मुंबई (ABVP Student Representatives Delhi Gathering) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दिल्लीच्या आवाहनावर बुधवारी नवी दिल्ली येथे देशभरातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या निर्वाचित विद्यार्थी संघ पदाधिकाऱ्यांसह प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधींचे भव्य एकत्रीकरण पार पडले. देशाच्या विविध भागांतून आलेल्या या निर्वाचित प्रतिनिधींनी एका व्यासपीठावर एकत्र येत ‘अराजकता सोडा, लोकशाही स्वीकारा’ असा सामूहिक संकल्प केला.
देशातील विविध विद्यापीठांमध्ये लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या या महाकुंभातून आपापल्या शैक्षणिक परिसरांतील लाखो विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणारा एकजुटीचा आवाज उमटला. अलीकडेच पार पडलेल्या विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थी संघ निवडणुकांमध्ये अभाविपने उल्लेखनीय यश संपादन करत अनेक प्रमुख विद्यार्थी संघटनांमध्ये आपले प्रतिनिधित्व सुनिश्चित केले आहे. याच निर्वाचित प्रतिनिधींनी दिल्लीत एकत्र येत लोकशाही व्यवस्थेत जनादेशाचा सन्मान, संवैधानिक संस्थांची प्रतिष्ठा आणि कायद्याचे राज्य सर्वोच्च असल्याचा स्पष्ट संदेश दिला. देशभरात ‘अराजकता सोडा, लोकशाही स्वीकारा’ या अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विद्यार्थी गर्जना रॅलींच्या मालिकेतील हा महाकुंभ म्हणजे विद्यार्थीशक्तीच्या लोकशाहीप्रती असलेल्या बांधिलकीचे व्यापक राष्ट्रीय स्वरूप आहे. (ABVP Student Representatives Delhi Gathering)
या महाकुंभात दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष यश डबास, सचिव रिया छावडी आणि सहसचिव लक्ष्य राज सिंह; पंजाब विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अंकित भिदान आणि माजी अध्यक्ष गौरववीर सोहल; लडाख विद्यापीठाचे निर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधी; डीएव्ही पीजी महाविद्यालय, डेहराडूनचे विद्यार्थी संघ अध्यक्ष नवदीप राणा; उत्कल विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अभिराम; गुवाहाटी विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मानस प्रतिम कलिता तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी सहसचिव वैभव मीणा यांच्यासह देशभरातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे निर्वाचित विद्यार्थी संघ पदाधिकारी व प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले.
यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी एकमुखाने सांगितले की, लोकशाही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसते, तर निर्वाचित जनादेशाचा सन्मान, संस्थांची विश्वासार्हता आणि लोकशाही मूल्यांचे पालन या बाबीही लोकशाही व्यवस्थेच्या अनिवार्य अटी आहेत. (ABVP Student Representatives Delhi Gathering)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी म्हणाले, “भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून जनतेचा जनादेश, संविधान आणि लोकशाही संस्थांची विश्वासार्हता हीच भारतीय लोकशाहीची खरी ताकद आहे. राजकीय मतभेद आणि सरकारवर टीका करणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. मात्र, राजकीय स्वार्थाच्या पूर्ततेसाठी निवडणूक प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबाबत नागरिकांच्या मनात अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न दुर्दैवी आहेत. राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी निवडणूक प्रक्रियेबाबत काही ठोस आक्षेप असल्यास ते संवैधानिक संस्थांसमोर पुराव्यांसह मांडण्याऐवजी राजकीय आरोप आणि सार्वजनिक संभ्रम निर्माण करण्याचा मार्ग का स्वीकारला आहे, हे स्पष्ट करावे. लोकशाही आरोप, राजकीय कथन आणि रस्त्यांवरील दबावातून नव्हे, तर संवैधानिक प्रक्रियांचा सन्मान राखल्याने अधिक बळकट होते. (ABVP Student Representatives Delhi Gathering)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक