केजीएमयूमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाची चौकशी होणार; योगी सरकारचे कारवाईचे निर्देश

    03-Nov-2026   

KGMU Investigation
 
मुंबई (KGMU Investigation) : उत्तर प्रदेश सरकारच्या निर्देशानंतर लखनौ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीने (केजीएमयू) विशेष तपास पथकाच्या (एसटीएफ) चौकशी अहवालाच्या आधारे विद्यापीठातील कर्मचारी आणि प्राध्यापकांवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातील काही कर्मचारी आणि प्राध्यापकांचा ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे एसटीएफच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
केजीएमयूचे प्रवक्ते डॉ. के. के. सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संबंधित कर्मचारी आणि प्राध्यापकांविरोधातील आरोपांची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ते म्हणाले, “हा अहवाल विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेपुढे ठेवण्यात येईल. त्यानंतर आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. शिस्तपालन समिती आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही, याची पडताळणी करेल. अहवालात उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांची तपासणी केली जाईल.” विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची बैठक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.(KGMU Investigation)
 
एसटीएफचा चौकशी अहवाल २९ ऑक्टोबर रोजी, गुरुवारी विद्यापीठाला प्राप्त झाल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले. या अहवालात विद्यापीठातील संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आलेली नसून, शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी प्रकरण विद्यापीठाकडे सोपविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
योगी आदित्यनाथ सरकारने ३० ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून एसटीएफच्या चौकशी अहवालात नामनिर्देशित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश केजीएमयू प्रशासनाला दिले होते. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल सरकारला सादर करण्यास सांगितले होते. एसटीएफच्या अहवालानुसार, विद्यापीठातील अनेक कर्मचारी आणि एका विभागप्रमुखाचाही कथित ‘लव्ह जिहाद’, जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणणे आणि त्यासंबंधित अन्य प्रकारांमध्ये सहभाग आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालात धार्मिक धर्मांतराशी संबंधित कारवाया, हिंदू विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा मानसिक व शारीरिक छळ, काही प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन, केजीएमयूच्या विविध विभागांमध्ये समोर आलेल्या घटना व तक्रारी तसेच संबंधित प्रशासनाने केलेल्या कारवाईचा तपशील देण्यात आला आहे.(KGMU Investigation)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर