राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला इंदूरमध्ये प्रारंभ

शताब्दी वर्षातील उपक्रमांचा आढावा आणि आगामी कार्ययोजनेवर होणार मंथन; देशभरातून सुमारे ४०० प्रतिनिधी बैठकीला उपस्थित

    03-Nov-2026   

RSS Executive Committee Meeting
 
मुंबई (RSS Executive Committee Meeting) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सोमवारी इंदूर येथील डेली कॉलेजमधील संत श्री रविदास महाराज सभागृहात प्रारंभ झाला. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीचे उद्घाटन केले.
 
या बैठकीला देशभरातून सुमारे ४०० प्रतिनिधी उपस्थित आहेत. यामध्ये सरसंघचालक, सरकार्यवाह, सर्व सहसरकार्यवाह, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, संघाच्या सर्व ११ क्षेत्रांचे क्षेत्र संघचालक, क्षेत्र कार्यवाह आणि क्षेत्र प्रचारक तसेच सर्व ४६ प्रांतांचे प्रांत संघचालक, प्रांत कार्यवाह, प्रांत प्रचारक आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. याशिवाय संघप्रेरित काही विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटनमंत्री आणि सहसंघटनमंत्री यांनाही बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.(RSS Executive Committee Meeting)
 
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी २०२५ ते विजयादशमी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. या कार्यक्रमांची आगामी अंमलबजावणी, त्यांचा पाठपुरावा आणि त्याद्वारे समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने विचारमंथन होणार आहे. विशेषतः पंचपरिवर्तनातील विषय समाजाच्या दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे रुजविणे आणि त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याच्या कार्ययोजनेवर चर्चा होईल.
 
शताब्दी वर्षात स्वयंसेवकांनी केलेल्या शाखाविस्ताराचाही आढावा घेतला जाणार आहे. नव्याने सुरू झालेल्या शाखा अधिक प्रभावी आणि नियमित करण्यासोबतच त्यांचे दृढीकरण करणे तसेच अधिकाधिक ठिकाणी शाखा सुरू करण्याबाबत विचारविनिमय होणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विजयादशमी उत्सवातील भाषणात समकालीन राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवर मांडलेल्या विचारांचीही बैठकीत चर्चा होणार आहे. हे विचार समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि त्यानुसार आगामी कार्ययोजना निश्चित करण्याबाबत विचार केला जाणार आहे.(RSS Executive Committee Meeting)
 
बैठकीच्या प्रारंभी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी मागील काही महिन्यांत निधन झालेल्या समाजातील प्रमुख व्यक्तिमत्त्वांना आणि कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये अभिनेते नाना पाटेकर, आशा भोसले, पूज्य संत पद्मश्री रमेश बाबा, विवेकानंद केंद्राचे माजी अध्यक्ष बालकृष्णन, बलवीर पुंज, चेन्नईचे एस. वेदांतम्, पत्रकार विराग पाचपोर, मुंबईचे पराग वेदक, माजी कुलगुरू देवेंद्र प्रताप सिंह, सच्चिदानंद महंती, प्रसिद्ध गायिका एस. जानकी आणि सुमन कल्याणपुरीकर तसेच संघाचे ज्येष्ठ प्रचारक विनोद कुमार यांचा समावेश होता.
 
बैठकीच्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचे तसेच मालवा क्षेत्रातील संघकार्याच्या क्रमिक विकासाचे दर्शन घडविणारे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी ३१ ऑक्टोबर रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले होते. सोमवारपासून हे प्रदर्शन माध्यमांच्या प्रतिनिधींसाठीही खुले करण्यात आले आहे.(RSS Executive Committee Meeting)
 
तीन महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांवर सरकार्यवाहांचे निवेदन
 
या बैठकीत सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्याकडून तीन ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्याविषयी निवेदने प्रसिद्ध केली जाणार आहेत.
 
- श्री राजनारायण बोस
- स्वामी श्रद्धानंद
- वेदांत केसरी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर