कोकणातील उत्सवपरंपरेतून कलेची प्रेरणा घेत, राज्यस्तरीय संगीत रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा आणि सुरांचा ठसा उमटवणार्या विपुल निमकरविषयी...
गावच्या उत्सवांना एक वेगळीच मौज असते. वर्षभर शेतात राबणारा, गुराढोरांच्या मागे धावणारा आणि संसाराच्या व्यापात अडकलेला गावकरी उत्सवाच्या दिवसांत जरा मोकळा होतो. देवळात रोषणाई होते, मंडप उभा राहतो आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी सुरू होते. नाटक ठरले की, गावातल्या हौशी कलाकारांना तर पायच फुटतात. भूमिका मिळाली आहे, तो दिवसभर संवाद म्हणत फिरतो आणि ज्याला भूमिका मिळाली नाही, तो थोडा नाराजही असतो. नाटकाच्या दिवशी तर सगळे गावच एकत्र असते. दुसर्या दिवशी नाटकाचा निकालही लागतो. कुणाचा अभिनय चांगला झाला, कुणाचे गाणे बेसूर झाले आणि कुणी संवाद विसरूनही कशीबशी वेळ मारून नेली, याचा सविस्तर ऊहापोह होतो. या सगळ्या गमतीजमतींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडते. गावची उत्सवपरंपरा गावाच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग होते. भजन, कीर्तन, लोकगीते आणि नाटकांतून कलेची आवड, एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जाते. अशा उत्सवांच्या मुशीतूनच अनेक कलावंत घडतात. त्यांच्यापैकीच एक म्हणजे, गुहागर तालुक्यातील कलाकार विपुल निमकर!
विपुलचा जन्म १९९७ मध्ये गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे या गावातला. गाव तसे आडगावच. आजही गावामध्ये नेटवर्क नाही. त्यामुळे अनेक गोष्टींसाठी पायपीट ही नित्याचीच. आई, वडील आणि मोठा भाऊ, असे विपुलचे चौकोनी कुटुंब. घरची शेती असल्याने परिस्थिती सामान्यच. सोयीसुविधा जरी कमी असल्या, तरी सांस्कृतिक अंगाने चिंद्रवळे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावे अधिक विकसित म्हणावी अशीच! चिंद्रवळे आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये स्थानिक देवतांचे प्रतिवार्षिक उत्सव मोठ्या धामधुमीने साजरे केले जात. ती परंपरा आजही या गावांनी जपली आहे, हे विशेष! त्यामुळे विपुलच्या घरात कलेचा नसलेला वारसा, त्याला या उत्सवातूनच मिळाला.
विपुलचे सातवीपर्यंतचे शिक्षण चिंद्रवळे गावातीलच शाळेत झाले. मात्र, पुढील शिक्षणासाठी त्याला बाजूच्याच वाघांबे गावातील हायस्कूलची वाट धरावी लागली. शिक्षणाची आवड सुरुवातीपासूनच असलेल्या विपुलने पुढे ‘केमिस्ट्री’ विषयातून ‘बीएस्सी’ आणि ‘ऑर्गेनिक केमिस्ट्री’मधून ‘एमएस्सी’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या काळात, विपुल गावातील उत्सवांमध्ये हौसेने सहभागी होई. पडेल ती जबाबदारी निभावण्याचा हरहुन्नरी स्वभाव असल्याने, आजूबाजूच्या गावांच्या उत्सवातही विपुल महत्त्वाचा चेहरा झाला.
उत्सवातील कामे करता-करताच, विपुलला अंगभूत कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली, ती वाघांबे गावच्या उत्सवात. विपुल आठवीत असतानाच, त्याची नाटकात काम करण्याची आवड बघून, परस्पर साहाय्यक मंडळाचे दिग्दर्शक घनश्याम जोशी यांनी विपुलला संधी दिली. परस्पर साहाय्यक मंडळाच्या माध्यमातून, प्रतिवर्ष उत्सवकाळात संगीत नाटक सादर केले जाते. हेच नाटक पुढे संगीत नाटकांच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठीही जाते. विपुलने केलेले पहिले नाटक म्हणजे ‘संगीत मृच्छकटिक’! हे त्याचे रंगभूमीवर पडलेले पहिले पाऊल. या नाटकातील त्याची भूमिका लहानच होती. मात्र, त्यातही विपुलने प्रेक्षकांना प्रभावित केले. मात्र, त्याच्या समोर एक आव्हान होते की, आजवर त्याने ना कधीच अभिनय केला होता, ना अभिनयाचे शिक्षण घेतले होते. मात्र, यानंतर सातत्याने विपुलने विविध लहानलहान भूमिका करतच, अभिनयामध्ये प्रावीण्य मिळवले. एक गोष्ट शिकावी, तर पुढे दुसरे आव्हान उभे राही, अशीच सुरुवातीच्या दिवसात विपुलची मनोदशा असे.
संगीत नाटकात काम करताना जसा अभिनय हवा, तसे संगीतही हवे! आता विपुलने अभिनयाचे शिक्षण घेतले नव्हते, तसेच संगीताचेही नव्हतेच. मात्र, ‘आवड असल्यास सवड मिळते’ याच म्हणीचा प्रत्यय म्हणजे, विपुलचे या क्षेत्रातील यश ठरावे. अर्थात, संगीत शिकण्यासाठीही विपुलने कोणतेही शिकवणीवर्ग न लावता, परस्पर साहाय्यक मंडळाचे संगीत मार्गदर्शक विलास हर्षे यांच्याकडे जाण्यास सुरुवात केली. उत्सवाच्या आधी नाटकाची तालीम सुरू झाली की, हर्षे यांच्याकडे जायचे आणि गाण्याचा सराव करून ते बसवून घ्यायचे, हा विपुलचा ठरलेला शिरस्ता!
यामुळे हळूहळू विपुलला संगीतातील बारकावे समजू लागले. शिवाय, याच्या जोडीला गावातील भजने, आरत्या असे कार्यक्रम होतेच. यातूनही विपुलची गाण्याशी मैत्री झाली. आजवर विपुलने जवळपास १५पेक्षा अधिक संगीत नाटकांमधून भूमिका केल्या असून, यामध्ये ‘संगीत जय जय गौरीशंकर’, ‘संगीत सुवर्णतुला’, ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ अशा नाटकांतील प्रमुख भूमिकाही केल्या आहेत. शिवाय, यातील अनेक भूमिकांसाठी विपुल याला अभिनयासाठी राज्यस्तरीय ‘रौप्यपदक’ आणि ‘अभिनय गुणवत्ता’ व ‘गायन गुणवत्ता’ अशी पारितोषिके मिळाली आहेत. शिवाय, ‘यूथ फेस्टिव्हल’ नाट्यगीत गायन स्पर्धेचे विद्यापीठस्तरीय ‘कांस्यपदक’ही विपुलने जिंकले आहे. गावच्या परंपरांतून अंगभूत कलेला जपत, तिचा विस्तार करणारा विपुलचा प्रवास प्रेरक असाच. पुढेही संगीत रंगभूमीची सेवा करण्याचा मानस विपुलचा असून, ‘संगीत होनाजी बाळा’ नाटकातील ‘होनाजी’ची भूमिका साकारण्यासाठी विपुल उत्सुक आहे. त्याच्या पुढील यशासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
लेखक- कौस्तुभ वीरकर