कृत्रिम तंत्रज्ञान (एआय)चे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, ते आत्मविश्वासपूर्ण आणि व्यवस्थित उत्तर देते. परंतु, उत्तराची भाषा प्रभावी आहे, म्हणून त्यातील माहिती अचूक असेलच, असे नाही. चुकीची माहिती, अपूर्ण संदर्भ किंवा एकांगी निष्कर्षही विश्वासार्ह वाटू शकतात. म्हणूनच, आजच्या तरुणांसाठी डिजिटल साक्षरतेबरोबरच विश्लेषक विचारक्षमता महत्त्वाची आहे. माहिती कोणी दिली आहे, तिचा आधार काय आहे, दुसरे विश्वसनीय स्रोत काय सांगतात आणि त्या उत्तरातील कोणत्या बाबी खोलात तपासण्याची गरज आहे, हे ओळखता आले पाहिजे. यासाठी काही प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवेत :
या उत्तरामागे पुरावा आहे का?
यात महत्त्वाची माहिती वगळली गेली आहे का?
यात दुसरा दृष्टिकोन असू शकतो का?
मी हे उत्तर समजून स्वीकारत आहे की सोयीचे वाटते म्हणून?
असे प्रश्न विचारणे, म्हणजे तंत्रज्ञानावर संशय घेणे नव्हे. उलट, स्वतंत्र विचार करून त्याच मिळालेल्या माहितीचे विवेकपूर्ण मूल्यमापन आणि अधिक परिणामकारक वापर करणे होय.
‘जेन-झी’ आणि कृत्रिम तंत्रज्ञान (एआय)
आकर्षणासोबत चिंता आणि प्रतिकारही तरुण पिढी कृत्रिम तंत्रज्ञान सहज वापर करते, असे मानले जाते. ‘एआय’च्या बाबतीत मात्र तिची भूमिका अधिक विचारपूर्वक आणि संमिश्र दिसते. Harvard Business Review मधील जानेवारी २०२६च्या लेखानुसार, ‘जेन-झी’ तरुण ‘एआय’चा वापर करत असले, तरी त्याचा स्वतंत्र विचार, शिक्षण आणि मानवी संवादावर होणार्या परिणामांविषयी त्यांना चिंता आहे. त्याचवेळी, ‘एआय’मुळे नवे दृष्टिकोन मिळतात आणि काम अधिक काम अधिक कार्यक्षमतेने करता येऊ शकते, हेही ते मान्य करतात.
‘एआय’चा प्रभाव तरुणांच्या भविष्यावर पडणार असेल, तर त्या भविष्याविषयीच्या चर्चेत त्यांचा आवाजही असला पाहिजे. ‘एआय’ वापरणे किंवा न वापरणे, हा नेहमीच साधा वैयक्तिक निर्णय नसतो. शिक्षण, नोकरी आणि दैनंदिन व्यवहारांत ‘एआय’ समाविष्ट होत असताना त्यापासून पूर्णपणे दूर राहणे काहींसाठी शय नाही. त्यामुळे तरुणांना केवळ ‘तंत्रज्ञानाशी जुळवून घ्या,’ असे सांगण्यापेक्षा, ते कसे वापरावे, कुठे मर्यादा ठेवाव्यात आणि त्याविषयी प्रश्न कसे विचारावेत, हे शिकवणे अधिक उपयुक्त ठरेल.
डिजिटल जगातील मानवी नात्यांची गरज
कृत्रिम तंत्रज्ञान चर्चेत आणखी दुर्लक्षित होता कामा नये, असा एक पैलू म्हणजे मानवी संपर्क. ‘एआय’ एखादी संकल्पना समजावून सांगू शकते, मुलाखतीचा सराव करून घेऊ शकते किंवा संभाषणातील संभाव्य उत्तरांची उदाहरणे देऊ शकते. पण, प्रत्यक्ष व्यक्तीशी संवाद साधताना येणारे अनिश्चित क्षण, दुसर्याच्या चेहर्यावरील भाव, मतभेद हाताळणे, गैरसमज दूर करणे आणि नात्यात विश्वास निर्माण करणे, या गोष्टी मानवी अनुभवातून शिकाव्या लागतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकचे मार्गदर्शन, सहकार्यांशी चर्चा आणि चुका केल्यानंतर मिळणारा अभिप्राय यांचेही विशेष महत्त्व आहे. पोहायचे कसे, हे समजणे आणि नदीत उडी मारून आत्मविश्वासाने पोहता येणे, यात अस्सल अनुभवाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे कृत्रिम तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष संवाद यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा वापर करताना माणसांशी बोलणे, त्यांच्याकडून शिकणे आणि प्रत्यक्ष अनुभव घेणे, यांचे महत्त्व आपण विसरता कामा नये.
कृत्रिम तंत्रज्ञानाचा सुज्ञ वापर कसा करावा?
‘एआय’पासून पूर्णपणे दूर राहणे, हा आज व्यवहार्य उपाय नाही. त्याऐवजी त्याचा वापर अधिक जाणीवपूर्वक करण्याची अधिक गरज आहे.
उत्तर मिळवण्यापूर्वी स्वतः विचार करा. प्रश्न सोडवण्याचा प्राथमिक प्रयत्न केल्यानंतर ‘एआय’ची मदत घ्या. त्यामुळे स्वतःचे आकलन कुठे कमी पडते, हे लक्षात येईल.
‘एआय’चे तयार उत्तर समजून घ्या :
‘एआय’ने दिलेली माहिती स्वतःच्या शब्दांत सांगता येते का, तिच्यामागील तर्क समजतो का आणि तिचा वेगळ्या प्रसंगी उपयोग करता येतो का, हे तपासा.
माहितीची सत्यता पडताळा. महत्त्वाच्या शैक्षणिक, व्यावसायिक किंवा आरोग्यविषयक प्रश्नांवर एकाच डिजिटल स्रोतावर अवलंबून राहू नका. विश्वसनीय संदर्भ आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचे महत्त्व कायम राहणार आहे.
एकाग्रतेसाठी वेळ द्या :
अभ्यास करताना किंवा वाचताना मोबाईलच्या सूचना बंद ठेवा आणि एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा.
स्वतः करून पाहून शिका :
चर्चा, प्रयोग, लेखन, सादरीकरण, समस्या सोडवणे आणि सहकार्यांसोबत काम करणे यांतून कौशल्य विकसित होते. ‘एआय’च्या मदतीने तयारी करा; पण प्रत्यक्ष कृती टाळू नका.
तंत्रज्ञानाला साधन म्हणून वापरा :
तंत्रज्ञान म्हणजे निर्णयकर्ता म्हणून नव्हे. अंतिम निर्णय घेताना स्वतःचे मूल्यविचार, परिस्थितीचे आकलन आणि आवश्यक तेथे मानवी सल्ला यांचा विचार करा. या सवयी केवळ ‘जेन-झी’साठी नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर करणार्या प्रत्येक वयोगटासाठी त्या तितयाच महत्त्वाच्या आहेत.
पालक, शिक्षक आणि संस्थांची भूमिका
डिजिटल जगात वाढणार्या तरुणांना केवळ निर्बंध घालून मार्गदर्शन करता येणार नाही. मोबाईल किती वेळ वापरला, यावर लक्ष ठेवण्याइतकेच तो कशासाठी वापरला जातो, हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी आणि पालकांनीही तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारणे किंवा प्रत्येक शैक्षणिक कामासाठी त्याचा वापर प्रोत्साहित करणे, या दोन्ही टोकांपासून दूर राहावे. तंत्रज्ञानाबद्दल सतत टीका करण्याऐवजी त्याच्या उपयोगांविषयी आणि मर्यादांविषयी संवाद साधावा. कृत्रिम तंत्रज्ञान स्वतःहून माणसाला अधिक बुद्धिमान किंवा कमी विचारशील बनवत नाही. त्याचा परिणाम आपण ते कसे वापरतो, कोणत्या उद्देशाने वापरतो आणि त्यासोबत कोणत्या मानवी कौशल्यांचा विकास करतो, यावर अवलंबून असतो. खरी स्मार्ट पिढी ती नाही, जिला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळते, तर ती आहे, जी त्या उत्तराचा विचार करते, ते योग्य आहे का, हे तपासते आणि स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेते.
अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी उद्धृत केलेले हे वाय या घडीला अत्यंत समर्पक आहे, "प्रश्न विचारणे कधीही थांबवू नका. जिज्ञासेला स्वतःचे असे एक विलक्षण महत्त्व आहे.”
लेखक- डॉ. शुभांगी पारकर