देशहितापेक्षा इंटरनेट सेवा मोठी नाही; स्टारलिंकविरोधात स्वदेशी जागरण मंच आक्रमक!

राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निकाली निघेपर्यंत परवानगी न देण्याबाबत मंचाची केंद्र सरकारकडे मागणी

    04-Nov-2026   

Swadeshi Jagran Manch
 
मुंबई (Swadeshi Jagran Manch) : राष्ट्रीय सुरक्षा, डेटाची गोपनीयता आणि देखरेख यंत्रणेशी संबंधित प्रश्नांचे समाधानकारक निराकरण होईपर्यंत ‘स्टारलिंक’ला भारतात उपग्रहाधारित इंटरनेट सेवा सुरू करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचाने केंद्र सरकारकडे केली आहे. या मागणीसाठी सोमवारी दुपारी मंचाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी स्टारलिंकविरोधात घोषणाबाजी करत कंपनीला भारतात सेवा सुरू करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय सह-संघटक सतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
 
सतीश कुमार यांनी सांगितले की, स्टारलिंक कंपनीला भारतात सेवा सुरू करण्याची परवानगी देऊ नये. ही उपग्रह तंत्रज्ञानावर आधारित इंटरनेट सेवा असली, तरी अशा प्रकारचे तंत्रज्ञान भारतातही उपलब्ध आहे. भारतातील रोजगाराच्या प्रश्नावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड करता येणार नाही. स्टारलिंकच्या सेवा स्वस्त आणि दर्जेदार असल्या, तरी अमेरिका, एलन मस्क आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. इराण तसेच रशिया-युक्रेनसह विविध आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील त्यांची भूमिका पाहता भारतानेही सतर्क राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा आणि विश्वासार्हतेशी संबंधित या प्रश्नांचा विचार करता स्टारलिंकला भारतात प्रवेशाची परवानगी देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.(Swadeshi Jagran Manch)
 
या मुद्द्यावर स्वदेशी जागरण मंच देशभरात आंदोलने करत आहे. प्रतिकात्मक पुतळा दहन करून जागतिक स्तरावर आणि भारत सरकारला संदेश दिला जात आहे. अशा कंपन्यांना भारतात प्रवेशाची परवानगी देऊ नये, असे आवाहन मंचाने केंद्र सरकारला केले आहे. स्वदेशीच्या भावनेचा विचार करून भारत सरकार देशहिताच्या दृष्टीने अंतिम निर्णय घेईल, असा विश्वासही सतीश कुमार यांनी व्यक्त केला.
 
स्वदेशी जागरण मंचाने एलन मस्क यांच्या विधानांवर टीका करताना भारताच्या राजकीय आणि व्यावसायिक बाबींविषयी अशा प्रकारच्या टिप्पणी करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. अंबानी यांना भारताचे पंतप्रधान बनविण्याबाबत करण्यात आल्याचे सांगितले जाणारे कथित विधान निंदनीय असल्याचे मंचाने म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी सार्वजनिक विधानांच्या माध्यमातून भारतीय उद्योजक आणि सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही मंचाने केला.(Swadeshi Jagran Manch)
 
भारतात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक कंपनीने भारतीय कायदे, राष्ट्रीय हित आणि देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर करणे आवश्यक आहे, असे मंचाने स्पष्ट केले. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञानाचा विकास महत्त्वाचा असला, तरी राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक हितांपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी असू शकत नाही, अशी भूमिका मंचाने मांडली.(Swadeshi Jagran Manch)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर