सिंधुदुर्ग (विशेष प्रतिनिधी) — पश्चिम घाटातील तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रात गवळण किटकाच्या म्हणजेच Praying mantis च्या नऊ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे (tillari sindhudurg). सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात २०२४-२५ या कालावधीत करण्यात आलेल्या अभ्यासात गवळणीच्या आठ वंश आणि पाच कुळांतील प्रजाती आढळल्या (tillari sindhudurg). अनुराग श्रीराम सिनारी आणि नानासाहेब प्रल्हाद कांबळे यांनी केलेले हे संशोधन इंटरनॅशनल जर्नल आॅफ एॅन्टोमोलाॅजी रिसर्च या नियतकालिकात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झाले आहे. (tillari sindhudurg)
गवळण म्हणजेच Praying mantis हा इतर कीटकांची शिकार करणारा कीटक आहे. मराठीत त्याला गवळण, देवघोडा, घो़डकिडा अशा स्थानिक नावांनी ओळखले जाते. त्याचे पुढील पाय भक्ष्य पकडण्यासाठी विशेष प्रकारे विकसित झालेले असतात. शरीराचा रंग आणि आकार सभोवतालच्या वनस्पतींशी मिळताजुळता असल्यामुळे तो झाडाझुडपांमध्ये सहज लपून राहू शकतो. पतंग, लहान फुलपाखरे, टोळ आणि मावा यांसारखे कीटक हे त्याचे भक्ष्य आहेत. त्यामुळे अन्नसाखळीतील भक्षक म्हणून त्याची महत्त्वाची भूमिका आहे. संशोधकांनी प्रत्यक्ष निरीक्षण, स्वीपिंग नेट आणि प्रकाशसापळ्यांच्या साहाय्याने गवळण किटकाचा अभ्यास केला. तिलारीचे घनदाट जंगल, तेर्वण मेढे पिकअप वेअर परिसर आणि रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशाजवळ निरीक्षणे करण्यात आली. या अभ्यासासाठीच्या क्षेत्र निरीक्षणादरम्यान त्यांना वनश्री फाऊंडेशनची मदत मिळाली.
जंगलात आशियाई Praying mantis (Hierodula sp.), महाकाय आशियाई Praying mantis (Hierodula unimaculata), व्हायोलिनसदृश Praying mantis (Wandering Violin Mantis), वृक्षसालीवरील Praying mantis (Humbertiella indica) या प्रजाती आढळल्या. तेरवण मेढे परिसरात बॉक्सर Praying mantis (Ephestiasula pictipes) आणि भारतीय फुलपाखरूसदृश Praying mantis (Creobroter apicalis) या प्रजाती प्रकाशाजवळ आढळल्या. अभ्यासात मँटिडे कुळातील चार प्रजाती आढळल्या. हायमेनोपोडिडे कुळातील दोन, तर लिटर्गुसिडे, एम्पुसिडे आणि इरिडोप्टेरिजिडे या कुळांतील प्रत्येकी एका प्रजातीची नोंद करण्यात आली. ठिपकेदार पंखांचा Praying mantis (Tropidomantis (Eomantis) guttatipennis), चिनी Praying mantis (Tenodera fasciata) आणि आशियाई उडी मारणारा Praying mantis (Statilia maculatta) या प्रजातींचीही निरीक्षणांदरम्यान नोंद झाली.
सखोल संशोधनाची गरज
तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राचे क्षेत्रफळ २९.५३५९ चौरस किलोमीटर आहे. हा परिसर महाराष्ट्रातील राधानगरी आणि आंबोलीच्या वनक्षेत्रांना कर्नाटकातील भीमगड तसेच गोव्यातील म्हादईशी जोडणाऱ्या वन्यजीव क्षेत्राचा भाग आहे. येथे वाघ, हत्ती आणि बिबट्यांसारख्या मोठ्या वन्यप्राण्यांबरोबरच कीटकांचीही विविधता आढळते. संशोधकांच्या मते, दोडामार्ग आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाकतोड्यांच्या विविधतेचा अधिक सखोल अभ्यास आवश्यक आहे. नोंदवलेल्या Hierodula sp. या प्रजातीची अचूक ओळखही अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करताना गवळणीसारख्या तुलनेने दुर्लक्षित कीटकांच्या अभ्यासालाही महत्त्व देण्याची गरज या संशोधनातून अधोरेखित झाली आहे.