समुद्री चाच्यांच्या ताब्यातील इराणी जहाज भारतीय नौदलाकडून मुक्त; २० खलाशांची सुखरूप सुटका

भारतीय हवाई दलाचीही महत्त्वपूर्ण भूमिका

    03-Nov-2026   
 
 
 Indian Navy Rescues Iranian Ship
 
मुंबई (Indian Navy Rescues Iranian Ship) : सोमालियाच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांच्या ताब्यात गेलेले इराणचे ‘अजिनी’ हे मासेमारी जहाज भारतीय नौदलाने यशस्वी कारवाई करून मुक्त केले. या मोहिमेत जहाजावरील सर्व २० इराणी खलाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. या कारवाईत भारतीय हवाई दलानेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सुमारे ४८ तास चाललेल्या या मोहिमेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. भारताच्या या धाडसी कारवाईबद्दल इराणने आभार व्यक्त केले असून, भारतीय नौदल आणि हवाई दलाच्या धैर्याचे, व्यावसायिक कौशल्याचे आणि समन्वयाचे कौतुक केले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ‘अजिनी’ या मासेमारी जहाजाचे मागील महिन्यात सोमालियाच्या ईशान्य किनारपट्टीजवळ सशस्त्र समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते. सोमालियातील बंदर बायला आणि हाफुन या किनारी भागांदरम्यान ही घटना घडली होती. समुद्री सुरक्षा यंत्रणांना अशी भीती होती की, समुद्री चाचे या जहाजाचा वापर मोठ्या व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यासाठी तात्पुरते तळ अर्थात ‘मदर शिप’ म्हणून करू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन संबंधित सागरी क्षेत्रातील गस्त आणि देखरेख वाढविण्यात आली होती.  (Indian Navy Rescues Iranian Ship)
 
इराणी जहाजाची समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी भारतीय नौदलाने विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेसाठी तैनात असलेली युद्धनौका ‘आयएनएस कोलकाता’ला कारवाईसाठी पाठविण्यात आले. समुद्री टेहळणी विमाने आणि अन्य देखरेख यंत्रणांच्या मदतीने जहाजाचा सातत्याने शोध घेण्यात आला. जहाजाच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याची पुढील वाटचाल रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली.  (Indian Navy Rescues Iranian Ship)
 
त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सी-१७ विमानाच्या मदतीने नौदलाच्या मरीन कमांडोंना अचूक नियोजनानुसार जहाजापर्यंत पोहोचविण्यात आले. कमांडोंनी धाडसी कारवाई करत जहाजाचा ताबा मिळवला आणि समुद्री चाच्यांचा धोका निष्प्रभ केला. या संयुक्त मोहिमेमुळे जहाजावरील सर्व २० इराणी खलाशांची सुरक्षित सुटका करणे शक्य झाले.  (Indian Navy Rescues Iranian Ship)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर