत असलेली ‘बी-२८’ ही स्वदेशी हायस्पीड ट्रेन केवळ तंत्रज्ञानातील प्रगती नव्हे, तर भारताच्या अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतेची नवी ओळख ठरणार आहे. ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या भविष्याची नवी दिशा ठरू शकते. त्याविषयी...
भारताच्या रेल्वे इतिहासात हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देशातच विकसित होत असलेली ‘बी-२८’ ही स्वदेशी हायस्पीड ट्रेन भारताच्या अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतेचे नवे प्रतीक ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. बंगळुरु येथील ‘भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड’ (BEML)च्या उत्पादन प्रकल्पात या ट्रेनची निर्मिती सुरू असून, भारतीय परिस्थिती, प्रवाशांचा आराम आणि सुरक्षितता लक्षात घेऊन तिची रचना करण्यात आली आहे. या ट्रेनचा कमाल चाचणी वेग ताशी २८० किमी, तर नियोजित व्यावसायिक वेग ताशी २४९ किमी असणार आहे. त्यामुळे भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हायस्पीड रेल्वे तंत्रज्ञानाचा समावेश होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
सुमारे २०२ मीटर लांबीच्या या ट्रेनमध्ये आठ डबे असतील. त्यांपैकी चार मोटर कार आणि चार ट्रेलर कार असतील. एका ट्रेनमध्ये सुमारे ५५७ प्रवाशांच्या प्रवासाची क्षमता असून, दिव्यांग आणि विशेष साहाय्याची आवश्यकता असलेल्या प्रवाशांसाठीही स्वतंत्र आसनव्यवस्था असेल.
प्रवाशांच्या आरामाला प्राधान्य
हायस्पीड प्रवास केवळ वेगवानच नव्हे, तर आरामदायी असावा, यासाठी ट्रेनच्या अंतर्गत रचनेत विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. मोठ्या सामानासाठी स्वतंत्र स्टॅण्ड, तसेच मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगसाठी पॉवर आऊटलेटची सुविधाही असेल. आधुनिक बायो-डायजेस्टर शौचालये, वातानुकूलन व्यवस्था आणि डब्यांना जोडणारे सीलबंद गँगवे यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या गँगवेमुळे प्रवाशांना एका डब्यातून दुसर्या डब्यात सहजपणे जाता येईल. प्रत्येक डब्यात दोन ‘एचव्हीएसी’ युनिट्स असतील. तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने या यंत्रणेची रचना करण्यात आली आहे.
दिव्यांगांसाठी सुलभ प्रवासाची व्यवस्था
या ट्रेनच्या रचनेत सर्वसमावेशकतेलाही महत्त्व देण्यात आले आहे. ट्रेनचा मजला आणि फलाटाची उंची एकसमान ठेवण्याची संकल्पना असल्याने प्रवाशांना चढ-उतार करणे सोपे होईल. व्हीलचेअरच्या हालचालीसाठी अनुकूल दरवाजे, दिव्यांगांसाठी आसनव्यवस्था आणि विशेष शौचालये यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ब्रेल लिपीतील माहिती फलकांमुळे दृष्टिहीन प्रवाशांनाही आवश्यक माहिती मिळण्यास मदत होईल.
बहुभाषिक माहिती आणि आपत्कालीन संवादव्यवस्था
प्रवासादरम्यान प्रवाशांना आवश्यक माहिती वेळोवेळी मिळावी, यासाठी आधुनिक ‘पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम’ बसवण्यात येणार आहे. सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा आणि स्वयंचलित घोषणांद्वारेही प्रवाशांना मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय वाय-फाय आधारित मनोरंजन प्रणालीद्वारे पूर्वलोड केलेला मनोरंजनविषयक मजकूर प्रवाशांना उपलब्ध होईल.
वेगाबरोबर ऊर्जा कार्यक्षमता आणि ध्वनिनियंत्रण
‘बी-२८’ ट्रेनची रचना केवळ वेगासाठी करण्यात आलेली नाही, तर ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रवासातील आरामाचाही विचार करण्यात आला आहे. ट्रेन २५ केव्ही, ५० हर्ट्झ सिंगल-फेज एसी ट्रॅशन प्रणालीवर चालेल. ब्रेकिंगदरम्यान ऊर्जा पुन्हा मिळवणारी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली वापरण्यात आली आहे. त्यामुळे ऊर्जेचा अधिक कार्यक्षम वापर शक्य होईल.
ट्रेनचा पुढील भाग आणि संपूर्ण बाह्य रचना ‘कम्प्युटेशनल फ्लुईड डायनॅमिस (CFD)’ सिम्युलेशनच्या आधारे विकसित करण्यात आली आहे. हवेचा प्रतिकार कमी करणे, बोगद्यांमधील दाबातील बदल आणि सोनिक बूमचा प्रभाव कमी करणे, तसेच हवेच्या प्रवाहामुळे निर्माण होणारी अस्थिरता नियंत्रित करणे, हे या ‘एरोडायनॅमिक’ रचनेचे उद्दिष्ट आहे. छतावरील ‘एचव्हीएसी’ यंत्रणा, पॅनेल्स आणि ‘एअरफ्लो डिफ्लेटर्स’ यांचाही या रचनेत समन्वय साधण्यात आला आहे.
स्वदेशी उत्पादन क्षमतेची खरी कसोटी
या प्रकल्पाचे महत्त्व केवळ मुंबई-अहमदाबाददरम्यानचा प्रवास वेगवान करण्यापुरते मर्यादित नाही. आतापर्यंत परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या हायस्पीड रेल्वे क्षेत्रात देशांतर्गत उत्पादन क्षमतेचा विस्तार होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. मात्र, स्वदेशी ट्रेनची खरी परीक्षा तिच्या कमाल वेगावरून नव्हे, तर प्रत्यक्ष संचालनातील सुरक्षितता, विश्वासार्हता, देखभाल, ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रवाशांना मिळणार्या सुविधांवर होणार आहे. त्यामुळे निर्मिती पूर्ण झाल्यानंतरच्या तांत्रिक चाचण्या आणि आवश्यक सुरक्षा प्रमाणन हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे ठरणार आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळत असताना, ‘बी-२८’ची निर्मिती हा या प्रवासातील महत्त्वाचा भाग आहे. भारतासाठी बुलेट ट्रेन ही केवळ वेगवान वाहतुकीची नवी सुविधा नसून, आधुनिक अभियांत्रिकी, स्वदेशी उत्पादन आणि भविष्यातील रेल्वे तंत्रज्ञानाची क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे. त्यामुळे या ट्रेनचे यश हे केवळ एका मार्गापुरते मर्यादित न राहता, देशाच्या हायस्पीड रेल्वे क्षेत्राच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरू शकते.