नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी संघ स्वयंसेवक सरसावले! देशभरात व्यापक सेवाकार्य; हजारो कुटुंबांना दिलासा!

    06-Nov-2026   
 
 RSS Disaster Relief Work
 
मुंबई (RSS Disaster Relief Work) : देशाच्या विविध भागांत अलीकडे झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर संघ स्वयंसेवकांनी केलेल्या मदत व पुनर्वसन कार्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी दिली. वार्षिक अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या तीन दिवसीय बैठकीच्या समारोपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
 
ते म्हणाले, आसामच्या वरच्या भागात सामान्यतः पूरस्थिती निर्माण होत नाही. त्यामुळे शिवसागर आणि जोरहाट यांसारख्या जिल्ह्यांतील नागरिकांना अशा पुराचा फारसा अनुभव नव्हता. आसामच्या अन्य भागांत दरवर्षी पूर येत असला, तरी नागालँडच्या डोंगराळ भागाला लागून असलेल्या या प्रदेशात अतिवृष्टीमुळे अनपेक्षित संकट निर्माण झाले. या पुरामुळे ८०५ गावांमधील ६७ हजार ७०० कुटुंबे बाधित झाली, तर दीड हजारांहून अधिक घरांचे पूर्णतः नुकसान झाले. अशा परिस्थितीत १,६०० हून अधिक स्वयंसेवकांनी ४२ हजार २०० कुटुंबांपर्यंत पोहोचून अन्न, पाणी, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची तातडीने मदत केली. प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडतानाच स्वयंसेवकांनीही सामाजिक दायित्वाचे भान ठेवून पूरग्रस्तांना मदत केली. (RSS Disaster Relief Work)
 
पुढे त्यांनी सांगितले की, सुमारे १५० बाधित कुटुंबांची घरे पुन्हा उभारण्यासाठी बांधकाम साहित्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुनर्वसनाचे काम आगामी काळातही सुरू राहणार आहे. समाजाच्या सहकार्यातून पाच कोटी रुपयांहून अधिक निधी संकलित करण्यात आला. या माध्यमातून बाधितांना अन्न, पाणी, औषधे आणि अन्य आवश्यक मदत पुरविण्याचे प्रयत्न करण्यात आले, असे होसबाळे यांनी सांगितले.
 
ओडिशा आणि आंध्र प्रदेशात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना होसबाळे म्हणाले की, ओडिशातील कंधमाल आणि गंजाम, तसेच आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम आणि विजयवाडा यांसह अनेक किनारपट्टीच्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला. अनेक घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात पशुधन दगावले, तर हजारो नारळाची झाडे उद्ध्वस्त झाली. वादळामुळे विजेचे खांब उन्मळून पडल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा पाच ते सहा दिवस खंडित झाला होता. अशा भागांत स्वयंसेवकांनी वीजखांब उभारण्यास मदत करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले. ज्या ठिकाणी वीज नव्हती, तेथे प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली. बाधित नागरिकांना अन्न आणि पाणीही पुरविण्यात आले. (RSS Disaster Relief Work)
 
या आपत्तीचा लहान मुलांवर तसेच मच्छीमार समाजावरही मोठा परिणाम झाला होता. स्थानिक मच्छीमारांना आवश्यक असलेल्या छोट्या होड्या आणि मासेमारीची जाळी उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही करण्यात आली. समाजाच्या सहकार्याने स्वयंसेवकांनी या समस्यांवर मात करण्यासाठी विविध सेवाकार्ये केली, असे त्यांनी सांगितले.
 
उत्तर प्रदेशातील सेवाकार्याविषयी माहिती देताना ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे लखनौ आणि चित्रकूट येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. लखनौमध्ये ४० हजारांहून अधिक कुटुंबे बाधित झाली, तर सुमारे २५ हजार कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. प्रशासनाच्या समन्वयाने ३०० हून अधिक स्वयंसेवकांनी सलग चार ते पाच दिवस मदतकार्य केले. चित्रकूटमध्येही मंदाकिनी नदीला आलेल्या पुरामुळे २८ गावांतील दोन हजारांहून अधिक कुटुंबे बाधित झाली. या भागात सुमारे ३५० स्वयंसेवकांनी अहोरात्र मदतकार्य केले. आठ ते दहा दिवसांपर्यंत सहा हजारांहून अधिक नागरिकांना अन्न आणि पाणी पुरविण्यात आले. तसेच, विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या सुमारे ५,६०० नागरिकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात आले. (RSS Disaster Relief Work)





ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर