मुंबई (Borivali East Encroachment Removal) : बोरिवली पूर्व येथील बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम मुंबई महापालिकेने यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल २७ व्यावसायिक गाळे निष्कासित करण्यात आले. त्यामुळे बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेला सुमारे ३ हजार ४०० चौरस मीटरचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
बोरिवली पूर्वेतील स्वामी विवेकानंद मार्गावरील अंदाजे भूखंड क्रमांक ७ बी, नगर भूमापन क्रमांक १५, नगररचना योजना-२ अंतर्गत हा भूखंड बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) बस स्थानकासाठी आरक्षित आहे. मात्र, या भूखंडावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अतिक्रमणे करण्यात आली होती. ही अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या आर मध्य विभागाने विशेष मोहीम आखली होती. (Borivali East Encroachment Removal)
या मोहिमेसाठी महापालिकेचे अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ७० जणांचे पथक तैनात करण्यात आले होते. अतिक्रमित बांधकामे हटविण्यासाठी दोन जेसीबी आणि चार डंपरचा वापर करण्यात आला. या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने २७ व्यावसायिक गाळे निष्कासित करण्यात आले. कारवाई सुरळीत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी घटनास्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईनंतर महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम पूर्ण केल्याने बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित भूखंडाच्या मोकळ्या वापराचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (Borivali East Encroachment Removal)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.