मुंबई (Dattatreya Hosabale RSS Meeting 2026) : अराजकवादी शक्तींना समाजावर प्रभाव निर्माण करण्याची किंवा राष्ट्रीय चर्चाविश्वावर वर्चस्व गाजविण्याची संधी मिळता कामा नये. समाजातील सज्जनशक्ती निष्क्रिय राहिल्या, तर अराजकवादी शक्तींना प्रोत्साहन मिळते. केवळ आपल्या घराच्या चार भिंतींत चांगले राहणे पुरेसे नाही. सामाजिक मूल्यांवर विश्वास असणाऱ्या लोकांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय होऊन आपली भूमिका ठामपणे मांडली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी झाला. इंदूर येथील डेली कॉलेजमधील संत श्री रविदास महाराज सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी संबोधित केले. याप्रसंगी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर देखील उपस्थित होते. (Dattatreya Hosabale RSS Meeting 2026)
माध्यमांशी बोलताना सरकार्यवाह म्हणाले की, काही अराजकवादी शक्ती लोकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा शक्ती देशाच्या अंतर्गत तसेच बाहेरीलही असू शकतात. जगातील अन्य देशांमधील घटनांचा अनुभव पाहता, अशा काही घडामोडींच्या मागे कटकारस्थानाचा भाग असल्याचे दिसून येते. युवकांच्या आकांक्षा आणि त्यांच्या मनातील प्रश्न समजून घेऊन त्यांचे निराकरण करणे ही समाजाबरोबरच सरकारचीही जबाबदारी आहे. संघाचा दृष्टिकोन नव्या पिढीशी संवाद कायम ठेवण्याचा आहे. समाजव्यवस्था आणि प्रशासनाविषयी युवकांच्या काही तक्रारी रास्त असू शकतात. परंतु, त्यांच्या असंतोषाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणे, समाजात फूट पाडणे किंवा हिंसाचाराला प्रोत्साहन देणे स्वीकारार्ह नाही. संघ अशा प्रयत्नांना विरोध करतो.
बैठकीत अराजकवादी शक्तींपासून सावध राहण्याच्या विषयावरही चर्चा झाल्याचे दत्तात्रेय होसबाळे यांनी सांगितले. या चर्चेतील महत्त्वाचे पैलू त्यांनी स्पष्ट केले. युवकांच्या रास्त समस्या आणि आकांक्षा समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, या मागण्या विधायक आणि संघटित मार्गाने मांडल्या गेल्या पाहिजेत. लोकशाही व्यवस्थेत निवडणुकांच्या माध्यमातून सरकार बदलण्याचा प्रयत्न करणे हा राजकीय उद्देशाचा भाग असू शकतो. मात्र, अशा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी समाजात अस्वस्थता निर्माण करणे, फूट पाडणे किंवा हिंसाचाराचा मार्ग स्वीकारणे हे समाजहिताचे नाही, अशी स्पष्ट भूमिका सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी यावेळी घेतली. (Dattatreya Hosabale RSS Meeting 2026)
संघाच्या 'सीमांत प्रणाम' या पूर्वीच्या उपक्रमाचे उदाहरण देताना होसबळे म्हणाले की, या कार्यक्रमात देशाच्या विविध भागांतील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी भारताच्या सीमावर्ती भागांना भेटी दिल्या. केरळ, बिहार आणि राजस्थान यांसारख्या राज्यांतील युवक आसाममधील सीमावर्ती भागांत गेले आणि तेथे त्यांनी एकमेकांशी संवाद साधला. अशा उपक्रमांना युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. युवकांना समाजसेवा आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणाऱ्या सकारात्मक उपक्रमांशी जोडले पाहिजे, असे संघाचे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या प्रांतीय रचनेऐवजी संभाग पद्धती लागू करण्यासंदर्भातील संघटनात्मक बदलांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना होसबळे म्हणाले की, नव्या व्यवस्थेत संभाग स्तरावरही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या प्रांत स्तरावर प्रांत संघचालक, प्रांत कार्यवाह आणि प्रांत प्रचारक अशी पदांची रचना आहे. त्याच धर्तीवर संभाग स्तरावर संभाग संघचालक आणि अन्य संबंधित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यानुसार नव्या संघटनात्मक रचनेची आखणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Dattatreya Hosabale RSS Meeting 2026)
दरम्यान, बैठकीत यापूर्वी राजनारायण बसू, स्वामी श्रद्धानंदजी आणि स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त तीन निवेदने प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये शुद्धी आंदोलनाचे पराक्रमी नेते स्वामी श्रद्धानंद यांच्या कार्याचा तसेच धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करणारे संत स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
या बैठकीला देशभरातून सुमारे ४०० प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये सरसंघचालक, सरकार्यवाह, सर्व सहसरकार्यवाह, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, संघाच्या सर्व ११ क्षेत्रांचे क्षेत्र संघचालक, क्षेत्र कार्यवाह आणि क्षेत्र प्रचारक तसेच सर्व ४६ प्रांतांचे प्रांत संघचालक, प्रांत कार्यवाह, प्रांत प्रचारक आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते सहभागी झाले. याशिवाय संघप्रेरित काही विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटनमंत्री आणि सहसंघटनमंत्री बैठकीला उपस्थित होते. (Dattatreya Hosabale RSS Meeting 2026)
आरक्षण रद्द करण्याची संघाची भूमिका नाही
संघ आरक्षण रद्द करण्याच्या बाजूने नाही. ज्या समाजघटकांना ऐतिहासिक आणि सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला आणि त्यामुळे जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिले, अशा घटकांसाठी आरक्षणाची व्यवस्था कायम राहिली पाहिजे, असे सरकार्यवाह म्हणाले. ऐतिहासिक आणि सामाजिक भेदभावामुळे निर्माण झालेली विषमता व असमानता दूर होईपर्यंत आरक्षणाची व्यवस्था सुरू राहिली पाहिजे. भेदभावाचा सामना केलेल्या समाजघटकांना समाजात समानता प्रस्थापित झाल्याची जाणीव होईपर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून मिळणारे सहाय्य सुरू राहणे आवश्यक आहे. आरक्षणाचे लाभ त्यासाठी खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. काही पात्र समाजघटकांना आरक्षणाचा लाभ मिळत असेल आणि काही पात्र घटक त्यापासून वंचित राहत असतील, तर आवश्यक सुधारणा करण्याचा विचार केला पाहिजे. मात्र, अशा सुधारणा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या समाजघटकांशी आणि संबंधित व्यक्तींशी चर्चा करूनच केल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (Dattatreya Hosabale RSS Meeting 2026)
डाव्यांच्या मान्यतेची संघाला अपेक्षा नाही; समाजाचे समर्थन महत्त्वाचे
डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून संघाच्या कार्याला मान्यता मिळण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना होसबळे म्हणाले की, संघाला डाव्यांच्या मान्यतेची अपेक्षा नाही, तर समाजाचे समर्थन हवे आहे. ते म्हणाले, "आम्ही डाव्यांच्या मान्यतेच्या आधारावर काम करीत नाही. त्यांच्या मान्यतेनुसार काम करायचे ठरविले असते, तर संघाला फार पूर्वीच आपले काम गुंडाळावे लागले असते. त्यामुळे अशा मान्यतेला आमच्यासाठी काहीही महत्त्व नाही." (Dattatreya Hosabale RSS Meeting 2026)
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला समर्थन
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोधकांकडून होत असलेला विरोध आणि त्यामागे कटकारस्थान असल्याच्या आरोपांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना होसबळे म्हणाले की, राजकीय पक्ष आपापल्या अजेंड्यानुसार काम करीत असतात. लोकशाही व्यवस्थेत ते स्वाभाविक आहे. मात्र, एखाद्या विषयाला विरोध करताना मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे की नाही, याची तपासणी केली पाहिजे. एसआयआरचा उद्देश मतदारयाद्यांचे शुद्धीकरण करणे आणि त्या अद्ययावत ठेवणे हा आहे. सुमारे १३ कोटी नावे वगळण्यात आल्याच्या संदर्भात ते म्हणाले की, त्यापैकी अनेक कोटी नावे मृत व्यक्तींची होती. अशा व्यक्तींची नावे मतदारयादीत कायम ठेवणे योग्य नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्यास अशा दुबार नोंदीही काढून टाकल्या पाहिजेत. भारताचे नागरिक नसलेल्या व्यक्तींची नावे मतदारयादीत समाविष्ट झाली असतील, तर देशाच्या आर्थिक हितसंबंधांच्या आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने तो चिंतेचा विषय आहे. अशा व्यक्तींची नावे मतदारयादीत कायम राहता कामा नयेत, असेही त्यांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या कार्यकाळात बिहारमध्ये झालेल्या मतदारयादी पुनरीक्षणाचा संदर्भ देत होसबळे यांनी तो निर्णय चुकीचा होता का आणि त्यावेळी कोणत्या पक्षाचे सरकार सत्तेत होते, असा प्रश्न उपस्थित केला. मतदारयाद्यांचे शुद्धीकरण ही वेळोवेळी केली जाणारी प्रक्रिया आहे. यादीत नाव असण्यास पात्र नसलेल्या व्यक्तींची नावे काढून टाकली पाहिजेत. मात्र, एखाद्या पात्र व्यक्तीचे नाव चुकीने वगळले गेले असेल, तर त्याविरोधात तक्रार करण्यासाठी आणि दुरुस्ती करून घेण्यासाठी तरतुदी उपलब्ध आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
संघाची नवी संघटनात्मक रचना; ४६ प्रांतांऐवजी ८८ संभागांची निर्मिती
संघाच्या प्रस्तावित संघटनात्मक बदलांविषयी माहिती देताना सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य देशभरातील ४६ प्रांतांच्या माध्यमातून चालत होते. मात्र, आगामी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत होणाऱ्या संघटनात्मक प्रक्रियेनंतर संघाची रचना नव्याने करण्यात येणार असून, ४६ प्रांतांऐवजी ८८ संभागांची निर्मिती केली जाणार आहे. या कालावधीत प्रांत संघचालकांच्या निवडी तसेच प्रांतांच्या नव्या कार्यकारिण्यांची स्थापना केली जाईल. देशभरातील संघकार्याचा प्रभावी विस्तार आणि समन्वय साधण्यासाठी या ८८ संभागांची संघटनात्मक आखणी आणि जबाबदाऱ्यांचे वाटप याविषयीही बैठकीत चर्चा करण्यात आली, असे होसबळे यांनी सांगितले. (Dattatreya Hosabale RSS Meeting 2026)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक