मुंबई (Neha Bora Controversy) : हिंदूंच्या धार्मिक संस्थांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अमिता सचदेव यांनी ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनची अध्यक्ष नेहा बोरा विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, भाजपने देखील नेहा बोरावर आक्षेप घेत सनातन धर्माला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेहा बोराला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अधिवक्ता अमिता सचदेव यांनी बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नेहा बोराने केलेल्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. त्या म्हणाल्या, "कोट्यवधी हिंदू ज्या पवित्र स्थळाची श्रद्धेने पूजा करतात, त्या स्थळाचा इतक्या सहजपणे अपमान कसा काय केला जाऊ शकतो? नेहा बोरा यांचे म्हणणे आहे की, ब्राह्मणवादी व्यवस्थेत ब्राह्मण महिलादेखील सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर बलात्कार होतात आणि मंदिरांमध्ये पुजारी महिलांवर बलात्कार करतात."(Neha Bora Controversy)
या आरोपांमधून सर्व पुजारी आणि मंदिरांच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सचदेव यांनी म्हटले. त्या म्हणाल्या, "अशा प्रकारची विधाने कोणतीही भीडभाड न बाळगता इतक्या सहजपणे का केली जातात? कारण, अशा विधानांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असा विश्वास दीर्घकाळापासून निर्माण झाला आहे. नेहा बोरा यांच्यासारख्या लोकांनी आपल्या मौनाचा गैरफायदा घेतला. मात्र, आता हे मौन संपले आहे."
लैंगिक अत्याचार कुठेही घडले तरी त्यांची चौकशी होऊन दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका सचदेव यांनी मांडली. मात्र, सर्व पुजाऱ्यांना सरसकट बलात्कारी ठरवणे आणि मंदिरांना अशा गुन्ह्यांची ठिकाणे संबोधणे, यामुळे विविध समुदायांमध्ये वैमनस्य आणि शत्रुत्व निर्माण होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या. याच कारणास्तव भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६ आणि इतर लागू तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसह नेहा बोरा विरोधात औपचारिक तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Neha Bora Controversy)
भाजपने समाजमाध्यमांवरील 'एक्स' या व्यासपीठावर नेहा बोरा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपने म्हटले आहे, "काँग्रेसची नवी पोस्टर गर्ल नेहा बोरा या राहुल गांधी यांनी यापूर्वी जे म्हटले होते, त्याच गोष्टी वेगळ्या शब्दांत मांडत आहेत. त्यांची सनातनविरोधी आणि अराजक विचारसरणी संपूर्ण देशासाठी धोकादायक ठरत आहे. सनातन धर्माचा अपमान करणे आणि हिंदूंच्या श्रद्धांवर प्रहार करणे, हीच त्यांची खरी ओळख बनली आहे."
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी नेहा बोराच्या विचारांमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा प्रभाव दिसून येत असल्याचा आरोप केला. काँग्रेसची हिंदूंबद्दलची भूमिका शत्रुत्वाची असून, पक्षाची ही विचारसरणी देशाच्या एकात्मतेसाठी धोकादायक ठरू शकते, असा दावाही त्यांनी केला.(Neha Bora Controversy)
विश्व हिंदू परिषदेचाही नेहा बोरा वर निशाणा
विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन यांनीही नेहा बोरा विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "नेहा बोरा हे केवळ एका व्यक्तीचे नाव नाही. भारताला सामर्थ्यवान झालेला पाहायचे नाही, तर देशाचे तुकडे झालेले पाहायचे आहेत, अशा अराजक प्रवृत्तींचे ते प्रतीक आहे. त्यामुळेच कधी ईशान्य भारताला देशापासून वेगळे करण्याची भाषा केली जाते, तर कधी जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग नसल्याचे सांगितले जाते. दुर्दैवाने, राहुल गांधी अशा लोकांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांना आपल्या 'पोस्टर गर्ल'च्या रूपात पुढे आणत आहेत. नेहा बोरा आणि राहुल गांधी यांची विचारसरणी एकसारखी असल्याचे दिसते. अशा लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही आणि देशाच्या संविधानावरही त्यांची श्रद्धा नाही. भारताच्या एकात्मतेवरही त्यांचा विश्वास नाही. त्यामुळेच देशाचे नुकसान होईल, अशी विधाने ते करतात. राहुल गांधी अशा लोकांना पुढे करून देशात अराजकता निर्माण करू इच्छितात."(Neha Bora Controversy)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक