
दिलीप पुंडलिक पाटील हे वाडा तालुक्यातील एक सेवाव्रती नाव. दुर्गम खेड्यापाड्यांतील विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन जीवनमान उंचावावे, यासाठी ते अखंड कार्यशील आहेत. त्यांच्या जीवनकार्याविषयी...
आबिटघर...वाडा तालुक्यातील दिलीप पाटील काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते. गरिबी त्यांनी अनुभवली होती. निम्न मध्यमवर्गीय म्हणून जीवन जगताना केवळ गावातल्या मुलांना माध्यमिक शिक्षण लाभावे, म्हणून स्थिर आर्थिक सुबत्ता देणार्या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला. दिलीप पाटील हे जिल्हा परिषदेच्या शाळेत उच्चस्तरावर कार्यरत होते. आयुष्यात आर्थिक स्थैर्य होते. त्याच वेळी समाजाचे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले अॅड. प्रकाश पाटील त्यांना म्हणाले, "आपल्या परिसरात एकही माध्यमिक शाळा नाही. आपण सर्वजण मिळून एक शाळा सुरू करू. आम्हाला वाटते की, तू या शाळेची जबाबदारी घ्यावी.” परिसरात माध्यमिक शाळा नसल्याने अनेक मुले सातवीनंतर शाळा सोडत असत. जे तालुक्याच्या गावी शिकायला जात, त्यांना जाणे-येणे परवडत नसे. गावात शाळा असणे गरजेचे होते. गोरगरीब गरजूंच्या घरात शिक्षणाचा नंदादीप तेवण्यासाठी दिलीप पाटील यांनी सरळ सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. शाळेत सुरुवातीला पाच वर्षे एक रुपयाही न घेता त्यांनी समर्पितपणे काम करून शाळेला भव्य आणि स्थायी रूप निर्माण करून दिले.
साधेपणासोबत जपलेली संवेदनशील माणुसकी, यामुळे दिलीप हे परिसरात अत्यंत लोकप्रिय. ‘अंत्यज’ स्तरातील व्यक्तीचा विकास व्हायला हवा, यासाठी सर्वच स्तरावर पाठपुरावा करणारे दिलीप हे एका शाळेचे मुख्याध्यापक आणि ‘आबिटघर ज्ञान प्रसारक मंडळ’चे सचिव आहेत. परिसरात शिक्षणाचा समर्थ सूर्य उगवण्यासाठी त्यांनी अख्खे आयुष्य वेचले. भौतिक संपत्ती मिळवण्याची, तसेच शहरी भागात जाऊन सुखासीन आयुष्य जगण्याच्या अनेक संधी पायाशी लोळण घेत असतानाही, दिलीप यांनी मार्ग निवडला तो दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा. त्यामुळेच तर ८०च्या दशकातही ज्या आबिटघर परिसरात काही मुले माध्यमिक शाळेसाठी तालुक्याला शिकायला जायची; पण त्यामध्येही पाच ते सहा मुले दहावी उत्तीर्ण व्हायची. आता मात्र ‘आबिटघर ज्ञान प्रसारक मंडळा’च्या माध्यमातून शिकून पुढे ‘एमटेक’, ‘एलएलएम’, ‘आर्किटेक्चर’, ‘बीएएमएस’ आणि शिक्षक, प्राध्यापक वगैरे सारख्या पदावर कार्यरत आहेत. वाडा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यातील मुलांच्या जीवनात शिक्षणामुळे खरोखर आमूलाग्र बदल झाला आहे. याचे श्रेय दिलीप पाटील यांना जाते.
याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, काही वर्षांपूर्वी संतोष वाणी नावाचा विद्यार्थी हा ‘आबिटघर ज्ञान प्रसारक मंडळा’त शाळेत जायचा. त्याचे आई-बाबा वीटभट्टीच्या कामासाठी गावाबाहेर गेलेले. आदिवासी पाड्यातल्या झोपडीत संतोष आणि त्यांची लहान भावंडे राहायची. भावंडांसाठी स्वयंपाक बनवून, घरचे आवरून संतोष शाळेत यायचा. शिक्षण आणि प्रगतीच्या वाटा बिकटच होत्या. दिलीप यांनी संतोष यांच्या शिक्षणासाठी विशेष लक्ष दिले. शिक्षण असो की नोकरी, याबाबत पित्याच्या भूमिकेतून दिलीप यांनी या विद्यार्थ्याचे मार्गदर्शन केले, सहकार्य केले. आज संतोष हे सरकारी आस्थापनात उच्चपदस्थ अधिकारी आहेत. दिलीप यांच्या मार्गदर्शनामुळे आणि शिक्षणामुळे संतोष यांचे जीवनच बदलले. ही तर केवळ एक उदाहरणादाखल घटना आहे. अशा शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात दिलीप यांनी प्रगतीचा मार्ग दाखवला. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.
आबिटघर गावचे कुणबी मराठा समाजाचे पुंडलिक आणि साधना या दाम्पत्याला तीन मुले, त्यापैकी एक दिलीप. दिलीप सातवीला शाळेत पहिले आले. त्यांनी आठवी इयत्तेत प्रवेश घ्यायचा ठरवले. आईचे वडील म्हणजे, शंकर विशे आजोबांनी पुढाकार घेतल्यामुळे दिलीप यांनी सोनाळे गावच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळेत प्रवेश घेतला. शाळेतील जी. आर. पाटील आणि चंद्रकांत तळेले या शिक्षकांनी दिलीप यांना इंग्रजी आणि गणित विषय शिकवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच दिलीप यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले. विद्यार्थ्यांप्रति या दोन शिक्षकांची असलेली आपुलकी आणि शिक्षणाबाबतची त्यांची निष्ठा ही दिलीप यांच्या हदयात रुजली. पुढे दहावीत दिलीप वाडा तालुक्यात दुसरे आणि शाळेत पहिले आले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने लवकर नोकरी मिळेल, यासाठी दिलीप यांनी ‘डीएड’ प्रशिक्षण घेतले. पुढे खासगी शाळेत काम करताना त्या शाळेच्या मुख्याध्यापक ज्योत्स्ना दर्फ यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. यातूनच दिलीप यांचे व्यक्तिमत्त्व घडत होते. त्यातूनच की काय, त्यांनी पुढील सर्व आयुष्य खेड्यापाड्यांतही उच्चशिक्षण पोहोचवण्यासाठी अखंड कष्ट केले. ते म्हणतात, "दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांना साधे माध्यमिक शिक्षण घेणेही किती कठीण असते, हे मी अनुभवले आहे. त्यामुळे यापुढेही दुर्गम खेड्यापाड्यांतल्या विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घ्यावे, त्यांचे जीवनमान उंचावावे, यासाठी काम करणार आहे.” दिलीप पाटील यांच्यासारख्या व्यक्ती समाजासाठी दीपस्तंभ असतात.
९५९४९६९६३८