त्रिपुरात बीएसएफ जवानांवर तस्करांचा हल्ला; आठ आरोपी अटकेत

    05-Nov-2026   

Tripura BSF Attack
 
मुंबई (Tripura BSF Attack) : त्रिपुरातील बॉक्सानगर येथील आशाबाडी परिसरात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यम खात्यावरून ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, ‘बॉक्सानगरच्या आशाबाडी येथे बीएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना कायद्याच्या कक्षेत आणले जाईल आणि त्यांच्याविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.’ जवानांवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. सर्व दोषींना कायद्यानुसार शिक्षा दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे नऊ वाजता आशाबाडी सीमा चौकीच्या (बीओपी) हद्दीतील कुंपण घातलेल्या सीमेजवळील गेट क्रमांक १७४ आणि १७५ येथे तस्करांच्या एका गटाने बीएसएफच्या तीन जवानांवर हल्ला केला. तस्कर या मार्गाने अवैध वस्तूंची वाहतूक करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या बीएसएफच्या ४९व्या बटालियनच्या जवानांनी त्यांचा पाठलाग केला. या हल्ल्यात तिन्ही जवान गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी जवानांची शस्त्रे हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला. तसेच, जवान ज्या सरकारी वाहनातून आले होते, त्याचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Tripura BSF Attack)
 
बीएसएफच्या जवानांनी पाठलाग सुरू करताच तस्कर वेगवेगळ्या दिशांनी पळू लागले. मात्र, जवानांनी सुमारे ४०० मीटर अंतरावर एका तस्कराला पकडले. त्याची ओळख हिफजुर रहमान अशी झाली आहे. याचदरम्यान रहीमपूर कांतामुरा सीमा चौकीवरील तीन बीएसएफ जवान एका वाहनातून बॉक्सानगरच्या दिशेने जात होते. ते नाकाबंदीच्या ठिकाणी पोहोचताच तस्करांच्या एका गटाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
 
समोर आलेले व्हिडीओ फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी जवानांना बेदम मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्लेखोरांनी जवानांना जमिनीवर पाडून त्यांच्या सर्व्हिस रायफल हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला. जवान ज्या सरकारी वाहनातून घटनास्थळी पोहोचले होते, त्या वाहनाचीही हल्लेखोरांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.(Tripura BSF Attack)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर