गीतासार : भाग २९

    05-Nov-2026

Gita Saar Part 29
 
पांचाल’ या शब्दाचा वापर वेदव्यास पंच ज्ञानेंद्रिये’ असा करतात. ज्याने आपल्या पंच ज्ञानेंद्रियांवर संयम साधला, त्याची आध्यात्मिक प्रगती अतिशीघ्र म्हणजे द्रुतगतीने होईल. म्हणूनच पांचाल देशाच्या राजाला वेदव्यास ‘द्रुपद’ म्हणतात. उत्तम पदाला जो लवकर जातो, त्यास व्यास ‘द्रुपद’ म्हणतात. याच द्रुपदाची पुत्री द्रौपदी असून, तिचे अर्जुनाने स्वयंवरात पाणीग्रहण केले. याच द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्न, जो पांडव पक्षातील अतिपराक्रमी वीर मानला गेला. या पंच ज्ञानेंद्रियरूप पांचाल देशाचा राजा द्रुपद होता. याच्या कन्येच्या स्वयंवराकरिता द्रुपदाने असल्याच ज्ञानरूप मत्स्याचा नेत्र म्हणजे, ‘ज्ञानदृष्टी’ वेधण्याचे ठरविले होते. असे हे द्रौपदीचे वरवर विलक्षण; परंतु अंतर्यामी आध्यात्मिक स्वयंवर होते. व्यासांच्या कथांचा आशय समजणे तितके सोपे नाही.
 
आध्यात्मात लवकर प्रगती करणारा असा राजा द्रुपद मुलगा धृष्टद्युम्नाला घेऊन, पांडवांच्या पक्षाकडून महाभारत युद्धात उतरतो. ‘भा’ म्हणजे प्रकाश अथवा ज्ञान आणि त्याच्या प्रकाशात रत होणारा तो ‘भारत’. या भारताची महान दिव्य परिपूर्ण अवस्था म्हणजेच महाभारत! हे महाभारत युद्ध साधकातील उच्च व नीच वृत्तींचे युद्ध होय. या युद्धाचे स्थळ साधकाचा पिंडच असून, कौरव व पांडव या त्यात वसलेल्या अनुक्रमे वाईट व चांगल्या वृत्ती होत.
 
धृष्टकेतू
 
धृष्ट म्हणजे ज्या साधकाने धारण केला आहे असा, केतू म्हणजे अश्व. ‘अ’ म्हणजे नाही आणि ‘श्व’ म्हणजे श्वास. आपला श्वास निबद्ध करून, केवल कुंभक लावणारा असा समाधिस्थित श्रेष्ठ साधक म्हणजेच ‘धृष्टकेतू’ होय. प्रचंड ज्ञानगतीने युक्त असा धृष्टकेतू साधकच, सत्यासाठी पांडवांचाच पक्ष घेईल. आता असल्या या धृष्टकेतूकरिता आपल्या विशाल बुद्धीतून व्यास कोणती कथा रचतात हे पाहू. धृष्टकेतूचा दुसराही एक आशय आहे. धृष्ट म्हणजे बलवान आणि केतू म्हणजे चिन्ह अथवा ध्वज; परंतु या आशयातून कोणताच नीट अर्थ हाती लागत नाही.
 
चेकितान
 
‘कित्’ म्हणजे रोगांचे हरण करणे आणि ‘आन’ म्हणजे आणणे. रोग आणि दुर्वृत्तींचे हरण करून जो साधक स्वतःत ज्ञान आणतो, अशाला वेदव्यास ‘चेकितान’ असे म्हणतात. योगसाधना करताना योग्याचे शरीर रोगरहित असायला हवे. असे रोगरहित शरीर साधकाला आसने, प्राणायाम आणि ध्यानाद्वारे प्राप्त होऊ शकते. जो साधक अशा तर्‍हेने पूर्ण प्राकृतिक म्हणजे रोगरहित शुद्ध शरीराने संपन्न असतो, अशा साधकालाच वेदव्यास ‘चेकितान’ असे म्हणतात. वृत्ती युद्धाकरिता रोगरहित शरीर अतिशय आवश्यक. अन्यथा रोगजर्जर शरीराद्वारे वृत्तींनाही रोग जडून साधक उत्तम वृत्तीचा राहत नाही. आजारी माणसाचे चित्त याकरिताच शांत राहत नाही. आजारी व वृद्ध माणसे यामुळेच चिडचिड करतात. रोगरहित साधकाला व्यास ‘चेकितान’ असे म्हणतात.
 
काशिराज
 
काशिराज फार बलवान असल्याचे दाखविले आहे, ते बरोबरच आहे. जो बलवान साधक ज्ञानाला ‘काश’ म्हणजे आवरण घालून त्या ज्ञान राज्याचा राजा होतो, तो बलवान नाही काय? काशी क्षेत्राचा हाच व्यासाशय आहे. ज्या अवस्थारूप स्थलात ज्ञानाला आवरण घालून ज्ञानाचे माहेरघर केले, त्या महान खंडाला ‘काशिखंड’ म्हणतात. या काशिखंडाचा नाथ विश्वनाथ महादेव होय! काशिराजा असाच पराक्रमी होता; परंतु या पराक्रमी काशिराजाच्या राज्यावर धाड घालून भीष्मांनी त्यांच्या ‘अंबा’, ‘अंबिका’ आणि ‘अंबालिका’ कन्यका पळवून आणल्या. नंतर कुरुवंशाकरिता अपत्य नसल्याने, व्यासांकरवी माता सत्यवती (पूर्वीची मत्स्यगंधा) हिने हस्तिनापूर राज्याकरिता अधिपती उत्पन्न व्हावा म्हणून, ‘नियोग’ पद्धतीने पुत्रोत्पत्ती करवल्याची ‘महाभारता’त कथा आहे. स्वतः लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञा करणार्‍या देवव्रताने एखाद्या बलवान राजाला नामोहरम करून, त्याच्या तीन कन्यकांचे बलाने हरण करणे, हे कोणत्या तरी सुसंस्कृत माणसाला शोभते का? यावर काही विद्वान असा तर्क लावतात की, त्यावेळच्या रितीप्रमाणे भीष्म वागले. म्हणजे आमच्या हटवादी तर्कटांकरिता, आम्ही भीष्मांसहित त्या काळच्या सर्व समाजालाच असंस्कृत आणि हीन, लुटारू वृत्तीचे मानतो.
 
व्यासांद्वारे अंबिका आणि अंबालिका यांचा ‘नियोग’ काय, हे जाणण्याकरिता आपल्याला शब्दातील व्यासाशय पाहावा लागेल. जीवनातील वर्तुळाच्या ज्ञानाचा व्यास करणारी श्रेष्ठ साधकवृत्ती म्हणजे ‘वेदव्यास’ होय. ‘वेद’ म्हणजे ज्ञान व ‘व्यास‘ म्हणजे व्यास. साधारण साधक जीवनावरील वर्तुळावर अनेक जन्म सारखा गरगर फिरत असतो; परंतु तो स्वतःबद्दल ज्ञान प्राप्तीचा कधीच प्रयत्न करीत नाही. जो श्रेष्ठ साधक वरील जीवनरूप परिघावर फिरत असताना, मी कोण व कोठून आलो, याचा सखोल विचार करतो, त्याकरिता तो आपल्या जीवन वर्तुळातील ज्ञानकेंद्राकडे ज्ञानाकरिता झेप घेऊन, ते प्राप्त झालेले ज्ञान पुन्हा समाजाला देण्याकरिता परत त्याच जीवन परिघावर येतो. म्हणजे, अशा तर्‍हेने दोन त्रिज्यांचे ज्ञान अंतर कापून ‘ज्ञानाचा व्यास’ होतो. त्याला स्वतः व्यासच ‘वेदव्यास’ म्हणजे, ज्ञानाचा व्यास करणारा असे संबोधतात. हे व्यास मत्स्यगंधेचे पुत्र असतात. मत्स्यगंधा म्हणजे ‘वेद ज्ञानाचा’ गंध असलेली साधकवृत्ती अवस्था होय. या व्यासांचे पिता पराशर म्हणजे ‘परा’ अथवा ‘ब्रह्म’ अवस्थेत साधनेद्वारे आत्म्याला ‘शर’ मारणारा श्रेष्ठ साधक होय. असल्या पराशराचे ‘उपनिषदे’ वर्णन करतात,
 
‘प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्ष्यमुच्च्यते’
 
वेदव्यास भीष्मांनी पळवून आणलेल्या काशिराजाच्या कन्यका अंबिका, अंबालिकेशी व दासीपुत्रीशी ‘नियोग’ पद्धतीने संभोग करून, त्याद्वारे आंधळा धृतराष्ट्र, पंडुरोगाने ग्रस्त पंडु व दासीपुत्र ज्ञानवान विदुर यांची उत्पत्ती करतात. योग शब्दापासून ‘नियोग’ शब्द झाला आहे. ‘पातंजल’ योगसूत्रात पहिलेच योगसूत्र आहे, ‘योगः चित्तवृत्तिनिरोधः’ योगाला ‘नि’ प्रत्यय लावला की, ‘नियोग’ शब्द उत्पन्न होतो. तेव्हा नियोग म्हणजे शरीर संभोग नसून, साधना परिश्रमाने वृत्तींवर जय मिळवून या दृश्य प्रकृतीद्वारे आवश्यक ती ज्ञानावस्था प्राप्त करणे होय. काशिराजाची प्रथम हरिता कन्या ‘अंबा’ होय. ‘अंबा’ म्हणजे मूल प्रकृती होय. या अंबेला नियोगाकरिता व्यासांसमोर आणल्यानंतर तिने सांगितले की, ती यापूर्वीच ‘सांब’ नावाच्या पुरुषाशी विवाहबद्ध झाली आहे. असे असताना एका विवाहित स्त्रीशी पुन्हा संभोग अथवा नियोग करणे म्हणजे, पापकर्म होय. अंबेचे हे निवेदन ऐकून तिला मुक्त करण्यात आले. (क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७
 
लेखक-योगिराज हरकरे




संबंधित मजकूर