मुंबई (KGMU Conversion Case) : लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये (केजीएमयू) कथित लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे जाळे व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून चालवले जात असल्याचा तपासात खुलासा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आग्रा, देवबंद, बरेली यांसह विविध ठिकाणांहून मौलवींना वसतिगृहात बोलावले जात होते. तेथे धार्मिक प्रवचने दिल्यानंतर मुस्लिम डॉक्टर, कनिष्ठ निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने कथित लव्ह जिहाद आणि धर्मांतरासाठी योजना आखल्या जात होत्या. दरम्यान, केजीएमयू प्रकरणाचा तपास आता संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्थेपर्यंत पोहोचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर, मौलवी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले होते. याच ग्रुपवरून सूचना आणि आदेश दिले जात असल्याचे समोर आले आहे. विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) तपासात तसेच पीडितांच्या जबाबांमध्ये या बाबींची पुष्टी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. धर्मांतराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या डॉ. रमीज याने आग्रा येथील एसएनएमसी महाविद्यालयात शिक्षण घेतलेले मुनेश खान, मोहम्मद कैफ, डॉ. सॅम अनीस, केजीएमयूतील मोहम्मद जहीर, मोहम्मद अमान, मोहम्मद अयान आणि इतर मित्रांना या ग्रुपमध्ये सहभागी केले होते. याशिवाय केजीएमयूतील डॉ. सुमायरा कय्यूम, कट्टर इस्लामी विचारसरणीचे असल्याचा आरोप असलेले डॉ. वाहिद अली, एस.एस. अब्बास आणि इतर व्यक्तीही या ग्रुपमध्ये होत्या. (KGMU Conversion Case)
या ग्रुपवर हिंदू महिला डॉक्टरांना कशा प्रकारे त्रास द्यायचा, त्यांच्याशी कसे वागायचे, त्यांची रजा मंजूर करायची की नाही, यावरही चर्चा होत असल्याचा आरोप आहे. एखाद्या मुस्लिम डॉक्टरला किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्याला काही अडचण आल्यास अथवा तो एखाद्या आरोपात अडकल्यास त्याला कशा प्रकारे वाचवायचे, याबाबतही सूचना दिल्या जात असल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणातील संशयित व्यक्ती पोलीस आणि तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. एसटीएफने अनेक व्यक्तींची ओळख पटवली असून, त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. (KGMU Conversion Case)
केजीएमयू, आग्रा, बस्ती यांसह अन्य वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टर आणि कर्मचारी ‘इस्लामिक मेडिकोज’ तसेच आरोपी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संबंधित इतर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होते. मात्र, आता अनेकांनी या ग्रुपमधून बाहेर पडण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. (KGMU Conversion Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक