कोणतीही सामाजिक संघटना तिच्या कार्यकर्त्यांच्या बळावर उभी असते. विचारांची स्पष्टता, कामाप्रति बांधिलकी आणि समाजासाठी योगदान देण्याची तयारी असलेले कार्यकर्ते घडविणे, ही संघटनेची महत्त्वाची जबाबदारी. याच उद्देशाने ‘समता परिषद, मुंबई’च्यावतीने कर्जत येथे आयोजित दोन दिवसीय अभ्यास शिबिरात संघटनेची वाटचाल, कार्यपद्धती आणि सामाजिक समरसतेच्या विचारावर चर्चा करण्यात आली. त्याचा आढावा घेणारा हा लेख...
समता परिषद, मुंबई’च्यावतीने दि. ३१ ऑक्टोबर आणि दि. १ नोव्हेंबर रोजी कर्जत येथील ‘ड्रिमलॅण्ड रिसॉर्ट’मध्ये कार्यकर्ता अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. ‘सामाजिक समरसता गतिविधी’चे कोकण प्रांत सहसंयोजक अरुण गायकवाड आणि ‘समता परिषदे’चे संस्थापक सदस्य व माजी मंत्री विजय गिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाची प्रस्तावना शरद कांबळे यांनी केली. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबतच तरुण, महिला आणि युवतींचीही लक्षणीय उपस्थिती होती. संघटनेच्या जुन्या आणि नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना एकत्र आणत त्यांच्या अनुभवांची आणि विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला.
‘समता परिषदे’ची स्थापना दि. १५ जुलै १९७९ रोजी बोरिवली येथील नॅशनल पार्क परिसरात झाली. माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, वामन परब, नंदा कुलकर्णी, भिवा गावकर, श्रीधर पवार आणि बाबाजी लाखन यांच्या प्रमुख पुढाकारातून संघटनेची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळातील कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार आणि उभे केलेले काम यांमुळे ‘समता परिषदे’च्या पुढील वाटचालीचा पाया तयार झाला. या प्रवासाची माहिती नव्या पिढीतील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे, हा अभ्यास शिबिरातील महत्त्वाचा भाग होता. विजय गिरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात ज्येष्ठ कार्यकर्त्यांना ‘तळपते सूर्य’, तर नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना ‘नवोदयाची किरणे’ असे संबोधले. "ज्येष्ठांनी वर्षानुवर्षे केलेल्या कामातून मिळालेला अनुभव आणि तरुणांमधील नवी ऊर्जा यांचा समन्वय साधला, तर संघटनेचे काम अधिक प्रभावी होऊ शकते,” असे अधोरेखित केले. शिबिरात मनोरंजन सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. या सत्रात कार्यकर्त्यांनी आपल्यातील कला, क्रीडा आणि इतर कौशल्यांचे सादरीकरण केले. अभ्यास आणि विचारमंथनाबरोबरच कार्यकर्त्यांमधील परस्पर संवाद आणि परिचय वाढविण्याच्या दृष्टीने हे सत्र उपयुक्त ठरले. वेगवेगळ्या भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांना एकमेकांचे अनुभव जाणून घेण्याची आणि संघटनेच्या कामाबाबत मोकळेपणाने चर्चा करण्याची संधीही मिळाली. ‘समता परिषदे’चे सुवर्णमहोत्सवी वर्ष २०२९ मध्ये साजरे होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर सामाजिक समता आणि समरसतेचे विचार रुजविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी आगामी वर्षात कार्यक्रमांची आखणी करण्यास सुरुवात झाली आहे. या शिबिराच्या आयोजनासाठी संजय अढांगळे, विजय पवार, सुभाष कांबळे, संजय साळवे, शरद कांबळे, मयूर देवळकर, सागर देवरे आणि योजना ठोकेळे यांनी पुढाकार घेतला. दोन दिवसांच्या या शिबिरातून संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेण्याबरोबरच पुढील काळातील कामाची दिशा आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदार्यांवर चर्चा झाली. संघटनेचे काम अधिक व्यापक करण्यासाठी कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक मजबूत करणे आणि त्यांना प्रत्यक्ष कामात संधी देणे, हा या शिबिराचा महत्त्वाचा उद्देश ठरला.
महापुरुषांचे विचार आणि ज्येष्ठांचा अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम अशा शिबिरांतून होते. ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांची ऊर्जा एकत्र आली, तर सामाजिक कार्याला निश्चितच बळ मिळेल.
- अरुण गायकवाड,सहसंयोजक, सामाजिक समरसता गतिविधी, कोकण प्रांत
संघटनेचे काम पुढे नेताना सहकार्यांना सोबत घेणे आणि समाजासाठी सातत्याने काम करणे गरजेचे आहे. अशा शिबिरांमुळे कार्यकर्त्यांना नवी दिशा मिळते.
- संजय बाविस्कर, कार्यकर्ता, समता परिषद, मुंबई
‘समता परिषदे’च्या कार्यात महिलांच्या नेतृत्वगुणांना वाव दिला जातो. अभ्यास शिबिरात ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत नव्या पिढीतील महिला आणि युवतींनाही विचार मांडण्याची व एकमेकांचे अनुभव जाणून घेण्याची संधी मिळाली.
- योजना ठोकेळे, महिला अध्यक्षा, समता परिषद, मुंबई
लेखक- क्रांती गिरकर - कुंदर