परंपरेचा जागतिक स्वर

    05-Nov-2026

Nashik Godavari Aarti 
 
नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला जागतिक स्तरावर पुन्हा एकदा मानाचे स्थान मिळाले आहे. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर झालेली गोदा आरती आणि शंखनादाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने दखल घेतल्याने नाशिकच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. हा केवळ विक्रम नाही; तर नाशिकच्या समृद्ध संस्कृतीचा, आध्यात्मिक वारशाचा आणि सामूहिक श्रद्धाशक्तीचा जागतिक गौरव आहे. गोदावरी ही केवळ नदी नसून नाशिककरांच्या जीवनाचा, भावविश्वाचा आणि धार्मिक आस्थेचा अविभाज्य भाग. ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरीच्या तीरावर होणारी आरती म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा मनोहारी संगम आहे. आरतीच्या वेळी वातावरणात घुमणारा शंखनाद, घंटानाद, मंत्रोच्चार आणि दीपज्योतींचे मनाला भावणारे दृश्य प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक अनुभूती देणारे असते. या उपक्रमाला मिळालेली जागतिक स्तरावरील दखल म्हणजे, नाशिकच्या सांस्कृतिक अस्मितेचा सन्मान आहे. भारताची प्राचीन संस्कृती, धार्मिक परंपरा आणि सामूहिक सहभागातून जपली जाणारी भक्तीची भावना जगासमोर मांडली गेली आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये आपल्या परंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाविषयी अभिमान व जाणीव निर्माण होण्यास मदत होते.‘रामायण’कालीन महत्त्व, प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपरा, यामुळे नाशिकला आधीपासूनच जागतिक धार्मिक नकाशावर विशेष स्थान आहे. त्यात गोदा आरती आणि शंखनादाच्या विक्रमाची भर पडल्याने नाशिकची ओळख अधिक व्यापक झाली आहे. आज जागतिकीकरणाच्या युगात स्थानिक संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणे, ही काळाची गरज आहे. गोदा आरतीच्या माध्यमातून नाशिकने जगाला श्रद्धा, एकता आणि सांस्कृतिक सातत्याचा संदेश दिला आहे. गोदामातेच्या काठावर घुमणारा शंखनाद आता केवळ नाशिकपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेचा जागतिक स्वर बनला आहे.
 
भक्तीचा महासागर उसळणार!
 
नाशिकच्या पवित्र भूमीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आगमनाचे स्वर आता अधिक प्रकर्षाने उमटू लागले आहेत. सिंहस्थ धर्मध्वजारोहणाच्या मंगलमय सोहळ्याने आगामी कुंभपर्वाची नांदी झाली असून, संपूर्ण नाशिकमध्ये धार्मिक उत्साह, आध्यात्मिक चैतन्य आणि भक्तिमय वातावरणाची अनुभूती येऊ लागली आहे. धर्मध्वजारोहण सोहळ्यासोबतच नाशिकच्या आध्यात्मिक परंपरेला नव्याने उजाळा मिळाला असून, देशभरातील साधुसंत, महंत, आखाडे आणि भाविकांचे लक्ष पुन्हा एकदा गोदातीराच्या या पवित्र नगरीकडे वेधले गेले आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही; तर भारतीय संस्कृती, अध्यात्म, श्रद्धा आणि सनातन परंपरेचा विराट उत्सव आहे. गोदावरीच्या पवित्र तीरावर भरणार्‍या या पर्वाला हजारो वर्षांची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तीर्थक्षेत्रांना सिंहस्थाच्या माध्यमातून विशेष महत्त्व प्राप्त होते. धर्मध्वजारोहणामुळे या परंपरेतील पुढील महत्त्वपूर्ण पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नाशिककरांच्या चेहर्‍यावरून व्यक्त होत आहे. धर्मध्वज ही केवळ एक पताका नसून ती धर्म, संस्कृती, त्याग, तपश्चर्या आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक आहे. ध्वजारोहणातून सिंहस्थाच्या आयोजनाचा संकल्प अधिक दृढ होतो. साधुसंतांच्या उपस्थितीने आणि मंत्रोच्चारांनी भारावलेल्या वातावरणात आगामी कुंभमेळ्याची चाहूल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रम, आखाड्यांमधील हालचाली आणि विविध धार्मिक उपक्रमांमुळे नाशिकमध्ये सिंहस्थाचे स्वर घुमू लागले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकसाठी जागतिक स्तरावर आपली सांस्कृतिक ओळख अधोरेखित करण्याची मोठी संधी आहे. कोट्यवधी भाविकांचे होणारे आगमन लक्षात घेता पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, आरोग्यसेवा, सुरक्षितता आणि गोदावरी नदीचे संवर्धन यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. धर्मध्वजारोहणाने सुरू झालेला हा आध्यात्मिक प्रवास आता जनसहभागाच्या बळावर अधिक व्यापक होणार आहे. गोदातीरी पुन्हा एकदा भक्तीचा महासागर उसळणार असून, साधुसंतांच्या उपस्थितीने नाशिकची भूमी अध्यात्माच्या तेजाने उजळून निघणार आहे.
 
लेखक- विराम गांगुर्डे
 
 
 
 
 
 
 
 




संबंधित मजकूर