मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ!

सोमवारपासून ४६ अतिरिक्त फेऱ्या सुरु ; प्रतीक्षा कालावधी कमी


Mumbai Metro 3

मुंबई,: (Mumbai Metro 3)मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रो मार्गिका ३ वरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सोमवार, दि. २ नोव्हेंबरपासून कामकाजाच्या दिवशी ४६ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेट्रोच्या दैनंदिन फेऱ्यांची संख्या २९१ वरून ३३७ झाली आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मेट्रोसाठी कमी प्रतीक्षा करावी लागणार असून, गर्दीचे व्यवस्थापन करणेही अधिक सोपे होणार आहे.
 
ॲक्वा लाईनवरील प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेऊन एमएमआरसीने मेट्रो सेवांची वारंवारता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर ४ मिनिटे ५० सेकंदांवरून ४ मिनिटे २५ सेकंदांपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी वेळेत मेट्रो उपलब्ध होणार असून, स्थानकांवरील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल.(Mumbai Metro 3)
 
आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर दैनंदिन फेऱ्यांची संख्या २७१ करण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानुसार २३ जून २०२६ रोजी फेऱ्यांची संख्या २८२, तर २८ सप्टेंबर २०२६ रोजी २९१ करण्यात आली. आता आणखी ४६ फेऱ्यांची भर पडल्याने कामकाजाच्या दिवशी ही संख्या ३३७ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांना अधिक वारंवार आणि सोयीस्कर मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे.
 
नवीन वेळापत्रकानुसार गर्दीच्या वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर ४ मिनिटे २५ सेकंद करण्यात आले आहे. यापूर्वी हे अंतर ४ मिनिटे ५० सेकंद होते. मेट्रो गाड्यांची वारंवारता वाढल्यामुळे प्रवाशांना स्थानकांवर अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. तसेच गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. शनिवार आणि रविवारच्या दिवशी मात्र मेट्रो सेवा स्वतंत्र सप्ताहअखेरच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.(Mumbai Metro 3)
 
मुंबईकरांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एमएमआरसीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांच्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत आहे. भविष्यातही प्रवासीसंख्या आणि सेवेची आवश्यकता लक्षात घेऊन मेट्रो फेऱ्यांच्या वेळापत्रकात आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.(Mumbai Metro 3)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर