समरसतेची महा आरती : गोदाआरती!

    04-Nov-2026   

Goda Aarti 
 
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ध्वजारोहण समारंभ नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन्ही ठिकाणी अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. दि. ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहणानंतर ६ हजार ३२३ आदिवासी बंधुभगिनींनी गोदावरीपूजन, गोदामहाआरती केली. भारतीय धर्मसंस्कृतीच्या दृष्टीने ही घटना अगदी सुवर्णाक्षरांनी लिहिण्याइतकी महत्त्वाची. ‘तू मैं एक रक्त’ या संकल्पनेने अवघा हिंदू एक आहे, सर्व हिंदूंची धर्मसंस्कृती, समाजसंस्कृती आणि इतिहासाची परंपराही एकच आहे, असा भाव प्रस्थापित करणारी ही घटना. या श्रद्धाशील समरस भव्य घटनेचा, वास्तवाचा मागोवा या लेखात घेतला आहे.
 
श्री आरती गोदावरी| उगमस्थ ब्रह्मगिरी॥
कुशावर्त गङ्गाद्वारी| माता श्री त्र्यम्बकेश्वरी॥
आरती ओवाळू चरणी| पूज्यमाता गोदावरी॥
 
रामकुंडावर सर्वत्र दिव्य वातावरण भारून राहिले आहे. तब्बल नऊ मिनिटे गोदावरी नदीची नव्हे, गोदा‘माई’ची आरती सुरू आहे. शांत, संयमी, सुंदर गोदामाई आणि तिच्या तीरावर जमलेले तिची श्रद्धेने-प्रेमाने आरती करणारे होते, ते आदिवासी समाजाचे ६ हजार ३२३ बंधू आणि भगिनी. दिव्यांची रोषणाई, धुपारतीचा पवित्र सुगंध, आरती करणार्‍यांच्या चेहर्‍यावर अतीव आनंद, श्रद्धा आणि अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या. का? कारण, कुंभमेळ्यात जातीपातीला थारा नसतो. मात्र असे असले तरीसुद्धा, आदिवासी बांधवांना कुंभमेळ्यानिमित्त गोदामाईची साग्रसंगीत पूजा करण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. ‘हजारो वर्षांपूर्वी प्रभू राम दंडकारण्यात आले असता, त्यांच्या सोबत आम्ही होतो; श्रद्धाशील हिंदू समाजाच्या मूळ प्रवाहाचे आम्हीही घटक आहोत. आम्ही या देशाच्या या धर्माच्या संस्कृतीचे वारसदार आहोत,’ या भावनेने त्यांच्या डोळ्यांत अश्रू उतरले. ते अश्रू गोदामाईच्या जलकणांच्या जीवनमूल्यांची साक्षच होते. भारतीय विचार दर्शनाच्या समरस भावाचे अमृतकुंभच जणू या कुंभमेळ्याच्या निमित्ताने जगासमोर आले.
 
या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. गोदामाता ही केवळ नदी नाही, तर ती जिवंत श्रद्धेचे प्रतीक आहे. ती आई आहे. तिची स्वच्छता राखणे, तिच्या पात्रात असलेल्या प्रत्येक जीवाचे संवर्धन करणे, हे आपले कर्तव्य आहे, हेच या आरतीतून प्रतीत झाले. हे समाजबांधव ज्या ६५० गावांमध्ाून आले होते, त्या गावांमध्ये गोदामहाआरतीनंतर गावस्तरावर आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. गोदावरीसह स्थानिक नद्या, नाले, तलाव आणि पारंपरिक जलस्रोतांचे संरक्षण करणे, पाण्याचे प्रदूषण रोखणे आणि निसर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा व्यापक हेतू आहे. या गोदामहाआरतीचे महत्त्व खरे तर शब्दांत विशद करणे कठीण. कारण धर्मांकर्मासाठी जीवाचेही बलिदान करू शकणार्‍या आदिवासी समाजाची इंग्रजांनी लादलेल्या पारतंत्र्यानंतर दुरवस्था झाली. स्वातंत्र्यानंतरही परिस्थिती ‘जैसे-थे’च राहिली. समाजविघातक शक्तींनी कटकारस्थानी लोकांनी भोळ्या समाजाचा गैरफायदा घेतला. ‘आदिवासी हे हिंदू नाहीत’, ते ‘रावणदहन करायचे नाही, कारण रावण आपला बाप आहे,’ असे काहीबाही त्यांनी शिकवले. दुसरीकडे येशूच्या नावाने धर्मातरण करणार्‍यांनीही याबाबत काही कसर सोडली नाही. दिमागी नक्षलींनीपण समाजाला लक्ष्य केलेलेच. त्यामुळे बांधवांना चिथावणी देण्यात तेही कमी नाहीत. (असे अनेकदा पाहिले आहे). पण, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त झालेल्या गोदामहाआरतीने वाटले की सर्व हिंदू समाज ‘तू मैं एक रक्त’ संकल्पनेने अभिभूत आहे. वनवासी, गिरिवासी, ग्रामवासी, शहरवासी यांत भेद नाही. समस्त हिंदूंचे अंतरंग भारतीय श्रद्धेच्या शक्तीने ओतप्रोत आहे.
 
याच अनुषंगाने वास्तव मांडावेसे वाटते की, आदिवासी समाजाच्या हस्ते गोदाआरती होणार, असे कळताच, काही समाजविघातक सक्रिय झाले. त्यांनी भोळ्या समाजबांधवांना चिथावायला सुरुवात केली की, ‘तुम्ही त्या आरतीला जाऊ नका. तिथे तुमचा अपमान होईल,’ वगैरे वगैरे. पण या काही लोकांच्या चिथावणीला समाजाने भीक घातली नाही. ‘आम्ही आमच्या गोदामाईची आरती करणारच,’ म्हणत समाजातील बंधुभगिनी आरतीमध्ये सहभागी झाले. सगळ्यात विशेष म्हणजे, समाजकंटकांच्या चिथावणीमध्ये आलेले बांधवही शेवटच्या टप्प्यात ‘या आरतीत आम्हालाही सहभागी व्हायचे आहे,’ असे म्हणत आरतीत सहभागी होण्यासाठी आग्रह करू लागले, तर हिंदू धर्म त्यागून ख्रिस्ती धर्म स्वीकारणार्‍या बांधवांनाही या महाआरतीमुळे आपल्या मूळ हिंदू पूजापद्धती, निसर्गपूजा विधी यांची ओढ वाटली. त्यातल्याही अनेकांनी या महाआरतीमध्ये आणि येणार्‍या शाही स्नानामध्ये सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. समरस समाजासाठी गोदामाई पावली, असेच म्हणावे लागेल. पुढेही नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा असाच पावित्र्यात आणि मांगल्यात सफल होईल, हे नक्की!
 
नाशिकच्या शाश्वत विकासासाठी प्राधिकरण सदैव तत्पर
 
ध्वजारोहण समारभांत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "निसर्गाचा समतोल राखून केलेला विकासच देशाला पुढे नेऊ शकतो. तसेच देशाचा विकास तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा समाजातील शेवटचा घटक समृद्ध होईल.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्राधिकरणाच्या कार्याचा केंद्रबिंदूही हाच आहे. कुंभमेळ्यासाठी निर्धारित झालेल्या निधीपैकी ८५ टक्के निधी हा नाशिकच्या शाश्वत पायाभूत सुविधा आणि विकासासाठी उपयोगात आणला जाणार आहे. धर्मभूमी नाशिकचे पावित्र्य, निसर्गाचे महत्त्व राखत, मानवी मूल्ये जपत प्राधिकरण हा विकास करत आहे. मात्र, हा विकास कुंभमेळ्यासाठी तात्पुरता नाही, तर नाशिकच्या इतिहासातील हा शाश्वत विकास असणार आहे. या विकासामुळे वैभवशाली परंपरेने आणि विकासाच्या सर्वोत्तम स्तराने नाशिक सदैव आदर्श शहर म्हणून प्रस्थापित होणार आहे.
-शेखर सिंह, आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर
सिंहस्थ कुंभमेळा
 
समरसतेचा आणि विकासाचा महाकुंभ
 
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा सर्व समाजाचा कुंभमेळा आहे. हा वैश्विक धार्मिक उत्सव आहे. हा कुंभ आस्थेचा, श्रद्धेचा कुंभ असून तो समरसतेचा महाकुंभ आहे. संतमहात्म्यांनी समरस समाजाची बांधणी केली. त्या समरस समाजासाठी कुंभमेळ्याच्या माध्यमातून सर्व समाज एकत्र यावेत, धर्मसमाज आणि देशनिष्ठ शक्तीचा जागर व्हावा, हा हेतू समन्वयक म्हणून माझा आहे. कुंभमेळ्याचे ऐतिहासिक धर्मशील वैभव, पावित्र्य अबाधित राखणे, हे प्रथम उद्दिष्ट आहे. कुंभमेळ्यानिमित्त नाशिक शहराचा पायाभूत विकास होणार असून या विकासात्ाून नाशिकची देदीप्यमान प्रगती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने २०२७च्या कुंभमेळ्यानिमित्त केलेले नियोजनकार्य हे पुढे भविष्यातल्या धर्मसमाजकार्यासाठी आणि विकासासाठी दीपस्तंभ ठरेल, यात शंका नाही. नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा हा ‘न भूतो न भविष्यति’ असे भव्य आणि तितकेच मानवी मूल्य जपणारा ठरावा, ही गोदामाईचरणी प्रार्थना!
-रामेश्वर नाईक, समन्वयक,
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा
 
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण’ आणि कुंभ समन्वयकांना १०० पैकी १०० गुण!
 
कुंभमेळ्यानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारेाहण समारंभास, तसेच महागोदाआरतीच्या आखीव-रेखीव समरसतेच्या धर्मशील कार्यक्रमासाठी १०० पैकी १०० गुण ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणा’ला आणि कुंभ समन्वयकांना द्यायलाच हवेत. कारण धार्मिक किंवा अन्य कोणत्याही कारणाने गर्दीचा कडेलोट झाला की तिथे शिस्तीचा बोजवारा उडतो. अव्यवस्थेसह चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटना होतात. पण या महाआरतीच्या निमित्ताने खेड्यापाड्यातून हजारो बांधव आरतीसाठी आले. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवर मंत्रिगण आणि लाखोंचा समुदाय तिथे हा सोहळा पाहण्यासाठी आले. मात्र, तरीही इथे सुव्यवस्था होती. घरचे धार्मिक कार्य ज्या सुबक-सुंदर पद्धतीने आयोजित होते, तसे हा भव्य सोहळा होता. दृष्ट लागावी, असे नियोजन आणि या तांत्रिक नियोजनताही सिंहस्थ कुंभमेळ्याचे राखलेले अबाधित पावित्र्य! हे पाहून ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण’ आणि कुंभमेळा समन्वयक यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि नियोजनशक्तीची जाणीव होते.
 
आम्हा जनजाती समाजासाठी सन्मान आणि अभिमानाचा क्षण
 
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यानिमित्त गोदामाईच्या आरतीसाठी ६ हजार ३२३ समाजबांधव आले. धर्मजागरणाच्या माध्यमातून १५४ गावातील १ हजार ५३१ बंधुभगिनींना या आरतीसाठी यशस्वी संपर्क केला. आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही समाजाच्या मूळ प्रवाहाचा आम्ही घटक आहोत, याचा अभिमान उत्पन्न करणाारी ही घटना आहे. आम्ही केलेल्या आरतीची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली. जगाच्या पटलावर आमची श्रद्धा आमचे अस्तित्व अधोरेखित झाले. हे आम्ही शब्दांत सांगू शकत नाही.
-शिवराज जाधव, अंशकालीन प्रमुख,
नाशिक ग्रामीण धर्मजागरण
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर