बालकामगारांच्या स्वावलंबनाची ‘अवनी’

    05-Nov-2026   

Anuradha Bhosale
 
लाखो बालकामगारांना शोषणाच्या विळख्यातून मुक्त करून शिक्षणाची प्रकाशवाट दाखवणार्‍या कोल्हापूरच्या अनुराधा भोसले यांच्याविषयी...
 
काही माणसांच्या आयुष्याला संघर्षाची किनार असते, तर काहींच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवासच संघर्षातून घडलेला असतो. मात्र, स्वतःच्या वाट्याला आलेल्या वेदना इतरांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी वापरणारी माणसे विरळच! कोल्हापूरच्या अनुराधा भोसले या अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी घरकामासाठी बालमजुरी करावी लागलेली एक मुलगी पुढे हजारो बालकामगारांच्या मुक्तीचा लढा उभारते, शाळेचे तोंडही न पाहिलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणते आणि शोषणाच्या विळख्यात अडकलेल्या महिला-मुलींच्या पाठीशी उभी राहते, हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील भोकर हे अनुराधा यांचे मूळ गाव. वडील प्राथमिक शिक्षक, तर आई अशिक्षित. १२ भावंडांच्या मोठ्या कुटुंबात अकरावे अपत्य असलेल्या अनुराधा यांचे बालपण आर्थिक विवंचनेत गेले. दिवसा शाळा आणि संध्याकाळी शिक्षकांच्या घरातील कामे, असा त्यांचा दिनक्रम. वयाच्या सहाव्या वर्षापासून घरकामाचा अनुभव त्यांच्या वाट्याला आला. मात्र, त्या घरातील कुटुंबाने त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याची संधी दिली, ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची बाब ठरली. त्यांनी नववीच्या सुटीत गावी जाऊन शेतात भांगलणीचे काम केले आणि त्यातून मिळालेली मजुरी परीक्षेच्या शुल्कासाठी वापरली. पुढे अकरावी-बारावीचे शिक्षण घेतानाही त्यांनी संस्थेत साफसफाई आणि अन्य कामे केली. त्याबदल्यात त्यांना जेवण मिळत असे. शिक्षणासाठी अशाप्रकारे प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागला. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही.
 
पुढे मुंबईतील ‘निर्मला निकेतन’मधून त्यांनी समाजकार्याचे शिक्षण घेतले. ‘बीएसडब्ल्यू’ आणि त्यानंतर ‘एमएसडब्ल्यू’पर्यंतचा शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. काहीकाळ जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे नोकरी केली. याच काळात त्यांचा विवाह झाला आणि १९९६ मध्ये त्या कोल्हापुरात आल्या. दरम्यान, सांगलीतील ‘अवनी’ या संस्थेची आणि वंचित मुलांसाठी सुरू असलेल्या कामाची त्यांना ओळख झाली. या कामाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. ‘अवनी’ संस्थेची नोंदणी १९९४ मध्ये प्रा. अरुण चव्हाण यांच्या पुढाकाराने झाली होती. अनुराधा भोसले १९९६ मध्ये ‘वेरळा विकास संस्थे’शी जोडल्या गेल्या आणि १९९७ पासून कोल्हापूर परिसरात ‘अवनी’च्या माध्यमातून त्यांनी स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठी प्रत्यक्ष काम सुरू केले. सर्वप्रथम भंगार गोळा करणार्‍या मुलांशी मैत्री केली. कचर्‍याच्या ढिगार्‍यात भविष्य शोधणार्‍या या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली
 
याचबरोबर कोल्हापुरातील भटक्या-विमुक्त समाजाच्या वस्त्यांमध्ये त्यांनी काम सुरू केले. या वस्त्यांतील अनेक मुले शाळेपासून दूर होती. शाळा सुरू करायच्या, तर शिक्षक कुठून आणायचे, हा प्रश्न होता. त्यावरही त्यांनी मार्ग काढला. आसपासच्या महाविद्यालयांतील समाजकार्याची आवड असलेल्या तरुण-तरुणींशी संपर्क साधला. त्यांना प्रशिक्षण दिले आणि या वस्त्यांमधील मुलांना शिकविण्यासाठी तयार केले. अशाप्रकारे त्यांनी ३६ शैक्षणिक केंद्रे सुरू केली. या केंद्रांमधून शिक्षणाची गोडी लावून मुलांना जवळच्या नियमित शाळांमध्ये दाखल करण्याचे काम केले. आतापर्यंत सुमारे १ लाख २४ हजारांहून अधिक मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. विशेषतः ऊसतोडणी आणि वीटभट्ट्यांवर काम करणार्‍या कुटुंबांचे स्थलांतर हा मोठा प्रश्न होता.
बालमजुरीविरोधातील अनुराधा यांचा लढा केवळ जनजागृतीपुरता मर्यादित नाही. गॅरेज, हॉटेल, दुकाने, बांधकामांची ठिकाणे आणि अन्य आस्थापनांमध्ये जाऊन बालकामगारांचा शोध घेणे, त्यांची सुटका करणे आणि त्यांना शिक्षणाशी जोडणे, असे काम त्या करतात. ‘अवनी’च्या माध्यमातून आजवर १४ हजार पेक्षा जास्त बालकामगारांचे ‘रेस्क्यू’ करण्यात आले आहे. बालमजुरी, बालतस्करी, मुलांची विक्री, जबरदस्तीने कामाला लावणे, कौटुंबिक शोषण आणि बालविवाह अशा अनेक प्रश्नांवर ‘अवनी’ काम करते. ‘अवनी’च्या माध्यमातून आजही अनेक मुला-मुलींना शिक्षणासोबत हस्तकला, संगीत आणि चित्रकलेचे प्रशिक्षण दिले जाते. आकाशकंदील, शुभेच्छापत्रे अशा वस्तू तयार करून त्यांची विक्री केली जाते. यातून मुलांना कौशल्य विकासाबरोबरच स्वावलंबनाची जाणीव होते.
 
अनुराधा भोसले यांचे कार्य केवळ बालहक्कांपुरते मर्यादित नाही. समाजातील दुर्लक्षित महिलांचे प्रश्नही त्यांनी आपल्या कामाच्या केंद्रस्थानी आणले आहेत. ‘अवनी’शी संलग्न ‘एकटी’ या संस्थेच्या माध्यमातून अनुराधा यांनी या महिलांना संघटित करण्याचे काम केले.
 
‘अवनी’ संस्थेच्या कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली आहे, सहकार्य मिळाले आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानितदेखील करण्यात आले आहे. अशा या स्वतःच्या बालपणातील अंधार इतरांच्या आयुष्यात पुन्हा उतरू नये, यासाठी आयुष्य वेचणार्‍या अनुराधा भोसले यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर