भारतीय संस्कृतीतील सण-उत्सव हे जीवनाकडे पाहण्याची एक समृद्ध आध्यात्मिक दृष्टी देणारे संस्कार आहेत. दिवाळीच्या प्रारंभी येणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी त्याचीच साक्ष देतात. सृष्टीतील प्रत्येक जीव परस्परावलंबी आहे, त्याच्या अस्तित्वात माया, करुणा आणि ऋणानुबंध गुंफलेले आहेत, याचे भान सवत्सधेनूच्या पूजनातून जागवले जाते. तर, धन्वंतरींच्या उपासनेतून शरीररूपी मंदिराचे पावित्र्य, आरोग्याचे मांगल्य आणि समस्त जीवांच्या दुःखमुक्तीची प्रार्थना व्यक्त होते. या दोन्ही पर्वांचे आध्यात्मिक अधिष्ठान उलगडताना पुराणपरंपरा, व्रतविधी आणि आयुर्वेदाच्या ज्ञानपरंपरेतून जीवनमूल्यांचा मागोवा घेणारा हा लेख...
दिवाळीच्या स्वागतासाठी आपण घर उजळतो, अंगण सजवतो, दारावर तोरण बांधतो. पण, या प्रकाशपर्वाच्या उंबरठ्यावर आपल्या संस्कृतीने दोन अतिशय सुंदर गोष्टी ठेवल्या आहेत, सवत्सधेनूचे पूजन आणि धन्वंतरींचे स्मरण. एका ठिकाणी आपल्या लेकराला दूध पाजणारी माऊली आहे; दुसरीकडे प्राणिमात्रांचे दुःख दूर करणार्या वैद्यकविद्येचे दैवत आहे. वसुबारस आणि धनत्रयोदशी यांच्याकडे या दृष्टीने पाहिल्यास, दिवाळीचा आनंद अधिक सखोल आणि सघन असल्याचे जाणवते. आपल्या घरात येणार्या सुखामागे कितीतरी जिवांचे योगदान असते. त्यांचे ऋण मानावे, त्यांच्या सुखाचीही प्रार्थना करावी आणि मिळालेल्या आयुष्याचे मोल ओळखावे, असा भावच या दोन्ही सणांच्या उपासनेतून उलगडतो.
वसुबारसेला आपण सवत्सधेनूची पूजा करतो. ‘सवत्स’ या शब्दातच या पूजनाचे सौंदर्य सामावलेले आहे. आपल्या उपयोगासाठी दूध देणार्या गायीबरोबर तिच्या वासरालाही पूजेचा मान यादिवशी मिळतो. ‘स्कंदपुराणा’तील कार्तिकमासमाहात्म्यात गाय आणि वासराच्या पूजनाचा उल्लेख आहे. चंदनाचा लेप, पुष्पमाळा आणि पूजेचे उपचार अर्पण करून, या मायलेकरांचा सन्मान करावा. भक्तीच्या दृष्टीने याकडे पाहिल्यास, तर हे दृश्य मन हेलावून टाकणारेच आहे. ज्या माऊलीच्या दुधावर आपली मुले वाढतात, तिच्या लेकराचाही आपल्याला विसर पडू नये. तिच्या देण्याबरोबरच तिच्या ममतेचेही मोल जाणावे. आपल्या लेकराला कवेत घेणार्या आईने सवत्सधेनूसमोर हात जोडावेत, यात मातृत्वाची दडलेली किती हळवी ओळख आहे!
या पूजेसाठी सांगितलेला ‘गोधूलिकाळ’ही लक्षात घेण्यासारखाच. दिवसभर चरायला गेलेली गुरे घरी परततात, ती ही वेळ. त्यांच्या पावलांनी उठणारी धूळ, गळ्यातील घंटांचा आवाज आणि आईच्या भेटीसाठी आतुरलेले वासरू! या सगळ्यांतूनच गावाकडचे संध्याकाळचे जीवन साकारले जाते. गोवत्सद्वादशीच्या व्रतवर्णनात या वेळेलाच महत्त्व दिले आहे. गुरे घरी परतल्यावर गाय-वासराचे पूजन करावे, असेही सांगितले गेले आहे. दिवा लागण्याची वेळ आणि मायलेकरांच्या भेटीची वेळ अशी एकत्र येते. रोजच्या जगण्यातले हे साधे दृश्यही आपल्या पूर्वजांनी पूजेइतकेच पवित्र मानले. ईश्वराचे दर्शन घ्यायला दूर जाण्यापूर्वी आपल्या दाराशी उभ्या असलेल्या या ममतेसमोर नतमस्तक व्हावे, असाच भाव काहीसा त्यातून मनात जागतो.
वसुबारसेची आणखी एक कमी परिचित बाजू म्हणजे, काही व्रतपरंपरांत त्या दिवशी गायीचे दूध, दही आणि तूप सेवन न करण्याचा नियम! गायीची पूजा करायची आणि तिच्याकडून मिळणारे पदार्थ त्या दिवशी स्वतःसाठी वर्ज्य करायचे, हा विचार समजून घेण्यासारखा आहे. ‘स्कंदपुराणा’तील संबंधित वर्णनातही हे आहारनियम येतात. त्यांचा भावार्थ आपण असा घेऊ शकतो की, कृतज्ञता व्यक्त करताना स्वतःच्या उपभोगालाही मर्यादा घालता आली पाहिजे. जिच्याकडून आपण नित्य घेतो, तिच्यासमोर उभे राहताना केवळ ‘आणखी मिळावे,’ अशी मागणी का करावी? ‘तिचे आणि तिच्या वासराचे क्षेम असावे,’ एवढी निर्मळ प्रार्थनाही पुरेशीच ठरणारी असते. घराघरांत व्रताचार वेगवेगळे असले, तरी या संयमातील कोमलता मनाला स्पर्शून जाते.
याच व्रताशी संबंधित ‘एकांगी’ नावाच्या गवळणीचा एक छोटासा, पण सुंदर उल्लेख ‘स्कंदपुराणा’तच सापडतो. तिने हे व्रत केले आणि तीन वर्षांत ती धनधान्यसमृद्ध झाली, असे व्रतमाहात्म्य सांगते. तिच्याविषयी मोठा कथाविस्तार उपलब्ध उल्लेखात नाही; तरी तिचे नाव जपले गेले आहे, ही गोष्ट महत्त्वाची वाटते. गुरांचे पालन करणार्या एका सामान्य स्त्रीची श्रद्धाही, आपल्या पुराणपरंपरेने स्मरणात ठेवली. धनधान्याने भरलेले घर आणि सुखात असलेले पशुधन ही तिच्या समृद्धीची कल्पना होती. गोवत्सद्वादशी ‘नंदिनीव्रत’ म्हणूनही ओळखली जाते. नंदिनीला ‘माता’ म्हणून संबोधून संततीच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते. सवत्सधेनूच्या सान्निध्यात उभ्या असलेल्या स्त्रीच्या मनातील आपल्या मुलांविषयीची काळजीच, या प्रार्थनेत किती सहज सामावते!
या ममतेच्या पूजनानंतर धनत्रयोदशी येते. धन्वंतरींच्या हातातील अमृतकलश आपल्याला जीवनाच्या अमूल्यतेचे स्मरण करून देणारा ठरतो. ‘श्रीमद्भागवता’च्या आठव्या स्कंधात समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या धन्वंतरींचे वर्णन, विष्णूच्या अंशरूपाने आणि आयुर्वेदाचे ज्ञाते म्हणून आले आहे. त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश आहे. संपत्तीचा उपभोग घ्यायलाही निरामय शरीर आणि प्रसन्न मन लागते. घर भरलेले असले, पण घरातील एखादी व्यक्ती आजाराने तळमळत असेल, तर सणाचा आनंदही आपल्याला अपुराच वाटतो. म्हणूनच धन्वंतरींसमोर जोडलेले हात स्वतःच्या आरोग्याबरोबरच, आपल्या माणसांचे आणि अवघ्या जीवसृष्टीचेही आरोग्य मागतात.
धन्वंतरींचे आणखी एक रूप मात्र फारसे सांगितले जात नाही. ‘सुश्रुतसंहिते’च्या सूत्रस्थानाच्या पहिल्याच अध्यायात, ते काशीचे राजे दिवोदास यांच्या रूपात भेटतात. त्यांच्या भोवती ऋषी आणि जिज्ञासू शिष्य बसले आहेत. सुश्रुत आणि इतर शिष्य त्यांच्याकडे आयुर्वेदाचे ज्ञान मागतात. विशेष म्हणजे, त्यांना शल्यतंत्र शिकायचे आहे. त्यामुळे धन्वंतरींचे स्मरण करताना, वनौषधींबरोबर शस्त्रक्रियाविद्येची गुरुपरंपराही आपल्या ध्यानात असायला हवी. समुद्रमंथनातील अमृतकलशधारी दैवत, इथे ज्ञान देणार्या आचार्याच्या रूपात दिसते. रोग्याचे दुःख दूर करण्यासाठी आवश्यक असलेली विद्या शिष्यांच्या हाती सोपविणे, हेही जीवनाला अमृताचा स्पर्श देण्यासारखेच.
या अध्यायातील शिष्यांची विनंती तर विशेष हृदयस्पर्शी आहे. नातेवाईक आणि आधार देणारी माणसे असूनही रोगांनी गांजलेले लोक असाहाय्य असल्यासारखे तळमळतात; त्यांचे दुःख पाहून आमचे मन व्यथित होते, असा भाव ते व्यक्त करतात. त्या दुःखाचे निवारण करता यावे, म्हणूनच त्यांना विद्या शिकायची आहे. वैद्यकाच्या अध्ययनामागे प्राणिमात्रांविषयीचा हा कळवळा आहे! पुढे धन्वंतरी आजारी व्यक्तीचा रोग दूर करणे आणि निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकवणे, अशी वैद्यकाची दोन प्रयोजनेही सांगतात. धनत्रयोदशीला त्यांचे पूजन करताना, या करुणेचेही स्मरण व्हावे. आजारी माणसाजवळ बसणे, त्याला धीर देणे आणि त्याच्या उपचाराला हातभार लावणे, यांतूनही त्या पूजेला अर्थ प्राप्त होऊ शकतो.
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी यमासाठी लावला जाणारा दीप, या सणाला एक वेगळेच आध्यात्मिक परिमाण प्रदान करतो. ‘स्कंदपुराणा’तील वर्णनात घराच्या द्वाराशी ‘यमदीप’ अर्पण करण्याचे विधान असून, अपमृत्यूचे निवारण ही त्याची फलश्रुती सांगितली आहे. त्याचसंदर्भात हेमनकाच्या बालकाची यमकृपेने अपमृत्यूपासून सुटका झाल्याचा संक्षिप्त उल्लेखही येतो. लोकपरंपरेत या कथेला विविध विस्तार मिळाले आहेत. पण त्या दिव्यापाशी उभ्या असलेल्या भक्ताची प्रार्थना अगदीच साधी असते. आमच्या घरातील जीवांचे रक्षण कर, आमच्या माणसांचा सहवास सुखाचा होऊ दे. दिवाळीच्या आनंदातही आयुष्याच्या नश्वरतेचे भान जागे ठेवणारी ही उपासना. मृत्यूच्या अधिपतीलाही दीप अर्पण करताना, श्रद्धाळू मन भयाबरोबरच आपला भरवसाही त्याच्या चरणी ठेवते.
सवत्सधेनूसमोरचे निरांजन, धन्वंतरींच्या हातातील अमृतकलश आणि दाराशी ठेवलेला ‘यमदीप’ या तिन्ही प्रतिमा मनात एकत्र आणल्या की, दिवाळीची प्रार्थना किती व्यापक आहे, हे जाणवते. जन्माला आलेल्या जीवाला मायेचे पोषण मिळावे, त्याचे आयुष्य निरामय व्हावे आणि त्याला आपल्या माणसांचा सहवास लाभावा, अशी ती प्रार्थना आहे. वसुबारसेला मायलेकरांचे पूजन करताना आपल्या अंतःकरणात वात्सल्य जागावे, धनत्रयोदशीला धन्वंतरींचे स्मरण करताना दुसर्याच्या वेदनेची जाणीव व्हावी, ‘यमदीप’ लावताना लाभलेल्या प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञता वाटावी, या भावनेने उजळलेला दिवा देवघरापुरता राहत नाही; त्याचा प्रकाश आपल्या वागण्यात उतरतो. आणि मग, घरातली दिवाळी मनातही साजरी होऊ लागते!