भूतानमध्ये अवघ्या नऊ तासांत १०८ स्तूपांची उभारणी!

एक स्तूप पंतप्रधान मोदींना समर्पित; कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची विशेष उपस्थिती

    05-Nov-2026   

Bhutan 108 Stupas
 
मुंबई (Bhutan 108 Stupas) : भूतानमधील ‘गेलेफू माइंडफुलनेस सिटी’ येथे रविवारी अवघ्या नऊ तासांच्या कालावधीत १०८ स्तूपांची उभारणी करण्यात आली. भूतानच्या राजांनी यापैकी एक स्तूप भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पित केला. भारत आणि भूतान यांच्यातील दृढ मैत्रीपूर्ण संबंधांचे प्रतीक म्हणून या स्तूपाचे समर्पण करण्यात आले. दि. १ नोव्हेंबर रोजी झालेल्या या अभिषेक सोहळ्याला भारताचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. पंतप्रधान मोदींना स्तूप समर्पित करणे हा भारतासाठी अत्यंत मोठा सन्मान असल्याची भावना रिजिजू यांनी व्यक्त केली. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या वतीने त्यांनी भूतानच्या राजांचे आभार मानले.
 
या सोहळ्याला विविध बौद्ध संप्रदायांचे धर्मगुरू तसेच जगभरातून आलेले सुमारे दोन लाख लोक उपस्थित होते. हे स्तूप म्हणजे गौतम बुद्धांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचे प्रतीक मानले जातात. ‘गेलेफू माइंडफुलनेस सिटी’ची आध्यात्मिक पायाभरणी म्हणून या स्तूपांकडे पाहिले जात आहे. भूतानचे राजे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या संकल्पनेतून या शहराची निर्मिती होत असून, त्याची वास्तुरचना डेन्मार्कच्या वास्तुविशारदाने तयार केली आहे.(Bhutan 108 Stupas)
 
‘गेलेफू माइंडफुलनेस सिटी’ (जीएमसी) ही भूतानच्या राजांच्या दूरदृष्टीतून साकारत असलेली महत्त्वाकांक्षी संकल्पना आहे. प्राचीन भूतानी तत्त्वे आणि परंपरांवर आधारित आधुनिक शहरी केंद्र विकसित करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या शहराच्या आध्यात्मिक पायाभरणीचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून ‘जांगचुप चोर्टेन’ स्तूपांकडे पाहिले जात आहे.
 
या कार्यक्रमात भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी गेलेफू शहराच्या संकल्पनेला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले, “केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून मी पंतप्रधान, भारत सरकार आणि भारतातील जनतेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आज आपण जे पाहिले, ते आमच्या अस्मितेचे प्रतिबिंब आहे. एक छोटासा देश, ज्याची खरी ताकद तेथील जनता, मूल्ये आणि श्रद्धेमध्ये आहे.”(Bhutan 108 Stupas)
 
१०८ स्तूपांचे वैशिष्ट्य काय?
 
१०८ स्तूपांची उभारणी ही भूतानच्या राजांची संकल्पना होती. हजारो स्वयंसेवकांनी अवघ्या एका दिवसात हे स्तूप उभारले.
हे स्तूप शहराच्या आध्यात्मिक पायाभरणीचा महत्त्वाचा भाग आहेत. स्थानिक भाषेत त्यांना ‘जांगजूब चोर्टेन’ असे संबोधले जाते.
आय नदीच्या किनाऱ्यालगत ११.७ किलोमीटरच्या परिसरात या स्तूपांची उभारणी करण्यात आली आहे.
प्रत्येक स्तूपाची उंची १५ मीटर असून, दोन स्तूपांमधील अंतर १०८ मीटर ठेवण्यात आले आहे.(Bhutan 108 Stupas)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर