लोकसहभागातून समाजकल्याण साधणारी ऊर्जावती : वर्षा परचुरे

    29-Nov-2026

Varsha Parachure Baya Karve National Award 
 
‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’चा प्रतिष्ठित ‘बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार’ नुकताच ‘परिवर्तन महिला संस्था, डोंबिवली’च्या वर्षा परचुरे यांना जाहीर झाला आहे. ‘अनुसंधान तथा विकास स्थापना (इंजि.), डीआरडीओ’चे संचालक डॉ. मकरंद जोशी यांच्या हस्ते आज दि. २९ नोव्हेंबर रोजी रमा पुरुषोत्तम विद्या संकुल, कर्वेनगर, पुणे येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने वर्षा परचुरे यांचा कार्यपरिचय करून देणारा हा लेख...
 
स्वत:च्या कुटुंबात सामाजिक कार्यकर्त्यांचा राबता असल्यामुळे वर्षाताई परचुरे यांना सामाजिकतेचे जणू बाळकडूच मिळाले. कुटुंबातील आर्थिक अडचणींचा सामना करीत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. ‘एनएसएस’मधील सहभागातून त्यांना खर्‍या अर्थाने समाजातील विविध घटकांच्या समस्या लक्षात आल्या. पुढे काही वर्षे त्यांनी ‘वनवासी कल्याण आश्रम’ आणि ‘वंचित विकास’ या संस्थांमध्येही काम केले. आदिवासी आणि (निम)शहरी भागातील विविध दुर्लक्षित घटकांचे प्रश्न समजून घेताना संबंधित व्यावसायिक कौशल्ये शिकण्याचे महत्त्व त्यांनी जाणले आणि पुढे समाजकार्य आणि सामाजिक उद्योजकता या विषयातील ‘पदव्युत्तर’ अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला.
 
मुळातच अभ्यासू, धीट आणि एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची वृत्ती असल्यामुळे त्यांनी व्यक्तिगत प्रपंचामध्ये न पडता, ‘परिवर्तन महिला संस्थे’च्या कार्यात पूर्णवेळ योगदान देण्याचे निश्चित केले आणि संस्थेच्या कामातील व्यवस्थापन, दस्तऐवजीकरणाचे महत्त्व आणि लाभार्थी घटकांच्या नेमक्या गरजा ओळखून सूक्ष्म नियोजन करीत, त्यांनी कल्पक, नावीन्यपूर्ण उपक्रमांची आखणी सुरू केली.
 
अनाथ, संकटग्रस्त मुलींकरिता त्यांनी टिटवाळा येथे २००५ साली ‘मुक्ता बालिका भवन’ सुरू केले. या कामाद्वारे ४००हून अधिक मुलींना एक सुरक्षित घर मिळाले. शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या मुलींपैकी अनेकजणींची लग्नेही इथेच पार पडली. यातील काहीजणी तर या केंद्राचे कामही बघत आहेत.
 
वर्ष २०१० मध्ये डोंबिवली येथे गरजू आज्यांकरिता ‘दिलासा आज्यांचे घर आणि विरंगुळा केंद्र’ वर्षाताईंनी सुरू केले. २००हून अधिक आज्यांना याचा लाभ होतो. काही ठरावीक कालावधीसाठी केंद्रात येणार्‍या आज्यादेखील येथे दिसतात. विरंगुळा केंद्रात तीन हजारांहून अधिक सभासद असून, त्यांच्याकरिता विविध कार्यक्रम घेतले जातात. सोबतच, नोकरीकरिता मुंबईमध्ये येणार्‍या महिलांना सुरक्षित घर मिळावे, यादृष्टीने वर्षाताईंनी गोरेगाव येथे २०२४ मध्ये ‘सखी निवास’ सुरू केले. ५००हून अधिक नोकरदार महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
 
आदिवासी क्षेत्रातील कामाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे वर्षाताईंनी जव्हार भागात काही काळ काम करून; पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका हे आपले कार्यक्षेत्र बनवले. दरवर्षी रोजगारासाठी काही महिने स्थलांतरित होणारा हा समाज एका ठिकाणी स्थिरावावा, त्यांच्या हाताला काम, पोटाला अन्न, तसेच शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधा लाभाव्यात आणि त्यांचे जमीन, पाणी, वन अधिकार अबाधित राहावेत याकरिता संघर्षात्मक, विधायक, विकासात्मक, रचनात्मक आणि शैक्षणिक कार्यातून अनेक उपक्रम स्थानिक तरुणाईला हाताशी घेत त्यांनी उभे केले. याठिकाणी आज ४० कार्यकर्ते पूर्णवेळ ग्रामविकासाचे काम करीत आहेत.
 
महिला संघटन उभे करण्यासाठी ८२ गावांत १२० बचत गट सुरू करण्यात आले असून, त्यांत १ हजार ७४०हून अधिक महिला-सदस्य आहेत. व्यक्तिगत कारणासाठी घेतलेल्या कर्जाची १०० टक्के परतफेड होते, हे विशेष. पंचक्रोशीतील महिलांना स्थानिक पातळीवर काम मिळावे, याकरिता वर्षाताईंनी २०२१ मध्ये ‘गारमेंट प्रोजेक्ट’ सुरू केला, ज्यामुळे ३५हून अधिक महिलांना काम मिळाले आहे. ‘वामाज’चे ब्लाऊज शिवायला सुरुवात करून पुढे ‘टेसला’चे अ‍ॅप्रन, ‘एस कुमार’च्या पॅन्ट-शर्ट, लोकल फ्रॉक, शाळेचे गणवेश, ‘रेमंड्स’ कंपनीच्या पॅन्ट अशी कामे येथे केली जातात. बाहेरचे काम नसताना, संस्थेने सुरू केलेल्या ‘झोला’ ब्रॅण्डच्या विविध आकारातील पिशव्या, बॅग्ज, गोधड्या इ. शिवण्याचे काम येथे चालते. त्यामुळे नियमित रोजगाराची हमी महिलांना मिळते. मोठ्या शहरांमध्ये याची विक्रीदेखील केली जाते. या प्रकल्पामधून महिलांना रु. ८ ते १२ हजार इतके मासिक उत्पन्न मिळते.
 
वर्षाताईंनी आदिवासी भागातील ‘वन पट्टा’ प्रश्नावर उभे केलेले काम आज संघर्षातून विधायक कामाकडे वाटचाल करीत आहे. आतापर्यंत ७४० कुटुंबाना वन पट्टा मिळाला असून, हे मोठेच यश म्हणावे लागेल. आदिवासी मुलांचे शाळागळतीचे प्रमाण रोखण्याकरिता ‘खेळवाडी’ प्रकल्प आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये नागरिक कर्तव्य आणि बालहक्क अधिकारांविषयी जागृती निर्माण व्हावी, याकरिता १७ गावांत ‘बाल-पंचायत’ प्रकल्प सुरू करण्यात आला असून, त्यात ७०० मुले सहभागी होतात. या प्रकल्पामुळे ८० शाळाबाह्य मुले पुन्हा शालेय शिक्षणाच्या प्रवाहात दाखल झाली आहेत.
 
ग्रामसभांचे नियमित आयोजन व ग्रामस्थांचा सभेतील सहभाग वाढवीत, मोखाडा तालुयातील ८५ गावांना ‘पेसा’ (पंचायत) कायद्याद्वारे महसुली गावाचा दर्जा प्राप्त करून देण्याचे कामही त्यांनी केले असून, आदिवासी भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी ‘रोजगार हमी कायद्यां’तर्गत ३ हजार ७०० लोकांना रोजगार मिळवून देण्याचे काम वर्षाताईंनी केले. पाच ते सहा ग्रामपंचायतींतील ‘ग्राम रोजगार सेवक’ हे संस्थेचे कार्यकर्ते आहेत.
 
स्थानिक लोकांना प्रशिक्षण, त्यांच्याच करवी काम, लाभार्थींना ‘कार्यकर्ते’ म्हणून घडविणे, हा वर्षाताईंच्या कामाचा मुख्य गाभा असल्यामुळे आज त्यांच्या संस्थेत कार्यकर्त्यांची दुसरी फळी निर्णय प्रक्रियेत सक्रिय आहे. विविध जबाबदार्‍या पार पाडणार्‍या कार्यकर्त्यांमधील क्षमतावर्धनासाठी चेतना शिबिरे, अभ्यास सहली, वर्ग इ.चे आयोजन त्या नियमितपणे करीत असतात. सामाजिक प्रश्नांचा वेध घेत, लोकसहभागाद्वारे मोठे काम उभे करणार्‍या वर्षाताई एखाद्या ऊर्जावतीसारख्या भासतात. या कार्यास शत शत प्रणाम!

लेखिका- स्मिता कुलकर्णी
(लेखिका महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आहेत.)
 




संबंधित मजकूर