मुंबई, : (Pune Metro Projects)"विकासाचं एक उत्तम मॉडेल म्हणजे पुणे मेट्रो आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीला दिशा मिळणार आहे. 'वी विल डू इट' हा भाव प्रत्येकाच्या मनात आहे", असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहे. पुणे शहरातील मेट्रो कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सुमारे २१ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार, दि. 3 नोव्हेंबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमास राज्यपाल जिष्णू देव शर्मा, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आदी या वेळी उपस्थित होते.(Pune Metro Projects)
यावेळी महाराष्ट्र आणि पुणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की, नव्या सार्वजनिक सुविधा निर्माण झाल्यामुळे सणांचा आनंद अधिक द्विगुणित होतो. दहा वर्षांपूर्वी पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन केल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गामुळे पुण्यातील महत्त्वाच्या आयटी केंद्राला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार असून, नव्या मेट्रो मार्गामुळे शहराच्या जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्कही वाढणार आहे.
पुणे हे ऐतिहासिक विचारांचे केंद्र असून, देशातील तरुणांच्या स्वप्नांचे आणि आकांक्षांचे महत्त्वाचे ठिकाण आहे. माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, औषधनिर्मिती, स्टार्टअप, नवकल्पना आणि उत्पादन क्षेत्रात पुणे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. अशा परिस्थितीत मेट्रो कनेक्टिव्हिटीचा विस्तार शहराच्या विकासाला नवी गती देईल, असे मोदी यांनी नमूद केले.(Pune Metro Projects)
देशातील मेट्रो नेटवर्कच्या विस्ताराचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांत भारतातील मेट्रोचे जाळे जवळपास १२०० किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये राज्यात केवळ १० ते ११ किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यरत होते. आज हा आकडा जवळपास १७५ किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. तर ६८० किलोमीटरहून अधिक लांबीच्या मेट्रो मार्गांची कामे सुरू असून, त्यासाठी अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली जात आहे.
देशात यापूर्वी ‘गरिबी हटाव’च्या केवळ घोषणाच होत होत्या. अनेक पिढ्या या घोषणांमध्ये वाढल्या. आता मात्र प्रत्यक्षात देशातील गरिबी हटत आहे. गेल्या १०-१२ वर्षांत देशातील ५० कोटी लोकांनी भीषण गरिबीवर मात केली. आपला देश आज वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहेच; पण त्याचबरोबर गरिबी कमी करणारा आघाडीचा देशही आहे,’ अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.(Pune Metro Projects)
‘पुणे २०३० पर्यंत देशातील महत्त्वाचे मोबिलिटी हब असेल’ :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे मेट्रो हा केवळ सार्वजनिक वाहतुकीचा प्रकल्प नसून आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. हिंजवडी परिसरातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. मेट्रोमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. पुण्यात सुरू असलेले आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग, इलेक्ट्रिक बसेस, इनर आणि आउटर रिंग रोड, भूमिगत रस्ते तसेच नवीन विमानतळ यामुळे शहराचे कनेक्टिव्हिटी नेटवर्क सक्षम होत आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर प्रदेश २०३० पर्यंत देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.(Pune Metro Projects)
‘मेट्रोमुळे पुणेकरांचे जीवन सुपरफास्ट होणार’ :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशातील पहिला पूर्णपणे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारलेला मेट्रो प्रकल्प पुण्यात साकारला आहे. या मेट्रोचे संचालन महिला ट्रेन ऑपरेटर करणार असून, स्थानकांवरील कामकाजातही महिलांचा मोठा सहभाग आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता मेट्रोसह रिंग रोड आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे शहराचा विकास अधिक वेगाने होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.(Pune Metro Projects)
पुणे मेट्रो मार्गिका तीन ही देशातील पहिली १०० टक्के महिला संचलित मेट्रो मार्गिका ठरणार आहे. या मार्गावरील सुमारे १०० महिला ट्रेन पायलट मेट्रो चालवणार असून, स्थानकांवरील जवळपास निम्म्या कर्मचाऱ्याही महिला असणार आहेत. पुणे मेट्रोच्या प्रत्येक टप्प्याच्या नियोजनापासून ते मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्यापर्यंत दिवंगत अजित पवार यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांनी या प्रकल्पाचा सातत्याने आढावा घेतला आणि कामाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे समाधान असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.(Pune Metro Projects)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.