मुंबई (Ayodhya Mathura Varanasi Bomb Threat) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या, मथुरा आणि वाराणसी येथील हिंदू धार्मिक स्थळांना खलिस्तानी घटकांकडून बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील आयसीएसईशी संलग्न असलेल्या 'परमा अकादमी' या शाळेला खलिस्तानी दहशतवादी संघटना 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. ८ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत हल्ला करण्याची धमकी या ई-मेलमधून देण्यात आली आहे.
खलिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन व्यक्तींनी हा ई-मेल पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची नावे इंजिनिअर गुरुनाख सिंग, रौनक शाहवाला आणि डॉ. गुरुनिर्वर सिंग खानराजादा अशी असल्याचे समोर आले आहे. हाच धमकीचा ई-मेल अंबेडकरनगर येथील रेडियंट कॉलेज आणि नवदीप कॉलेज यांनाही पाठवण्यात आला आहे. धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. या धमकीचा स्रोत शोधण्यासाठी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तपास सुरू केला आहे. (Ayodhya Mathura Varanasi Bomb Threat)
दरम्यान, अयोध्या, मथुरा आणि वाराणसी येथील धार्मिक स्थळांच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी, श्वानपथके आणि कमांडोंना तैनात करण्यात आले असून, तिन्ही शहरांमधील मंदिरांच्या परिसरात व्यापक शोधमोहीम राबवण्यात येत आहे. नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीच्या ई-मेलचा तपास सायबर पोलिसांकडून केला जात असून, पोलिसांनी देखरेख वाढवली आहे. रेल्वेस्थानके, बसस्थानके आणि खरेदी केंद्रांसारख्या संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आली आहे. (Ayodhya Mathura Varanasi Bomb Threat)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक