रा.स्व.संघाच्या 'गृहसंपर्क अभियाना'द्वारे दहा कोटींहून अधिक कुटुंबांपर्यंत संपर्क

९९ टक्के नागरिकांनी केले स्वयंसेवकांचे स्वागत; वर्षभरात एक लाखांहून अधिक नव्या शाखा सुरु

    05-Nov-2026   

RSS Home Contact Campaign
 
मुंबई (RSS Home Contact Campaign) : संघाचे कार्य, उद्दिष्टे आणि उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक प्रांतात तीन आठवड्यांचे घराघरांत संपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत स्वयंसेवकांनी देशभरातील ४ लाख ६३ हजार ३४० गावांमध्ये आणि शहरी भागातील ४१ हजार ८२५ वस्त्यांमध्ये संपर्क साधला. देशभरातील एकूण १० कोटी २२ लाख ५ हजार ६६५ कुटुंबांपर्यंत हे अभियान पोहोचले, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी झाला. इंदूर येथील डेली कॉलेजमधील संत श्री रविदास महाराज सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी संबोधित केले.
 
या अभियानाचे स्वरूप स्पष्ट करताना होसबाळे म्हणाले की, स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाकडे साधारणतः पाच ते २५ मिनिटे थांबत होते. या वेळी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून त्यांना संघाच्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच, पंचपरिवर्तनाची संकल्पना आणि त्यामागील विचार समजावून सांगण्यात आला. या अभियानादरम्यान सुमारे ९५ ते ९९ टक्के नागरिकांनी स्वयंसेवकांचे स्वागत केले. देशभरात एकूण ५९ हजार ८ मंडल असून, गृहसंपर्क अभियानाच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी त्यापैकी ५४ हजार ९३७ मंडलांपर्यंत संपर्क प्रस्थापित केला, असे होसबाळे यांनी सांगितले.
 
वर्षभरातील संघकार्याच्या विस्ताराविषयी बोलताना होसबाळे म्हणाले की, संघाने दोन वेगवेगळ्या पद्धतींनी संघकार्याचा विस्तार करण्याचे प्रयत्न केले. यामध्ये दरवर्षी नियमितपणे होणारा संघकार्याचा विस्तार हा एक भाग होता. त्याशिवाय, नव्या ठिकाणी सात ते दहा दिवसांच्या कालावधीसाठी शाखा सुरू करण्याचा उपक्रमही राबविण्यात आला. या कालावधीत एक लाखांहून अधिक नव्या शाखा सुरू करण्यात आल्या. नव्या गावांमध्ये तसेच निवासी वस्त्यांमध्ये स्वयंसेवकांनी नियोजनपूर्वक या शाखा सुरू केल्या. या माध्यमातून स्थानिक नागरिकांना संघाच्या कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती होसबाळे यांनी दिली.
 
याप्रसंगी सरकार्यवाहंनी संघाच्या संघटनात्मक विस्ताराची आकडेवारी सादर केली. ते म्हणाले की, सध्या देशभरातील ६३ हजार २०८ ठिकाणी संघाच्या शाखा सुरू आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सादर केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत शाखा सुरू असलेल्या ठिकाणांमध्ये ८ हजार १५६ ने वाढ झाली आहे. या ठिकाणी सध्या एकूण ९९ हजार ४३३ दैनंदिन शाखा सुरू आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत त्यामध्ये १२ हजार २५ ने वाढ झाली आहे. दैनंदिन शाखांव्यतिरिक्त नियमित शाखेत उपस्थित राहणे शक्य नसलेल्या व्यक्तींसाठी संघाकडून साप्ताहिक मिलन आयोजित केले जाते. सध्या देशभरात अशी ३४ हजार ९८२ साप्ताहिक मिलने सुरू असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २ हजार ६०० हून अधिक वाढ झाली आहे.
 
दुर्गम भाग, जनजातीय क्षेत्रे आणि डोंगराळ प्रदेशांमध्ये समाजाशी नियमित संपर्क कायम ठेवण्यासाठी मासिक मिलन आयोजित केले जाते. सध्या देशभरात अशी १४ हजार ९६ मासिक मिलन सुरू असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ४६३ ने वाढ झाली आहे. वर्षभरात संघकार्याचा विस्तार १० हजार २३१ नव्या ठिकाणी झाला आहे. सध्या देशभरात एकूण १ लाख ३ हजार ३९७ ठिकाणी संघाचे कार्य सुरू असल्याची माहिती दत्तात्रेय होसबाळे यांनी दिली.
 
देशभरात ६५ हजारांहून अधिक हिंदू संमेलने
 
३,०८,४२९ : हिंदू संमेलने आयोजित केलेली एकूण गावे व वस्त्या
२८,५१४ : शहरी भागातील वस्ती संमेलने
३७,०८० : ग्रामीण भागातील संमेलने
६५,६६४ : देशभरातील एकूण हिंदू संमेलने
४,९३,७६,००० : सहभागी नागरिक
 
अरुणाचल प्रदेशात २८ हिंदू संमेलने आणि धर्म संमेलने आयोजित करण्यात आली. लडाखमध्येही कार्यक्रम झाले. अंदमान आणि निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअर येथे आयोजित कार्यक्रमाला पाच हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते. हिंदू समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे आणि पंचपरिवर्तनाची संकल्पना समाजापर्यंत पोहोचविणे, हा या संमेलनांचा प्रमुख उद्देश होता. सामाजिक अनिष्ट प्रथा व व्यसनांपासून दूर राहणे, गावांमधील एकोपा वाढविणे, परस्पर सहकार्याची भावना निर्माण करणे आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करणे, या विषयांवर संमेलनांमध्ये चर्चा करण्यात आली.
 
युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष उपक्रम
 
युवकांशी संपर्क वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देताना होसबाळे म्हणाले की, ३५ वर्षांखालील युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या तरुण व्यावसायिकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. युवकांशी संवाद साधणे, त्यांना संघाच्या कार्याची ओळख करून देणे आणि विविध सामाजिक विषयांवरील चर्चेत त्यांचा सहभाग वाढविणे, हा या उपक्रमांचा उद्देश होता. तपशील पुढीलप्रमाणे :
 
५७,२४३ : युवकांशी संवादासाठी आयोजित एकूण कार्यक्रम
२१,२३७ : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम व संवाद सत्रे आयोजित केलेली ठिकाणे
१४,२८५ : तरुण व्यावसायिकांसाठी उपक्रम राबविलेली ठिकाणे
३१,२६,४०४ : सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थी
६,९०,८०० : सहभागी तरुण व्यावसायिक
३८,१७,२०४ : एकूण सहभागी विद्यार्थी व व्यावसायिक
 
देशभरात ३,२०७ प्रबुद्धजन गोष्टी
 
प्रबुद्धजन गोष्टींच्या माध्यमातून समाजातील बुद्धिजीवी आणि प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क साधण्याच्या उपक्रमाची माहिती देताना होसबाळे म्हणाले की, देशभरातील जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी प्रबुद्धजन गोष्टींचे आयोजन करण्यात आले. अशा एकूण ३ हजार २०७ गोष्टी आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये सुमारे ४ लाख २९ हजार नागरिक सहभागी झाले. या कार्यक्रमांचे एक किंवा दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यातून बुद्धिजीवी वर्गातील व्यक्तींशी संवाद आणि विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी उपलब्ध झाली.
 
सामाजिक समरसतेसाठी ६,३७४ बैठका
 
१,३४६ : शहर स्तरावरील बैठका
५,०२८ : तालुका स्तरावरील बैठका
६,३७४ : एकूण बैठका
३,७९,५८१ : सहभागी प्रतिनिधी व सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती
 
या बैठकांमध्ये जैन, शीख, बौद्ध समाजांसह विविध सामाजिक संस्था, संघटना आणि समुदायांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात आले. हिंदू संमेलनांच्या माध्यमातून दिलेला सामाजिक समरसता आणि एकात्मतेचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविणे, हा या बैठकांचा प्रमुख उद्देश होता.
 
पश्चिम बंगालमध्ये शाखांची संख्या १५० पटींनी वाढली
 
देशातील सर्वाधिक शाखा असलेले प्रांत तसेच जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील संघकार्याच्या स्थितीविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना होसबळे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये संघाच्या शाखांची संख्या जवळपास १५० पटींनी वाढली आहे. पूर्वी या राज्यात शाखा सुरू करण्यास प्रत्यक्ष विरोध केला जात असे. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, अशा प्रकारचा विरोध राहिलेला नाही. देशाच्या विविध भागांत संघाच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागल्याची आठवण करून देताना ते म्हणाले की, ईशान्य भारतात, विशेषतः त्रिपुरा आणि आसाममध्ये चार कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. केरळमध्येही संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. असे आव्हान असतानाही शाखांचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरूच राहिले. अरुणाचल प्रदेशात संघाने ४८ खंडांचा समावेश असलेला संपर्क उपक्रम राबविला आहे. मिझोराममध्ये हिंदूंची लोकसंख्या अत्यल्प असतानाही दोन ठिकाणी शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. लडाखमध्येही संघाच्या शाखा आहेत. तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशांमध्येही संघकार्याचा विस्तार करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत, असे होसबाळे यांनी सांगितले.
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर