दिवाळीपूर्वी शेअर बाजारात तेजीची आतषबाजी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आठ लाख कोटींची भर!

    05-Nov-2026
 
Indian Stock Market Rally November 2026
 
मुंबई (Indian Stock Market Rally November 2026) : धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवडाभरातील चढ-उतारांनंतर गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी बाजाराने जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्समध्ये सुमारे दोन हजार अंकांची वाढ, तर निफ्टीमध्ये ५७६ अंकांची तेजी नोंदवण्यात आल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. या तेजीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आठ लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाल्याचे वृत्त आहे. सणासुदीच्या काळात बाजारात परतलेल्या या उत्साहामुळे दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
 
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारातील पुन्हा सुरू झालेली खरेदी, अनेक कंपन्यांच्या तिमाही निकालांतही चांगली कामगिरी दिसून आली. या अनुकूल घडामोडींमुळे शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच तेजीचा प्रकाश पसरला आहे. गुरुवारी सेन्सेक्सने सुमारे दोन हजार अंकांची झेप घेत ७९ हजार ३०० अंकांची पातळी गाठली, तर निफ्टी ५५० अंकांनी वधारून २४ हजार ५०० च्या पुढे पोहोचला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आठ लाख कोटी रुपयांहून अधिक भर पडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या तेजीने दिवाळीच्या खरेदीपूर्वी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. (Indian Stock Market Rally November 2026)
 
गेल्या आठवड्याच्या अखेरपासून बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले. सोमवार, २ नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स १,२३३ अंकांनी वधारला. मंगळवारी आणखी १,२२५ अंकांची भर पडली, तर बुधवारी ३८३ अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ७७ हजार ३०१ अंकांवर बंद झाला. बुधवारपर्यंतच्या पाच सत्रांत सेन्सेक्समध्ये चार हजारांहून अधिक अंकांची वाढ झाली होती. गुरुवारच्या तेजीने या चढाईला आणखी बळ दिले. सहा सलग सत्रांतील वाढीमुळे बाजाराने तीन महिन्यांतील उच्चांकाच्या दिशेने वाटचाल केली. (Indian Stock Market Rally November 2026)
 
या तेजीमागे अनेक घटक कारणीभूत ठरले. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला मिळालेल्या यशामुळे ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार आणि आयात शुल्कविषयक धोरणांबाबतचा तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाली. अमेरिका-इराण संघर्ष निवळण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीत मोठी घसरण झाली. तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतासारख्या तेल आयातदार देशाला महागाई आणि आयात खर्चाच्या दृष्टीने दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
 
याशिवाय अमेरिकेतील रोख्यांवरील परतावा कमी होणे, रुपयाचे मूल्य सुधारणे, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पुन्हा खरेदी सुरू होणे आणि कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल या घटकांनीही बाजाराला आधार दिला. वाहन, वित्तीय सेवा, बँकिंग, स्थावर मालमत्ता आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारातील ही तेजी गुंतवणूकदारांसाठी उत्साहवर्धक ठरली आहे. मात्र, जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती आणि परदेशी गुंतवणुकीतील बदल यांवर बाजाराची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे. (Indian Stock Market Rally November 2026)





संबंधित मजकूर