कुंभमेळा : स्वरूप, पंचांग आणि रंजक पौराणिक कथा

    03-Nov-2026

Kumbh Mela
 
विज्ञानाच्या युगात माणूस प्रगती करत असला, तरी त्याची आध्यात्मिक उत्सवप्रियता अद्याप कायम आहे. जवळ येत असलेला नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा हे याचेच उत्तम उदाहरण. हिंदू पंचांग, अचूक खगोलीय ग्रहस्थिती आणि निसर्गचक्र यांचा कुंभमेळ्याशी थेट संबंध आहे. समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतकुंभाचे रक्षण करताना प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी अमृताचे थेंब सांडले, अशी पौराणिक श्रद्धा आहे. संकटसमयी बुद्धी आणि नेटाने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, हा मोलाचा संदेश देणार्‍या कुंभमेळ्याची खगोलीय व पौराणिक पार्श्वभूमी जाणून घेणेही रंजक ठरते.
 
विज्ञानाच्या क्षेत्रात मानवाने कितीही प्रगती केली, तरीही त्याची उत्सवप्रियता अजूनही टिकून आहे. नाशिकमध्ये सध्या वेगाने सुरू असलेली आगामी कुंभमेळ्याची तयारी, हे याच उत्साहाचे प्रतीक आहे. परंतु, या कुंभमेळ्याची उत्पत्ती झाली तरी कशी? त्याची खगोलीय पार्श्वभूमी काय आहे? किती वर्षांनंतर आणि कोणत्या ग्रहस्थितीमध्ये कुंभमेळा भरतो? या सर्वच प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी, आपल्याला हिंदू पंचांग आणि कुंभमेळा यांचा परस्परसंबंध समजून घ्यावा लागेल.
 
पंचांग आणि खगोलशास्त्राचे नाते
 
हिंदू धर्मातील सण-उत्सव हे निसर्ग, ऋतू आणि पौराणिक घटनांशी जोडले गेले आहेत. पंचांग म्हणजे हिंदू कालशास्त्रानुसार, दिवसाची संपूर्ण खगोलीय व धार्मिक माहिती देणारा ग्रंथ! त्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पाच अंगे समाविष्ट असतात; म्हणूनच त्याला ‘पंचांग’ म्हणतात. हे पंचांग सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या अवकाशीय भ्रमणाचा अचूक अभ्यास करून मांडलेले वेळापत्रकच असते. थोडयात, कुंभमेळा म्हणजे खगोलीय ग्रहस्थिती आणि हिंदू परंपरांचा अद्भुत संगम असलेला, एक भव्य आध्यात्मिक मेळावा आहे.
 
समुद्रमंथन आणि अमृतकुंभाची पौराणिक कथा
 
कुंभमेळ्यामागे एक अत्यंत रंजक पौराणिक कथा आहे. एकदा दैत्यांनी देवांवर हल्ला करून त्यांचा पराभव केला. तेव्हा पराभूत देव ब्रह्मदेवासह भगवान विष्णूंना शरण गेले. विष्णूंनी देवांना आत्मिक बळ देत दैत्यांशी संधान साधून, क्षीरसागरात वनस्पती टाकून समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला. जेणेकरून त्यातून निघणारे अमृत प्राशन करून देव अमर होतील. त्यानुसार, मंदराचल पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून, देव-दानवांनी क्षीरसागरात मंथन केले. या समुद्रमंथनातून लक्ष्मी, कौस्तुभ मणी, पारिजात, ऐरावत आणि ‘अमृतकुंभ’ यांसह १४ रत्ने बाहेर पडली.
 
अमृताचे थेंब आणि चार पवित्र स्थाने
 
‘अमृतकुंभ’ बाहेर पडताच, इंद्रपुत्र जयंत तो कुंभ घेऊन आकाशात उडाला. अमृतासाठी दैत्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला घेरले. याच संघर्षादरम्यान, ‘अमृतकुंभा’तील अमृताचे थेंब पृथ्वीवरील चार ठिकाणी सांडले. ती ठिकाणे म्हणजे प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक! या प्रक्रियेत चंद्राने अमृताचे रक्षण केले, सूर्याने घट फुटण्यापासून वाचवले, गुरूने दैत्यांपासून बचाव केला आणि शनीने इंद्राच्या भयापासून घटाचे रक्षण केले. शेवटी भगवान विष्णूंनी ‘मोहिनी’ रूप धारण करून, सर्व देवांना अमृत वाटले आणि हे युद्ध संपले. कोणतीही गोष्ट करताना सुरुवातीला अडचणी येतातच; परंतु बुद्धी, धैर्य आणि अविरत प्रयत्नांच्या जोरावर शेवटी यश नक्कीच मिळते, हाच संदेश ही कथा आपल्याला देते.
८९९९७०३७५७
 
लेखक- प्रांजली कुलकर्णी
 




संबंधित मजकूर